रामायण हा हिंदू धर्मीयांसाठी एक प्रमाण ग्रंथ मानला जातो. श्रीरामांच्या चरित्रातील अनेक पात्रे स्वतःचा प्रभाव पाडतात. रामाचे बंधू लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न जितकी महत्त्वाची भूमिका बजावतात, तितकीच मोलाची भूमिका श्रीरामाचे एकनिष्ठ सेवक हनुमानाची आहे. चिरंजीवी हनुमान बालब्रह्मचारी असले, तरी त्यांच्या स्वेदबिंदूतून मगरीच्या पोटी मकरध्वज नावाचा पुत्र जन्मला. मकरध्वजाचे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर बीड जिल्ह्यातील चिंचवण गावात आहे. मकरध्वज हा या परिसराचा राजा आहे आणि तो दर्शनाला आलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
श्रीरामाचा निस्सीम भक्त हनुमान हा बालब्रह्मचारी मानला जातो, मात्र मकरध्वज हा त्यांचाच पुत्र असल्याचे पुराणांमध्ये सांगितले जाते. त्याच्या जन्माची कथा अशी की लंकेचे दहन केल्यानंतर शरीराचा दाह शमवण्यासाठी हनुमान समुद्रामध्ये स्नान करत होता. त्यावेळी त्याच्या घामाचा एक थेंब एका महाकाय मगरीच्या मुखात पडला. त्या घामातून त्या मगरीच्या उदरातून एका बालकाचा जन्म झाला, तोच हा मकरध्वज होय. अहिरावण या पाताळलोकाच्या राजाने या मकरध्वजाला आपल्या राज्याचा द्वारपाल म्हणून नियुक्त केले. रामायण युद्धाच्या काळात जेव्हा अहिरावणाने कपटाने श्रीराम आणि लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले, तेव्हा हनुमान त्यांना वाचवण्यासाठी तिथे पोहोचला.
0;-‘[]\तिथे पाताळाच्या प्रवेशद्वारावर हनुमानाचा सामना द्वारपाल असलेल्या स्वतःच्या पुत्राशी म्हणजेच मकरध्वजाशी झाला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले आणि या संघर्षात मकरध्वज हा आपलाच अंश असल्याची प्रचिती हनुमानाला आली. हनुमानाने मकरध्वजाला युद्धात पराभूत केले आणि पुढे अहिरावणाचा वध करून श्रीरामाची मुक्तता केली. श्रीरामाच्या आज्ञेनुसार हनुमानाने मकरध्वजाचा राज्याभिषेक केला आणि त्याला पाताळलोकाचा राजा बनवले. आजचे चिंचवण गाव हे त्यावेळच्या पाताळलोकाची राजधानी होती आणि तेव्हापासून येथे मकरध्वज मंदिर अस्तित्वात आहे, अशी भाविकांची धारणा आहे.
वडवणीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर चिंचवण गावात मुख्य रस्त्यालगत हे मंदिर आहे. हे मंदिर रामायण काळातील असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. अभ्यासकांच्या मते ते सातशे-आठशे वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात अनेक वृक्ष तसेच भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. अलीकडील काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी पाच गोलाकार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सभामंडपाच्या वितानावर (छतावर) सुंदर चक्रनक्षी कोरलेली आहे. अंतराळ हे सभामंडपापेक्षा काहीसे उंचावर असल्यामुळे तिथे जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना कठडे आहेत आणि त्या कठड्यावर गजराज शिल्पे आहेत. अंतराळात प्रवेशद्वार सोडून चारही बाजूंना कठडा आहे. या कठड्यात सर्व बाजूंना प्रत्येकी चार नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. स्तंभांवर विविध प्रकारचे संयुक्त नक्षीकाम आहे. स्तंभांच्या शीर्षभागी कणी आणि त्यावर पद्मशिल्पे साकारली आहेत. हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत आणि वितानावर चक्राकार नक्षी आहे. छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या अंतराळास बाह्य बाजूने लोखंडी जाळ्या लावून ते बंदिस्त करण्यात आले आहे.
अंतराळात मध्यभागी असलेले गर्भगृह काहीसे उंचावर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास एक पायरी आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या तिन्ही शाखांवर पानाफुलांची नाजूक नक्षी कोरलेली आहे. ललाटबिंबावर गणपती शिल्प व ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वारात वरील बाजूला गजतोरण आहे.
तोरणाच्या वर शंख व चक्र नक्षी तसेच दाक्षिणात्य शैलीतील शुभचिन्हे आहेत. प्रवेशद्वाराच्या नक्षीदार झडपांवर मयूर तोरण आणि पानाफुलांची नक्षी दिसते. प्रशस्त गर्भगृहात मागील भिंतीलगत असलेल्या वज्रपीठावर मकरध्वज देवाची काळ्या पाषाणातील प्राचीन कोरीव द्विभुज मूर्ती विराजमान आहे. मकरध्वज एका गुडघ्यावर वीर मुद्रेत बसलेला आहे आणि त्याच्या हातात गदा आहे. मूर्तीला लंगोट नेसवलेला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पायात तोडे, हातात कडे, दंडास बाजूबंद, गळ्यात विविध प्रकारचे हार, कानात कुंडले व डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीच्या मागे पाठशिळेवर संयुक्त नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आहे आणि या कठड्यात देवकोष्ठके आहेत. देवकोष्ठकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील पाच थरांचे चौकोनी शिखर आहे आणि या शिखराच्या प्रत्येक थरात ‘कुट’ व ‘शाल’ रचना आहेत. शिखराच्या सर्व थरात चारही बाजूंना असलेल्या देवकोष्ठाकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी चारही बाजूंना उपशिखरे आहेत आणि मध्यभागी स्तुपिका व त्यावर कळस आहे. या मंदिराच्या शेजारी प्रांगणात मणकावती देवीचे प्राचीन मंदिरही आहे.
मंदिरात पौष पौर्णिमा हा मकरध्वज जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. जन्मोत्सवाच्या निमित्ताने देवाचा पालखी सोहळा आयोजित केला जातो. देव पालखीत विराजमान होऊन ढोल-ताशांच्या गजरात व गुलाल उधळीत ग्रामप्रदक्षिणा करतात. हजारो भाविक देवाच्या पालखी सोहळ्यात मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. मंदिरात चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा इत्यादी सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या निमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मकरध्वज मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वर्षभर मोठी वर्दळ असते.