मल्हारी म्हाळसाकांत संस्थान

सोनाटी, ता. मेहकर, जि. बुलडाणा

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील मंदिर प्रसिद्ध आहे. मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध केल्यानंतर जेजुरीला जात असताना खंडोबाने वाटेत येथील माळरानावर काही काळ विसावा घेतला होता, अशी आख्यायिका आहे. ‘मल्हारी म्हाळसाकांत संस्थान’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात विराजमान खंडोबा प्राचीन काळापासून पंचक्रोशीचे रक्षण करत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. पौष शुद्ध दशमी ते पौष पौर्णिमा या कालावधीत भरणाऱ्या यात्रेदरम्यान असंख्य भाविक ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात भंडारा व खोबऱ्याची उधळण करत येथे खंडोबाचरणी नतमस्तक होतात.
शिवशंकरांचा अवतार असलेला खंडोबा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक या राज्यांतील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. मल्लारी (मल्हारी) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार आदी नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. मराठा आणि ब्राह्मणांपासून ते धनगर व रामोश्यांपर्यंत खंडोबाचे उपासक आढळतात. मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी शिवशंकरांनी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंडभैरवाचा अवतार धारण केला. या दैत्यांचा वध केल्यानंतर जेजुरीला जात असताना खंडोबाने काही काळ सोनाटी येथील माळरानावर विसावा घेतला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे हे खंडोबाचे जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

सोनाटी हे गाव मेहकर, लोणार आणि रिसोड या तालुक्यांच्या सीमेजवळ म्हणजेच मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर आहे. येथील ग्रामस्थांची अशी श्रद्धा आहे की मल्हारी म्हाळसाकांत हा या गावाचा आणि सीमेचा रक्षक (क्षेत्रपाळ) आहे. रात्रीच्या वेळी गावाच्या वेशीवर घोड्याच्या टापांचा आवाज येतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. देव स्वतः घोड्यावर बसून गावाची गस्त घालतात, या श्रद्धेमुळे गावात रात्रीच्या वेळी चोरी किंवा दरोड्याची भीती राहात नाही; कारण साक्षात मल्हारी रक्षणकर्ता आहे. याशिवाय मल्हारी म्हाळसाकांत हा न्यायाचा देव आहे. जर कोणी मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा भंडारा उचलून खोटे बोलले, तर त्याला काही दिवसांतच देवाच्या कोपाला सामोरे जावे लागते. या मंदिरातील भंडारा आणि बेलभंडारा यात औषधी शक्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक त्वचाविकारावर आराम पडण्यासाठी व ज्यांची गुरेढोरे आजारी आहेत, ते या मंदिरात येऊन देवाला साकडे घालतात. देवासमोरचा भंडारा कपाळाला लावला किंवा अंगावर उधळला की व्याधी नाहीशा होतात, असा लोकांचा ठाम विश्वास आहे.

सोनाटी येथील हे मंदिर केव्हा उभारण्यात आले, याबाबतची नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र, ते खूप प्राचीन असल्याचे सांगितले जाते. कालौघात या मंदिराचे अनेकदा जीर्णोद्धार करण्यात आले. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि या देवावर असलेल्या लोकांच्या श्रद्धेचा विचार करून राज्य सरकारने या मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्येही या मंदिराची माहिती आढळते.

सोनाटी गावाजवळ एका माळरानावर हे मंदिर आहे. मंदिरासमोर फरसबंदी प्रांगण आहे. या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. प्रांगणात मंदिरासमोर जमिनीवर शिवशंकरांचे वाहन नंदी आणि खंडोबाचे वाहन असलेल्या घोड्याच्या मूर्ती आहेत. त्यापुढे पितळी कासव मूर्ती आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना वर निमुळते होत जाणारे दीपस्तंभ आहेत. या मंदिराचे मूळ बांधकाम दगडी होते. जीर्णोद्धारादरम्यान मंदिराला आतून काहीसे आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. कमानीच्या आकाराच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपातील सर्व पाषाणी स्तंभ एकमेकांशी अर्धवर्तुळाकार आकाराने जोडलेले आहेत. येथील भिंतींवर काही देवकोष्ठके कोरलेली आहेत. त्यापैकी एका मोठ्या देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती आहे. अंतराळातील एका देवकोष्ठकात शिवलिंग आहे. गर्भगृहात एका वज्रपिठावर असलेल्या मखरात खंडोबा व म्हाळसाई यांची प्रतिमा व मूर्ती आहेत. पीठासनाच्या खालील भागात मणी व मल्ल यांच्या मूर्ती आहेत. त्यासमोरील खोलगट जागेत भंडारा ठेवण्याची जागा आहे. गर्भगृहावर वरच्या बाजूने निमुळते होत जाणारे उंच शिखर आहे. त्यावर अनेक देवकोष्ठके आहेत. त्याच्या शीर्षभागी द्विस्तरीय आमलक व कळस आहेत. मंदिराशेजारी डोम्या शेष नावाचे नागाचे मंदिर आहे. त्यासमोर असलेल्या चौथऱ्यावर हनुमान, गणेश व शनी यांच्या मूर्ती आहेत.

नवसाला पावणारा देव, अशी येथील खंडोबाची ख्याती आहे. त्यामुळे तालुक्यातील असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. रविवार हा खंडोबाचा वार मानला जातो. त्यामुळे या दिवशी भाविकांची संख्या अधिक असते. पौष शुद्ध दशमी ते पौष पौर्णिमा या कालावधीत येथे मोठी जत्रा असते. या जत्रेत सर्वत्र भंडाऱ्याची उधळण केली जाते. अनेक भाविक येथे नवसाच्या काठ्या आणतात व खंडोबाला रोडगे-पानग्याचा नैवेद्य अर्पण करतात. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना वांग्याची भाजी व पुरी असा महाप्रसाद दिला जातो.

उपयुक्त माहिती:

  • मेहकर येथून १८ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८० किमी अंतरावर
  • मेहकर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

मल्हारी म्हालसाकांत संस्थान

सोनाटा, टी. मेहकर, जिला. बुलढाणा

Back To Home