वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे या गावातील महालक्ष्मी मातेच्या मंदिरास किमान ३५० ते ४०० वर्षांचा इतिहास आहे. येथील महालक्ष्मी ही नवसाला पावणारी आणि खासकरून माहेरवाशिणींच्या (माहेरी आलेल्या स्त्रिया) हाकेला धावून येणारी देवता आहे, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिराच्या उत्सवास येथे परिसरातील नागरिकांबरोबरच कामानिमित्ताने अन्यत्र स्थलांतरित झालेल्या चाकरमान्यांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या मंदिरामध्ये काही वीरगळ आणि सतीशिळा आहेत. त्यातून या गावाचा प्राचीन इतिहास शिल्पबद्ध झालेला आहे.
महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासाबाबत असे सांगण्यात येते की पूर्वी हे गाव कोल्हापूर संस्थानच्या बावडा महालाचा भाग होते. या भागात पूर्वी मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार तसेच यादवांची सत्ता होती. इ.स. १३१८ मध्ये मलिक कफूरने येथील यादवांचा पराभव केला. इ.स. १४८९ नंतर येथे आदिलशाही सत्ता निर्माण झाली. ती १६५९ पर्यंत येथे कायम होती. याच काळात उंबर्डे येथे या मंदिराची स्थापना झाली. याबाबतची आख्यायिका अशी की आदिलशाही राजवटीत रामचंद्र दळवी पाटील नामक सरदार त्याच्या सैन्यासह येथून राजापूरच्या गंगेच्या दर्शनासाठी चालला होता. त्यावेळी या गावामध्ये त्याला देवीचा दृष्टान्त झाला. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो तसाच पुढे निघाला. त्यावेळी अचानक त्याचे सैन्य आजारी पडले. तेव्हा त्याला देवीच्या दृष्टांताबद्दल आठवले आणि त्याने देवीची प्रार्थना केली. राजापूरला सुखरूप जाऊ दे. तेथून येताच तुझे मंदिर उभारीन, असे त्याने सांगितले. त्यानुसार नंतर त्याने उंबर्डे येथे हे मंदिर बांधले.
वैभववाडीपासून भुईबावडामार्गे गगनबावडा या मार्गावर उंबर्डे हे गाव आहे. येथे खास कोकणी पद्धतीचे हे देवीचे कौलारू मंदिर आहे. गावात या रस्त्यालगतच देवीच्या मंदिराची कमान दिसते. अकरा पायऱ्या चढून या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या दर्शनी भागातच एका चौथऱ्यावर पाच स्तरीय चौरसाकार दीपस्तंभ आहे. त्या समोरील चार पायऱ्या चढून मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात जाता येते. या मंदिराच्या बांधणीचे वैशिष्ट्य असे की येथे मोठ्या जागतीवर म्हणजे जोत्यावर ते बांधले आहे. जोत्यावर ओसरीसारखा प्रदक्षिणा मार्ग सोडून आतील बाजूस मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या प्रदक्षिणा मार्गावर दगडी खांब असून त्यावर मंदिराच्या शिखरापासून आलेले कौलारू छप्पर आहे.
प्रदक्षिणा मार्गावरील चार पायऱ्या चढून येथील सभामंडपात प्रवेश होतो. दगडी आणि लाकडी खांब, त्यावर भरभक्कम अशा तुळया आणि चारी बाजूंनी उतरते छप्पर अशी सभामंडपाची रचना आहे. सभामंडपात येताच नजरेत भरतात ते तेथे मधल्या बाजूस असलेले मोठे चौरसाकार दगडी खांब. हे खांब अखंड शिळेतून कोरलेले असून ते अनघड आहेत. हे खांब आणि त्यावरील तुळया यांची रचना हेमाडपंती स्थापत्यशैलीसारखीच आहे. येथे शीर्षस्तंभांवर लाकडी गोलाकार बसका स्तंभ, त्यावर चौकोनी पलगई आणि त्यावर तुळयांना आधार दिलेले अधिकच्या आकाराचे तरंगहस्त आहेत. या लाकडी तरंगहस्तांवर फुले, पक्षी, नक्षी, नागप्रतिमा असे कोरीवकाम केलेले आहे. एरवी अनेक मंदिरांतील तरंगहस्तांवर कीचक प्रतिमा कोरलेली दिसते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तरंगहस्तावर व्यालप्रतिमा आहेत. यांतून या मंदिराचे प्राचीनत्व अधोरेखीत होते. या सभामंडपात एका कोपऱ्यात वरच्या बाजूला छताखाली देवीची पालखी ठेवण्यात आलेली आहे.
सभामंडपापासून पुढच्या भागात गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या समोरील बाजूस पाच छोट्या कमानी आहेत. आत मध्यभागी एका वज्रपीठावर महालक्ष्मी देवीची पाषाणमूर्ती आहे. या मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूस विविध देवतांच्या प्राचीन दगडी मूर्ती आहेत. त्यात पद्मासनातील चतुर्भुज देवी, खड्गधारी देवी, तसेच पुढच्या बाजूने गोल बाक असलेले खड्ग घेतलेली देवता यांच्या मूर्ती आहेत.
गर्भगृहाच्या भिंतीस बाहेरच्या बाजूने टेकून एक सतीशिळा तसेच वीरगळ आहे. वीरगळ म्हणजे स्मृती शिळा आहे. पूर्वी युद्धात, गोधनाचे रक्षण करताना किंवा एखाद्या पवित्र कार्यासाठी एखाद्यास वीर मरण आले, तर त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ उभारला जात असे. तो सहसा उभा आयताकृती व वरच्या बाजूस त्रिकोणाकृती असा असे. त्यात शिल्पचौकटी असत. त्या द्वारे त्या वीरयोद्ध्याच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटलेला असे. असाच हा वीरगळ असून त्यातील खालील शिल्पचौकटीत युद्धाचा प्रसंग, त्यावर त्याचे पालखीतून प्रयाण आणि त्याच्यावरील दोन चित्रचौकटीत त्याच्या समवेत सती गेलेल्या वीरपत्नी असा हा वीरगळ आहे. बाजूच्या सती शिळेवर दोन सतींच्या मूर्ती व त्याच्या वरच्या बाजूस सतीचा हात कोरलेला आहे. या प्रतिमाही येथे श्रद्धापूर्वक पूजल्या जातात.
या मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला देवीचा मोठा उत्सव होतो. या वेळी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. नवरात्रोत्सवाच्या वेळी या मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. या मंदिरापासून पायी पाच मिनिटांच्या अंतरावर सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. संपूर्ण शुभ्र रंगात असलेल्या या मंदिरात काळ्या संगमरवरातील शिवपिंडी आहे. या मंदिराच्या मागील बाजूस दगडी बांधकामातील एक कुंड आहे. असे सांगितले जाते की या कुंडात बाराही महिने पाणी असते.