
नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. रेणुका मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत शक्ती उपासनेसोबतच दत्त संप्रदायाचाही मोठा प्रभाव आहे. माहूरगडाची रचना तीन प्रमुख शिखरांमध्ये विभागली गेली आहे. पहिले रेणुका मातेचे शिखर, दुसरे श्रीदत्त शिखर आणि तिसरे अत्यंत पवित्र मानले जाणारे माता अनसूया शिखर. सतीत्व आणि वात्सल्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या महासती अनसूया मातेचे मंदिर याच शिखरावर, निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. रेणुका देवीच्या दर्शनासोबत दत्त शिखर आणि अनसूया मातेचे दर्शन घेतल्यावर माहूरगडाची यात्रा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या स्थानाची आख्यायिका अशी की अत्रि ऋषींची पत्नी, माता अनसूया यांच्या पातिव्रत्याचा लौकिक त्रिभुवनात पसरला होता. ही कीर्ती कानांवर पडताच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नी, अर्थात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या मनात अनसूयेबद्दल मत्सर जागृत झाला. त्यांनी अनसूयेच्या सतीत्वाची परीक्षा घेण्याचा आपल्या पतींकडे हट्ट धरला. त्यांच्या आग्रहाखातर हे त्रिदेव साधूवेषात अत्रि ऋषींच्या आश्रमात दाखल झाले. तिथे त्यांनी अनसूयेला विवस्त्र होऊन भिक्षा वाढण्यास सांगितले. हे ऐकून माता अनसूया क्षणभर विचारात पडल्या. दारी आलेल्या भिक्षुकांना भिक्षा वाढली नाही तर आपले सत्त्व नाहीसे होईल व परपुरुषांसमोर विवस्त्र झाल्यानेही आपले सत्त्व नाहीसे होईल, हे अनसूया मातेच्या लक्षात आले. मग अनसूया मातेने आपल्या पतीचे स्मरण करून साधूंच्या अंगावर कमंडलूतील पाणी शिंपडले. त्यासरशी क्षणात त्या त्रिदेवांचे रूपांतर लहान बालकांमध्ये झाले. अनसूयेने त्या बालकांना मांडीवर घेऊन वात्सल्याने स्तनपान दिले आणि पाळण्यात जोजवले. अशा रीतीने त्रिदेवांच्या परीक्षेचा अंत झाला आणि तिथेच त्रिगुणात्मक अवतार असलेल्या दत्तात्रेयांचा जन्म झाला. ज्या भूमीवर ही अलौकिक घटना घडली, तेच हे पवित्र अनसूया माता मंदिर असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
या प्राचीन स्थानावरील हे मंदिर मुकुंद स्वामी यांनी १२९७ साली बांधल्याचे सांगितले जाते. हे मंदिर माहूर येथील एका उंच डोंगरावर आहे. मंदिराच्या पायथ्यापर्यंत पक्की डांबरी सडक आहे. पायथ्याशी असणाऱ्या वाहनतळापासून मंदिरापर्यंत वर जाण्यासाठी व खाली उतरण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेले दोन स्वतंत्र पायरीमार्ग आहेत. दोन्ही पायरीमार्गांवर सुरक्षा कठडे आहेत. वर जाणाऱ्या पायरीमार्गाच्या प्रारंभी सोनेरी रंगात रंगवलेली स्वागतकमान आहे. स्वागतकमानीत दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले असून तोरणावर ओम चिन्हाचे आकृतिशिल्प आहे. स्तंभांवर गरुड व हनुमान यांची शिल्पे आहेत.
मंदिराच्या सभोवती किल्लेवजा भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून प्रांगणात जाताना मधे चार स्तंभांवर उभा असलेला स्वागतमंडप दिसतो. या स्वागतमंडपाच्या छतावर चारही कोनांवर मेघडंबरी व सिंह शिल्पे आहेत. अनसूया मातेच्या मंदिरासमोर हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठावर हनुमानाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी अनसूया मातेच्या मंदिराची रचना आहे. सभामंडपात गोलाकार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. या सभामंडपात देवस्थानचे कार्यालय व देणगी कक्ष आहे. पुढे हेमाडपंती शैलीचे दगडी बांधकाम असलेले अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळाचे प्रवेशद्वार कमी उंचीचे व अरुंद आहे. त्याच्या ललाटबिंबावर कमळ फुलाची नक्षी आहे. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. द्वार शाखांच्या खालील बाजूस द्वारपाल शिल्पे व मंडारकावर कमळ फुलांची नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपीठावर अनसूया माता व श्रीदत्तात्रेय यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पिरॅमिड आकारातील उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
अनसूया माता मंदिराच्या सभामंडपाला लागून अनसूया मातेचे आई-वडील कर्दम ऋषी व देवहुती माता यांचेही मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी महादेवाचे लहान मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला अत्रि ऋषींचे मंदिर आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे आणि गर्भगृहातील वज्रपीठावर अत्रि ऋषींची मूर्ती आहे.
मंदिरात श्रीदत्त जयंती, शारदीय नवरात्रोत्सव, चैत्र पाडवा, राम नवमी, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक मासातील पौर्णिमेस मंदिरात जत्रोत्सव साजरा केला जातो. दररोज शेकडो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. अशी मान्यता आहे की ज्या दाम्पत्याला संततीची आस आहे, त्यांनी या मंदिरात येऊन मनापासून प्रार्थना केल्यास त्यांची इच्छा पूर्ण होते. दररोज सकाळी ६ ते ७ व सकाळी ८.३० ते रात्री ८ पर्यंत भाविकांना या मंदिरात अनसूया देवीचे दर्शन करता येते. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत पुजा व अभिषेकासाठी मंदिराची दारे बंद असतात.