सावंतवाडी तालुक्यातील निसर्गसंपन्न डेगवे येथे वसलेले, १७व्या शतकातील महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर हे दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक आहे. येथील स्थापेश्वर हा परिसरातील ४८ खेड्यांचे आराध्यदैवत असल्याची मान्यता आहे. असे सांगितले जाते की महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर हे तालुक्यातील एकमेव दक्षिणाभिमुख देवस्थान आहे. शिवशंकरांचा रुद्रावतार समजला जाणारा स्थापेश्वर हाकेला धावणारा व नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ऐतिहासिक माहितीनुसार, तेराव्या शतकात कोकणापासून कर्नाटकापर्यंतच्या मोठ्या भागावर कदंब राजवंशाचे राज्य होते. गोवा ही या राजवंशाची राजधानी होती. सप्तकोटीश्वर शिव हे कुलदैवत असलेल्या कदंब घराण्यातील राजा जयकेशी दुसरा याचा पुत्र पेर्माडी याची राणी कमलादेवी हिने कर्नाटकातील संपगाव तालुक्यातील डेगाव किंवा डेगावे येथे इ.स. ११४७ च्या सुमारास कमल नारायण व महालक्ष्मीचे मंदिर बांधले होते. या कदंब राजवंशाचे वंशज दक्षिणाभिमुख मंदिरांचे बांधकाम करीत असत. सावंतवाडीतील मंदिरातून याचीच स्मृती जपली असावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे. असे सांगितले जाते की गावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, या हेतूने परिसरातील ४८ गावांतील १० मानकऱ्यांनी एकत्र येऊन १६२१ मध्ये हे मंदिर उभारून येथे स्थापेश्वर आणि महालक्ष्मीची प्रतिष्ठापना केली होती. पूर्वी या ४८ गावांतील न्यायनिवाडे करण्यासाठी मंदिरात विशेष चावडी भरत असे. येथे झालेल्या निवाड्यांची माहिती नंतर या गावांमध्ये दिली जात असे.
बांदा शहरापासून जवळ असलेले डेगवे हे निसर्गसमृद्ध गाव आहे. चारही बाजूंना हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या या गावातील सौंदर्यात नारळी-पोफळीच्या बागांमुळे आणखी भर पडते. आंबेखणवाडी, फणसवाडी, जांभळवाडी, बाजारवाडी, मोयझरवाडी, मिरेखणवाडी, वराडकरवाडी या सात वाड्यांनी मिळून हे गाव बनले आहे. येथील महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर एक एकर जागेत वसलेले आहे. या मंदिराच्या प्रांगणाभोवती दगडी सीमाभिंत आहे. या मंदिराची पांढऱ्या रंगाची आकर्षक वास्तू नागर वास्तुशैलीशी साम्य असणारी आहे.
मंदिरासमोर तारकाकृती आकारातील दगडी तुळशी वृंदावन आहे. हे वृंदावन रुंद चौथऱ्यावर उभारलेले आहे. तारकाकृती तळावर त्याच आकाराचा लहानसा स्तंभ व त्यावर उमलत्या कमलपाकळ्यांप्रमाणे असणारा शीर्षभाग यामुळे हे वृंदावन वैशिष्ट्यपूर्ण ठरते. रचनेवरूनच त्याची प्राचीनता लक्षात येते. या मंदिराचा जीर्णोद्धार २००७ ते २०१० या काळात करण्यात आला. मात्र त्यावेळी मुख्य गर्भगृहाचे स्वरूप कायम ठेवण्यात आले होते. उंच जगतीवर असलेल्या या मंदिराची संरचना दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. जमिनीपासून ११ पायऱ्या चढून मंदिराच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपात तीन कमानी आहेत. त्याच्या वरच्या भागात मोदकाच्या आकाराची तीन शिखरे, त्यावर आमलक व कळस आहेत. या मंडपावरील शिखरे, त्याच्या खालच्या बाजूस असलेल्या कमानी आणि त्यामागे दिसणारा सभामंडपाच्या पुढील भागातील पिरॅमिडसारखी रचना असलेले शिखर यामुळे मंदिरास प्राचीन ग्रंथात वर्णिलेला विमानाकार आला आहे.
मंदिराचा सभामंडप अत्यंत प्रशस्त आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या मंडपात बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अंतराळाचे लाकडी प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण कोरीव कामाने सजलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हातांत शंख, चक्र व गदाधारी द्वारपालांच्या कोरीव मूर्ती आहेत. द्वारललाटबिंबावर गणेशमूर्ती व त्यावरील भागात लाकडात कोरलेली शंकराची मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराच्या कवाडांवरील चौकटींत विष्णूच्या दहा अवतारांतील मूर्ती कोरलेल्या आहेत. अंतराळापासून काहीसे उंचावर येथील गर्भगृह आहे.
गर्भगृहाचे लंबवर्तुळाकार प्रवेशद्वार तीन शाखीय आहे व त्यावर वेलीफुलांची नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या वर मध्यभागी श्रीफळ-कलश आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस देवीचे वाहन असलेल्या सिंहांची दोन शिल्पे आहेत. गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर महालक्ष्मी व स्थापेश्वर यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती १९७६ मध्ये नव्याने घडवून येथे प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. सुमारे अडीच फूट उंचीच्या या दोन्ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहेत. स्थापेश्वराच्या उजव्या हातात तलवार व डाव्या हातात ढाल आहे. महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज आहे. या मूर्तींलगतच असलेल्या एका चौथऱ्यावर वाघाची पावले असलेले पाषाण आहे.
मंदिराच्या अंतराळाच्या वर उलट्या चषकाच्या आकाराचे शिखर आहे. त्यावर छोटा मोदकाकार आमलक आहे. गर्भगृहावरील शिखर गोलाकार व वर निमुळते होत जाणारे आहे. हे शिखर आमलकासह एकूण चार स्तरीय आहे. त्यातील खालून दुसऱ्या स्तरावर सर्व बाजूंनी असलेल्या देवकोष्टकांत शंकर, पार्वती आदी देवतांच्या मूर्ती आहेत; तर त्याच्यावर तिसऱ्या स्तराच्या तळाशी विनायकांच्या मूर्ती आहेत. या शिखराच्या तळाशी चारी कोपऱ्यांत छोटी गोल स्तंभाकार शिखरे आहेत.
मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी देवाचा वार्षिक जत्रोत्सव होतो. त्यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. नोकरी-व्यवसायानिमित्त विविध भागांत स्थायिक झालेले येथील ग्रामस्थ या उत्सवासाठी आवर्जून येथे येतात. जत्रेच्या दिवशी सकाळी ७ वाजता ब्राह्मणांच्या हस्ते मूर्तींवर अभिषेक केला जातो. त्यानंतर स्थापेश्वर व महालक्ष्मीच्या मूर्तींना वस्त्र व अलंकार परिधान करून त्यांची सजावट केली जाते. त्यानंतर पालखीला फुलांनी सजवण्यात येते. उत्सवादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मानकरी स्थापेश्वर आणि महालक्ष्मीच्या उत्सवमूर्तींना साकडे घालतात. त्यानंतर उत्सवमूर्तींना पालखीत विराजमान केले जाते आणि मंदिराभोवती पालखीची वाजतगाजत प्रदक्षिणा घातली जाते. पालखी गर्भगृहात आणल्यानंतर १२ मानकरी आपापल्या मानाप्रमाणे देवीच्या ओट्या भरतात. त्यानंतर पाच कुळकारी, स्थळकारी व डेगवेतील पाच मानकरी ओटी भरतात. त्यानंतर भाविकांमार्फत ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होतात. रात्री १२ च्या सुमारास मानकरी पालखीसह मंदिराला प्रदक्षिणा घालतात. पालखी पुन्हा मंदिरात आल्यावर रात्री उशिरा दशावतार नाट्यप्रयोग होतो. दुसऱ्या दिवशी दशावतार कलाकारांचा दहीकाला झाल्यावर उत्सवाची सांगता होते.
२०१० पासून मंदिरात गुढीपाडव्याच्या दिवशी लक्षदीप सोहळा होतो. त्या दिवशी सकाळी मूर्तींना अभिषेक घातल्यानंतर त्यांना वस्त्रे नेसवण्यात येतात. त्यानंतर सत्यनारायण महापूजा होते. ४८ गावांतील मानकऱ्यांपैकी इच्छुकांना पूजेचे यजमानपद दिले जाते. यावेळी सुमारे तीन हजार दिवे उजळवले जातात. ‘भाविकांच्या जीवनात तेज येवो’, असे साकडे यावेळी देवांना घालण्यात येते. याप्रसंगी मंदिर परिसरातील विजेचे दिवे बंद केले जातात. केवळ प्रज्वलित केलेल्या दिव्यांच्या प्रकाशात हा संपूर्ण परिसर उजळून निघतो. या उत्सवांशिवाय येथे नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.