परभणी जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या परभणी शहरात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा मंदिर स्थित आहे. खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील एक लोकप्रिय लोकदैवत असून ते महाराष्ट्रातील बारा बलुतेदार व अठरा पगड जातींचे कुलदैवत मानले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात नऊ खंडांचे प्रमुख म्हणून जेजुरी, पाली, नळदुर्ग, मालेगाव, सातारे, निमगाव-दावडी, शेडुंग, चंदनपुरी आणि बाळे ही नऊ प्रमुख खंडोबा स्थाने प्रसिद्ध आहेत. याच ऐतिहासिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण श्रद्धास्थान म्हणून परभणी शहरातील या मंदिराचा उल्लेख केला जातो. या मंदिरामध्ये आयोजित होणारा चंपाषष्ठीचा जत्रा उत्सव विशेष महत्त्वाचा मानला जातो.
हे मंदिर सुमारे ७५ वर्षे जुने असले तरी येथील खंडोबाची मूर्ती शेकडो वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. ही मूर्ती सुमारे ७५ वर्षांपूर्वी याच ठिकाणी जमिनीतून प्रकट झाली. असे सांगितले जाते की त्या काळात येथे कडुलिंबाचा एक वृक्ष होता. त्या वृक्षाच्या खोडावर नैसर्गिकरीत्या हळद उमटू लागली. ती हळद पाहून येथे खंडोबाचा वास असल्याची धारणा स्थानिकांमध्ये निर्माण झाली आणि काही लोक या झाडाखाली खंडोबाची उपासना करू लागले. कालौघात खंडोबाची पूजा करणाऱ्या भाविकांची संख्या वाढत गेली. पुढे हा वृक्ष उन्मळून पडला आणि वृक्षाच्या मुळांमधून, जमिनीखालून खंडोबाची प्राचीन पाषाणमूर्ती प्रकट झाली. त्यामुळे हे खंडोबाचे स्थान असल्याचा भाविकांचा विश्वास दृढ झाला.
त्यानंतर खंडोबाच्या भक्तांनी एकत्र येऊन १९५३ मध्ये येथे छोट्या आकाराचे मंदिर बांधले. येथे नित्य पूजा व वार्षिक उत्सव सुरू झाले. त्या काळात चंपाषष्ठीची जत्रा पंधरा दिवसांची भरत असे. पुढे पन्नास वर्षांनंतर, म्हणजेच २००४ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार आला. वाढते शहरीकरण व रोज भरणारे बाजार यामुळे मंदिराची चंपाषष्ठीची पूर्वी पंधरा दिवस भरणारी यात्रा आता तीन दिवसांवर मर्यादित झालेली आहे.
या मंदिराच्या पुरोहितांची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. १९६० च्या दशकात मंदिराच्या वार्षिक जत्रेच्या निमित्ताने परभणीचे तत्कालीन खासदार शेषराव भाऊ देशमुख यांच्या पुढाकाराने विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वाघ्या-मुरळी लोककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मूळचे कौसाडी येथील रहिवासी असलेले लोककलाकार बन्सी यादुजी ढगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यांची ईश्वरभक्ती आणि उत्कृष्ट लोककला पाहून खासदार शेषरावभाऊ देशमुख यांनी मंदिराच्या पूजेची आणि दैनंदिन व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. तेव्हापासून त्यांचे वंशज ही जबाबदारी पार पाडत आहेत.
शहराच्या गजबजलेल्या भागात हे मंदिर स्थित असले तरीही मंदिर परिसरात पुरेशी मोकळी जागा उपलब्ध आहे. मंदिरासमोर वाहनतळ असून पेव्हर ब्लॉक आच्छादित मोकळे प्रांगण आहे. मंदिराची वास्तुरचना सभामंडप आणि अंतराळ अशा भागांमध्ये विभागलेली आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणाच्या पातळीपेक्षा उंचावर आहे. प्रवेशद्वारासमोरील प्रांगणाच्या दोन्ही बाजूंना भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत.
येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा असून त्यात प्रकाश आणि हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात प्रवेशद्वारासमोर जमिनीवर यज्ञकुंड आहे. मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त, सभामंडपास गर्भगृहाच्या डाव्या व उजव्या बाजूने प्रदक्षिणामार्गांवर जाणारी आणखी दोन स्वतंत्र द्वारे आहेत. सभामंडपाच्या पुढील भागात मंदिराचे गर्भगृह आहे. या गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांच्या एकाच पाषाणात कोरलेल्या मूर्ती आहेत. या देवमूर्तींवर पारंपरिक पितळी मुखवटे बसवले जातात. खंडोबाच्या मूर्तीच्या मस्तकावर फेटा बांधलेला असतो. मूर्तीच्या उजव्या बाजूला एक पितळी त्रिशूळ आहे.
गर्भगृहाच्या बाह्य बाजूने बंदिस्त प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराच्या छतावर चारही बाजूंनी सुरक्षिततेसाठी दगडी कठडा बांधलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या खालच्या तीन थरांमध्ये प्रत्येकी बारा देवकोष्टके आहेत व त्यांत विविध देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. शिखराचा सर्वात वरचा चौथा थर निमुळता होत जातो. शिखराचे हे सर्व थर पद्मदलमंडलाने म्हणजेच कमळाच्या पाकळ्यांच्या नक्षीने परस्परांपासून विभागलेले आहेत. शिखराच्या सर्वोच्च भागावर एकावर एक असे दोन दगडी आमलक व त्यावर सोनेरी कळस आहे.
प्रतिवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या काळात खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते. पौराणिक कथांनुसार, या कालखंडात भगवान खंडोबा आणि मणी-मल्ल या राक्षसांमध्ये युद्ध झाले होते. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाने या राक्षसांचा वध करून विजय मिळवला; त्यामुळे चंपाषष्ठी हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो. या सहा दिवसांच्या उत्सवात खंडोबाचे उपासक व भक्त कडक उपवास पाळतात. या दिवसांत अन्नातून वांगी आणि कांदा पूर्णपणे वर्ज्य केला जातो. चंपाषष्ठीच्या दिवशी पहाटे ४ वाजता वेदघोषात देवाचा अभिषेक आणि महापूजा संपन्न होते. त्यानंतर देवाचे प्रतीक मानले जाणारा ‘वारू’ म्हणजेच घोडा उधळला जातो. दुपारी ढोल-ताशांच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करत देवाची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघते. या सोहळ्यात भाविकांकडून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा सामूहिक जयघोष केला जातो. रात्रीच्या वेळी देवाच्या काठ्या नाचवत मिरवणूक काढली जाते. उत्सवादरम्यान मंदिर परिसरात व संपूर्ण शहरात भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण केली जाते. षष्ठीच्या दिवशी देवाला जोंधळ्याचा ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसणाची भाजी यांचा पारंपरिक नैवेद्य अर्पण केला जातो. याच महाप्रसादाचे ग्रहण करून भाविक आपला सहा दिवसांचा उपवास सोडतात. या उत्सवाचे स्थानिक महत्त्व लक्षात घेऊन या दिवशी परभणी शहरात शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. परभणी पालिकेच्या वतीने यात्रेनिमित्त खो-खो, कबड्डी, लंगडी, लांब उडी, दोरीवरच्या उड्या इत्यादी मैदानी खेळांच्या स्पर्धा आणि क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते.
या उत्सवाव्यतिरिक्त मंदिरात सोमवती अमावस्या, दसरा, दिवाळी आणि संपूर्ण श्रावण मास या काळात विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा, अमावस्या तसेच प्रत्येक रविवार व सोमवार या दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात खंडोबाचे दर्शन घेता येते.