महालक्ष्मी मंदिर

रेंबवली, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

कोकणात पंचमहाभूतांचे सौम्य, सुंदर तसेच रौद्र व विक्राळ रूप पाहायला मिळते. त्याचप्रमाणे येथे पुजल्या जाणाऱ्या देवताही सौम्य आणि उग्र आहेत. येथे भूतनाथ, वेतोबा, चंडिका यांच्याबरोबर गणपती आणि महालक्ष्मी देखील पुजली जाते. असेच एक कोकणातील महालक्ष्मीचे प्रसिद्ध व कोकणी शैलीतील मंदिर देवगड तालुक्यातील रेंबवली गावातील नदीकिनारी स्थित आहे. हे मंदिर देवगड तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. ही महालक्ष्मी भक्तांच्या हाकेला धावून येणारी व नवसाला पावणारी असल्याची ख्याती आहे. त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी दररोज अनेक भाविक रेंबवली येथे येतात.

महालक्ष्मी हे आदिशक्तीचे एक रूप मानण्यात आले आहे. देवी माहात्म्यानुसार ही देवी सर्व जगाचे आदिकारण आहे. संस्कृतमध्ये लक्ष्म या शब्दाचा अर्थ चिन्ह असा आहे. त्यामुळे लक्ष्मी या शब्दाचा अर्थ शुभ चिन्हे असलेली व पर्यायाने कल्याणकारक असा होतो. ऋग्वेदातील खिलसूक्तीपैकी श्रीसूक्तात लक्ष्मी ही विष्णुपत्नी आहे व पुराणांतूनही तिचा विष्णुपत्नी म्हणून निर्देश येतो. याचप्रमाणे महालक्ष्मी म्हणजे दुर्गा असल्याचेही मानले जाते. महिषासुरमर्दिनी चंडीलाच महालक्ष्मी असे संबोधले जाते. या महालक्ष्मीचा कृपाप्रसाद आपणास मिळावा, याकरीता मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महाराष्ट्रात सर्वत्र श्रीमहालक्ष्मीचे व्रत केले जाते. या काळात तसेच नवरात्रोत्सवात रेंबवलीतील या मंदिरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी होते.

रेंबवली येथील महालक्ष्मी मंदिर हे किती प्राचीन आहे याची निश्चित माहिती अथवा नोंद उपलब्ध नाही; परंतु ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदू वशीक हे या देवीचे परम भक्त होते. आपले संपूर्ण आयुष्य महालक्ष्मीच्या सेवेत व्यतीत केल्यानंतर मृत्यूपश्चात आपल्याला देवीच्या चरणाशी जागा मिळावी म्हणून त्यांनी देवीच्या मंदिरातच संजीवन समाधी घेतली. वंदू वशीक महापुरुषाचे मंदिरात असलेले संजीवन समाधी स्थळ हे सुमारे तीनशे वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे मंदिर त्याहीपेक्षा अधिक प्राचीन असावे, असा अंदाज वर्तविला जातो. मंदिराच्या रचनेवरूनही त्याच्या प्राचिनतेची प्रचिती येते.

डोंगर-दऱ्यांतून वाहणाऱ्या नदी तीरावर असलेल्या या मंदिराच्या चारी बाजूस जांभ्या दगडाची सीमाभिंत आहे. या भिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूस एक प्राचीन तुलशी वृंदावन व चाफ्याचा जुना विशाल वृक्ष आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात एका बाजूला वंदू वशीक महापुरुषाचे संजीवन समाधी स्थळ आहे. मंदिरात प्रवेश करताच आधी येथे दर्शन घेऊन मग महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. दुसऱ्या बाजूस बाराच्या चाळ्याचे स्थान आहे. या स्थानावर भक्ष देण्याची प्रथा आहे.

सभामंडपात प्रत्येकी पाच स्तंभांच्या चार रांगा आहेत. सभोवतीचे स्तंभ जांभ्या दगडाचे व मधल्या दोन रांगेतील लाकडी स्तंभ दगडी पाट्यावर उभे आहेत. कोकणी स्थापत्य शैलीनुसर मधल्या रांगेतील लाकडी स्तंभांमधील जमीन काही इंच खोलगट आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपापासून पुढे असलेले अंतराळ हे काहीसे उंच आहे. सात पायऱ्या चढून त्यात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस उंच मोकळा भाग आहे. या भागात खाली चौकोनी व वर गोलाकार असलेले चार लाकडी स्तंभ आहेत. गर्भगृहातील मोठ्या परिघाच्या दगडी खांबांवर लाकडी तुळया आहेत. या तुळयांना आधार म्हणून बसवलेल्या लाकडी तरंगहस्तांवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. हे देवीचे मंदिर असल्याने देवीच्या वाहनांना या तरंगहस्तांवर स्थान देण्यात आलेले दिसते. या ठिकाणी हत्ती, व्याघ्र, सिंह, तसेच वृषभ यांच्या जोड्या कोरलेल्या आहेत. यातील वृषभाच्या जोडीमागे धावत-खेळत चाललेला बटू आणि हत्तीच्या शिल्पांमागे शांत बसलेला बटू अशा दोन वैशिष्ट्यपूर्ण शिल्पप्रतिमा आहेत. या तरंगहस्तांवर पाना-फुलांची नक्षीही कोरलेली आहे. त्यांना दिलेल्या रंगांमुळे या सर्व प्रतिमा उठून दिसतात.

गर्भगृहात एका कमी उंचीच्या वज्रपीठावर महालक्ष्मी देवीचे पाषाण आहे. या पाषाणावर मुकुट, विविध दागिने व भरजरी वस्त्रे परिधान केलेली आहेत. त्यामागे वैशिष्ट्यपूर्ण प्रभावळ आहे. महालक्ष्मी देवीच्या दोन्ही बाजूस वज्रपीठावर कुटुंब देवतांचे पाषाण आहेत. याशिवाय गर्भगृहात चार तरंगदेवता आहेत. कौलारू रचना असलेल्या या मंदिरातील सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अर्धखुल्या पद्‌धतीचे आहेत.

या मंदिरात विविध वार्षिक उत्सव साजरे होतात. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या हरिनाम सप्ताहाला येथे यात्रेचे स्वरूप येते. देवीला कौल लावून या सप्ताहाची तारीख निश्चित केली जाते. याशिवाय कार्तिकी एकादशी, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, पाच दिवस चालणारा शिमगा, डाळप स्वारी असे उत्सव भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. उत्सवांच्या वेळी देवीला महाअभिषेक घातला जातो. या वेळी देवीचा विविध दागिन्यांनी व उंची वस्त्राने शृंगार केला जातो. भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण, दशावतारी नाटक आदी कार्यक्रमांचे यावेळी आयोजन केले जाते. ग्रामस्थांसाठी व उत्सवासाठी आलेल्या भाविकांसाठी येथे महाभोजनाची व्यवस्था केली जाते.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून २८ किमी, तर मालवणपासून ४२ किमी अंतरावर
  • देवगडपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home