साडेतीन शक्तिपीठांची संकल्पना ही ओंकाराच्या साडेतीन मात्रांशी निगडित आहे. या पीठांना औट पीठे असेही म्हटले जाते. याच औटपीठांतील एक पूर्ण पीठ म्हणजे कोल्हापुरातील महालक्ष्मीचे मंदिर. ही देवी अंबाबाई या नावानेही ओळखली जाते व मूळ प्रकृती आदिमाया भगवती मानली जाते. अनेक शतकांचा इतिहास असलेल्या आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर वा करवीर या क्षेत्रामध्ये वसलेले अंबाबाईचे मंदिरही अत्यंत प्राचीन आहे. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येथे येत असतात.
‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथावर आधारलेल्या ‘देवी माहात्म्य’ या ग्रंथामध्ये महालक्ष्मी ही आदिमाया असल्याचे नमूद केलेले आहे. त्यात असे म्हटले आहे की ‘सर्वांची आदी जाण। महालक्ष्मी आहे आपण। सर्व जगाची परमेश्वरी पूर्ण। त्रिगुण स्वरुपा आहे ती।।’ कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या देवीची ही त्रिगुण रूपे पाहावयास मिळतात. येथे महालक्ष्मीबरोबरच महाकाली आणि महासरस्वती विराजमान आहे. देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांची योग्य अशी स्त्री-पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न
करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. अशा प्रकारे महालक्ष्मी ही मूळ प्रकृती असल्याची तिच्या भक्तांची धारणा आहे. याचा अर्थ असा की ही देवी ब्रह्मा, विष्णू व महेश इत्यादी देवतांपैकी कुणाचीही गौण सहचारिणी नाही, तर ती साक्षात् ब्रह्मरूपिणी, विश्वाची जननी, पोषिणी आणि संहारिणी आहे.
कोल्हापूरमध्ये या देवीची स्थापना कशी झाली याबाबतची एक आख्यायिका सांगण्यात येते, ती अशी- ब्रह्मदेवास गय, लवण आणि कोल्हासुर नावाचे तीन पुत्र होते. यातील कोल्हासुरास रक्षालय (आजचे कोल्हापूर) येथे असलेल्या केशी या राक्षसाचे पारिपत्य करण्यासाठी ब्रह्मदेवाने पाठवले. त्याने येथे येऊन केशीचा पराभव केला आणि तो येथील राजा बनला. कोल्हासुराच्या पत्नीचे नाव कदम्बा असे होते. त्यांना करवीर, विशाल, कुलंधक आणि लज्जासुर ही चार मुले होती. कोल्हासुराने त्या चौघांमध्ये राज्याचे वाटप केले व तो तपस्येसाठी जंगलात गेला. त्याच्या चारी मुलांनी लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव आणि इंद्र यांनी त्या चौघांचाही वध केला. ते समजताच कोल्हासुर क्रोधित झाला. त्याने देवी महालक्ष्मीची पूजा केली आणि तिला शंभर वर्षांसाठी हे स्थान सोडून जाण्यास सांगितले. त्यानुसार देवी हिमालयात गेली. त्यानंतर कोल्हासुराने स्थानिक लोकांचा छळ आरंभला. त्यामुळे सर्व देवतांनी त्याच्यापासून मुक्ती मिळावी म्हणून देवीची याचना केली. तेव्हा देवी येथे परतली. कोल्हासुराने या स्थानाच्या पूर्वेस रक्तलोल, पश्चिमेस रक्ताक्ष, उत्तरेस रक्तभोज आणि दक्षिणेस रक्तबीज या राक्षसांची नियुक्ती केली होती. देवीने त्या क्षेत्रावर आक्रमण करून या राक्षसांचा वध केला. तसेच अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी देवीने कोल्हासुराचा वध केला. त्यावेळी कोल्हासुराने देवीकडे अशी याचना केली की या क्षेत्राला माझे नाव द्यावे. हे तीर्थ गया क्षेत्राप्रमाणेच पवित्र व्हावे आणि दर वर्षी येथे कोहळा फोडला जावा. अशा प्रकारे या क्षेत्रास कोल्हापूर हे नाव प्राप्त झाले.
‘स्कंद पुराणा’च्या ‘काशीखण्डा’मध्येही ही कथा येते. त्यात असे म्हटले आहे की – ‘त्रैलोक्यं कोलरूपेण त्रासयन्तं महासुरम् । विनीहत्य स्थितां तत्र रामये कोलापुरे पूरे।।’ म्हणजे – एक महान असुर कोल्हाचे रूप धारण करून तिन्ही लोकांस त्रास देत होता. देवीने त्याचा वध केला आणि तेव्हापासून देवी कोल्हापूर येथे राहू लागली. ‘लक्ष्मी अष्टकम्’मध्येही याबाबत ‘नमस्ते गरुडारूढे, कोलासुरभयंकरी।सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते।।’ म्हणजे गरुडावर आरूढ असलेल्या कोल्हासुराचा नाश करणाऱ्या व सर्व पापांचे हरण करणाऱ्या देवी लक्ष्मीस वंदन असो, असे म्हटलेले आहे.
देवीच्या स्थानामुळे कोल्हापुरास औट पीठांच्या गणनेत पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. ‘देवीभागवता’च्या सातव्या स्कंधामधील अडतिसाव्या अध्यायात ‘कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मीः सदा स्थिता। मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम्। तुलजापुरं तृतीयं स्यात् सप्तशृंगं तथैव च।’ असे म्हटलेले आहे. यानुसार कोल्हापूर हे महास्थान, माहूर दुसरे, तुळजापूर तिसरे पीठ व सप्तशृंगगड हे अर्धपीठ आहे. मत्स्य, पद्म आणि स्कंद या महापुराणांत अष्टोत्तरशत शक्तिपीठांच्या नामावलीतही ‘करवीरे महालक्ष्मी’ असा उल्लेख आहे. त्यानुसार महालक्ष्मी ही करवीरची अधिष्ठात्री देवता आहे. यामुळे शक्तीच्या उपासक संप्रदायात कोल्हापूर हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
‘श्री करवीर माहात्म्य’ या ग्रंथात या क्षेत्राचे माहात्म्य व आख्यायिका नमूद करण्यात आल्या आहेत. या ग्रंथात महालक्ष्मीस विष्णुप्रिया लक्ष्मी असे म्हटलेले आहे, हे विशेष. ‘करवीर महात्म्य ग्रंथ सुंदर। हे बहात्तर गणंचे गोपूर। लक्ष्मीसह रमावर। क्रीडा करी तयावरी ।।’ असे त्यांनी म्हटले आहे. करवीर माहात्म्य हा ग्रंथ दाजीबा जोशीराव यांनी १८२१ ते १८३२ या कालखंडात म्हणजे पेशवाई संपून इंग्रजांची राजवट सुरू झाल्यानंतरच्या काळात लिहिला. त्यात त्यांनी शिवपरिवारातील महालक्ष्मीस विष्णुपत्नी असे स्वरूप दिले. विश्वकोशातील नोंदीनुसार, भारतीय परंपरेत लक्ष्मी हे विष्णुपत्नीचे नाव आहे. मात्र महा हे विशेषण लावून बनवलेला महालक्ष्मी हा शब्द कधी विष्णुपत्नी या अर्थाने, तर कधी शिवपत्नी या अर्थाने वापरण्यात आल्याचे आढळते. ‘देवीकोशा’त या संदर्भात असे म्हटले आहे की कोल्हापूरखेरीज अन्य ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती बनवायची असेल तर ती विष्णुपत्नी आहे, असे मानून मूर्ती बनवली जाते. याचा अर्थ कोल्हापूर येथील महालक्ष्मीस शिवपत्नी पार्वतीच्या रूपात मानले गेले आहे.
येथील महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याचा निश्चित इतिहास अद्याप अज्ञात आहे. मात्र बहुतेक इतिहासकारांच्या मते, मंदिराच्या बांधकामास चालुक्यराजाच्या काळात प्रारंभ झाला. पराक्रमी चालुक्य राजा पुलकेशी दुसरा (इ.स. ६१० ते ६४२) याच्या काळात, इ.स. ६२४ मध्ये त्याच्या कर्णदेव नावाच्या सुभेदाराने मंदिराचे गर्भागार बांधले. मंदिर स्थापत्याचे अभ्यासक योगेश प्रभुदेसाई यांच्यानुसार, कांचीच्या चोल राजाने कल्याणीच्या चालुक्यांवर आक्रमण केले, त्यावेळी चोल राजाने कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना अकराव्या शतकात घडली. हे मंदिर पेटवून देण्याचा प्रयत्न तेव्हा झाला, याचा अर्थ तोवर मंदिराचे बांधकाम लाकडातील असावे, असा कयास मांडण्यात आला आहे.
यानंतर चालुक्यांनी सध्याचे दगडी देवालय बांधले असावे. काही इतिहासकारांच्या मते, चालुक्यांचे एकेकाळी मांडलिक असलेल्या सिंद राजांनी या देवालयाचे बांधकाम केले. सिंद राजे हे कऱ्हाड (करहाटक) आणि कोल्हापूरच्या काही भागावर राज्य करीत होते. ते स्वतःला फणींद्रवंशीय (नागवंशीय) म्हणवीत असत. त्यांच्या राजवटीत मुख्य मंदिराला महाकाली व महासरस्वती या देवतांची मंदिरे जोडली गेली आणि हे मंदिर एककूट होते, ते त्रिकूट झाले.
शिलाहार राजवंशाचा या मंदिराशी निकटचा संबंध आहे. ‘मुसलमानपूर्व महाराष्ट्र’ या ग्रंथात वा. कृ. भावे यांनी असे नमूद केले आहे की शिलाहार राजा मारसिंह (१०५५-१०७०) याची किलगिल दुर्ग (कागल) ही राजधानी होती. त्याने महालक्ष्मीच्या मंदिराचा विस्तार केला, असे मानले जाते. गंडरादित्य व भोज हे त्याचे पुत्र होत. यातील गंडरादित्याने मंदिरावर कळस चढवला. या गंडरादित्याचा नातू दुसरा भोज हा सत्तेवर आल्यानंतर त्याने कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरास दान दिले होते. त्याच्या नागरी लिपीतील व संस्कृत भाषेतील एका शिलालेखात, कोपरवाडाजवळचे एक शेत आणि पावा नावाचे एक गाव ब्राह्मणांना आणि उमामहेश्वर व महालक्ष्मी या देवतांच्या पूजा-अर्चेसाठी अग्रहार दिल्याची नोंद आहे.
महालक्ष्मी ही शिलाहारांची कुलदेवता होती. त्याचप्रमाणे चालुक्य, कदंब, तसेच यादव राजांचीही महालक्ष्मीवर श्रद्धा होती. गोव्याचा कदंब राजा षष्ठदेव दुसरा याच्या शक ९३२ च्या (इ.स.१०१०) ताम्रपटात ‘श्रीकोल्लापुरमेत्य येन च श्रीमहालक्ष्मी समाराधिता’ असे वर्णन आहे. याच प्रमाणे महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील गणेश मंदिराच्या पायऱ्यांच्या उजव्या बाजूस असलेल्या स्तंभावर यादव राजा सिंघणदेव याच्या अमदानीतील शिलालेख कोरलेला आहे. नागरी लिपी व संस्कृत भाषेत असलेला हा लेख शके ११४०, बौद्धायन संवत्सर (इ.स. १२१८)मधील आहे व त्यात तैलण नामक व्यक्तीने महालक्ष्मी मंदिराच्या समोर तोरण बांधले, असे नमूद केले आहे.
या मंदिराच्या पश्चिम द्वारासमोरील पायऱ्यांसमोर यादव नृपती जयसिल यांचा शिलालेख सापडला होता. ‘सोमवार, माघ शुद्ध १५, दुर्मुखी संवत्सर, शके ११५८’ (इ.स. १२३६) रोजी कोरलेल्या या लेखात जयसिल याने चंद्रग्रहण प्रसंगी सौवर्ण जटेश्वराला धूप, दीप, नैवेद्य दाखवण्यासाठी काही सरकारी उत्पन्न दान दिले असे नमूद करण्यात आले आहे. या मंदिराच्या आवारातील नवग्रह मंदिराच्या रंगमडपाच्या स्तंभावर यादव नृपती महादेव याच्या अमदानीतील शिलालेख आहे. ‘शके ११८७, क्रोधन संवत्सर, माघ शुद्ध पौर्णिमा’ (शुक्रवार, २२ जाने १२६६) रोजीच्या या लेखाचा मुख्य उद्देश ‘पंडित कनकचंद्र आणि हेगडे वसवदेव यांनी ईश्वरकेशव व नरसिंह यांना नेमादेवी बसतीची व्यवस्था ठेवण्यासाठी काही जमीन देणगी दिली आहे,’ हे सांगणे हा होता. या सर्व बाबींवरून महालक्ष्मी देवालयाचे पुरातनत्व स्पष्ट होते.
चौल राजाने ज्या प्रमाणे हे मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्याच प्रमाणे बहामनी व आदिलशाही सुलतानांनी १४व्या व १५व्या शतकात या मंदिराची नासधूस केली होती. मेजर डी. सी. ग्रॅहम यांच्या १८५४ मधील ‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट ऑफ द प्रिन्सिपॅलिटी ऑफ कोल्हापूर’ या ग्रंथात याचा उल्लेख आहे. त्यावेळी या मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती एका घरात लपवण्यात आली होती. पुढे इ.स. १७२२ मध्ये छत्रपती दुसरे संभाजी यांनी त्या मूर्तीची आज असलेल्या देवालयात प्रतिष्ठापना केली. या प्रतिष्ठापनेसाठी दुसरे संभाजीराजे यांनी पन्हाळा किल्ल्यावरून सिधोजी हिंदुराव घोरपडे यांना कोल्हापूरला पाठवले होते, अशी नोंद आहे.
कोल्हापूर शहरातील एका टेकाडावर महालक्ष्मीचे हे मंदिर स्थित आहे. शहरवस्तीमुळे हे टेकाड लक्षात येत नसले, तरी मंदिराच्या पश्चिमेकडील उतार रंकाळा तलावापर्यंत जात असल्याचे दिसते. तीन शिखरे असलेल्या (त्रिकूट) या मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीतील आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराचे प्रांगण पंचकोनी व प्रशस्त आहे व त्यास दगडी फरसबंदी आहे. प्रांगणास एकूण चार महाद्वारे आहेत. यातील पश्चिमेस असलेल्या मुख्य महाद्वारावर नगारखाना आहे. या महाद्वारातून देवीची मूर्ती दिसते. प्रांगणाच्या उत्तर महाद्वारावर एक मोठी घंटा होती. त्यामुळे त्यास घाटी दरवाजा असे म्हणतात. ही घंटा राजर्षी शाहू महाराज यांनी बसवली होती. या घंटेवर ‘Ava Maria Gratia Dominus Tecum Ihs’ (हेल मेरी. पूर्ण कृपेने प्रभु तुझ्यासोबत आहे.) असे पोर्तुगीज वाक्य कोरलेले आहे. ही घंटा १६८३ मध्ये गोव्यातील युद्धानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कोल्हापुरात आणल्याचे मानले जाते. याच घाटी दरवाजाजवळ नवग्रह मंदिर आहे. दक्षिणेकडील महाद्वार विद्यापीठ दरवाजा, तर पूर्वेकडील पूर्वा दरवाजा म्हणून ओळखले जाते.
महालक्ष्मी मंदिराची संरचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. येथील सभामंडपास मणिमंडप असे म्हणतात. मंदिराच्या पश्चिम महाद्वारातून प्रांगणात प्रवेश करताच समोर मुखमंडप आहे. गरुड मंडप हा त्याचाच एक भाग. १८४४ ते १८६७ या काळात त्याचे बांधकाम करण्यात आले. या मंडपाच्या दोन्ही बाजूंस असलेल्या देवकोष्टकांमध्ये कोरीव मूर्ती आहेत. या भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती असल्याचे सांगण्यात येते. या मूर्ती जैन द्वारपालांच्या असल्याचे काहींचे मत आहे. अश्विन नवरात्रोत्सवात याच मंडपातील दगडी चौथऱ्यावर महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा प्रतिष्ठापित केली जाते.
मुखमंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक (आता हे द्वार बंद केलेले आहे.) गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. समोरच सभामंडप (मणिमंडप) आहे. त्याच्या पाठीमागील बाजूस जय आणि विजय या द्वारपालांच्या कोरीव मूर्ती आहेत. याबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की या जय आणि विजय यांनी एका रात्रीत महालक्ष्मीचे मंदिर बांधले. त्यामुळे या मूर्तींच्या बाजूला बांधकामाची अवजारे कोरलेली आहेत. सभामंडपास दोन्ही बाजूंना दोन प्रवेशद्वारे आहेत. त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारातून महाकालीच्या मंदिरात तर दक्षिणेकडील द्वारातून महासरस्वतीच्या मंदिरात प्रवेश होतो. या सभामंडपास महानाटमंडप असेही म्हटले जाते. या मंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील रुंद व कोरीव काम केलेले अनेक पाषाण स्तंभ. येथे असलेल्या दर्शनरांगेतून सर्वप्रथम महाकालीचे दर्शन होते. त्यानंतर महाकाली व महासरस्वतीचे दर्शन होते. मंदिराच्या अंतराळातही सभामंडपाप्रमाणेच रुंद कोरीव स्तंभ आहेत. हे सर्व बांधकाम वेसर स्थापत्यशैलीतील आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहास कोरीव काम केलेली द्वारचौकट आहे. या चौकटीच्या ललाटबिंबस्थानी महाकालीची छोटी मूर्ती कोरलेली आहे. या ठिकाणी श्रीयंत्र तसेच एका देवकोष्टकात गणेशाची मूर्तीही स्थापन केलेली आहे.
गर्भगृहात उंच वज्रपीठावर महालक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती बेसॉल्ट म्हणजेच काळ्या पाषाणातून कोरलेली आहे. १.२२ मीटर उंचीची ही मूर्ती उभी म्हणजेच स्थानक स्वरूपाची आहे. मूर्ती चतुर्भुज आहे व तिच्या मागील उजव्या हातात गदा व डाव्या हातात ढाल आहे. पुढच्या उजव्या हातात म्हाळुंगे (बीजपूरक) हे फळ आहे, तर डाव्या हातात पानपत्र आहे. या मूर्तीसोबतच सिंहमूर्तीही आहे. त्यामुळे अंबाबाईस सिंहवाहिनी असेही म्हटले जाते. मूर्तीच्या मस्तकावर साडेतीन वेटोळे असलेला नाग व त्यामागे लिंग आहे. यावरून ही मूर्ती शैव परिवारातील असल्याचे स्पष्ट होते. मंदिराच्या या गर्भगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे यात न्हाणीघर, कोठार व शेजघर अशी दालने आहेत. याच प्रमाणे या गर्भगृहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते दुमजली आहे. त्याच्या दुसऱ्या मजल्यावरही मंदिर आहे. महालक्ष्मीच्या मंदिराच्या डावीकडे असलेल्या जिन्याने येथे जातात. या मंदिरात आद्यलिंग किंवा मातृलिंग प्रतिष्ठापित आहे. लिंगासमोर नंदीची मूर्ती विराजमान आहे. हे मातृ वा मातुलिंग १२व्या शतकात, यादव राजवटीत प्रतिष्ठापित करण्यात आले असे सांगण्यात येते. महालक्ष्मीच्या मूर्तीच्या मस्तकावरील शिवलिंगाचे दर्शन भाविकांना होत नसल्याने येथे मातृलिंग स्थापन करण्यात आले असे सांगण्यात येते.
उंच जगतीवर बांधलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या बाह्य भागावरही सुंदर कोरीवकाम करण्यात आले आहे. काळ्या पाषाणात बांधलेल्या भिंतीमध्ये काही अंतरावर देवकोष्टके आहेत. त्यात वादक आणि सुरसुंदरी, यक्ष, योद्धे यांच्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत. एका देवकोष्टकामध्ये श्रीकृष्णाची मूर्तीही आहे. मंदिराच्या प्रांगणात शेषशायी नारायण, दत्तात्रय, गणपती, नवग्रह, विठ्ठल-रखुमाई आदी अनेक देवतांची मंदिरे आहेत. यातील पूर्वेकडील महाद्वाराच्या बाजूस असलेले शेषशायी मंदिर, तसेच घाटी दरवाजानजीकचे नवग्रह मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेषशायी मंदिर हे अष्टकोनी आकाराचे आहे. त्याच्या अप्रतिम कोरीव कामाने सुशोभित अशा घुमटाच्या काठावर अनेक जैन तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर तीर्थंकर नेमीनाथ यांचे असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे त्यात भगवान विष्णूंची शेषावर विराजमान मूर्ती आहे.
नवग्रह मंदिरात उंच चौथऱ्यावर नऊ ग्रहांच्या, तसेच महिषासुरमर्दिनीची मूर्ती व शिवलिंग आहे. हे मंदिर १९४१ मध्ये श्रीमंत जहागीरदार बाबासाहेब घाटगे यांनी बांधले. या मंदिरासमोरच एक छोटा खुल्या प्रकारचा सभामंडप आहे. हा सभामंडप यादव काळातील आहे. त्याच्या छतावर आतील बाजूने नऊ ग्रहांची, तसेच अष्टदिक्पालांची सुबक शिल्पे कोरलेली आहेत. याच्या एका स्तंभावर यादव नृपती महादेव याच्या अमदानीतील शिलालेख आहे.
कोल्हापूरची महालक्ष्मी वा अंबाबाई ही संपूर्ण महाराष्ट्राचीच कुलदेवता असल्याने तिच्या दर्शनासाठी, तसेच नवस फेडण्यासाठी येथे रोज हजारो भाविक येत असतात. दर शुक्रवारी, चैत्र वद्य प्रतिपदेस, तसेच अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही महिन्यांच्या पौर्णिमेस देवालयाच्या प्रांगणातून देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात, हजारो भक्तांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. अश्विन पंचमीला कोल्हापूरपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या टेंबलाईच्या मंदिरापर्यंत महालक्ष्मीची पालखी मिरवणुकीने नेली जाते.
या मंदिरातील आणखी एक महत्त्वाचा व मंदिर स्थापत्याचा चमत्कार म्हणून गणला गेलेला उत्सव म्हणजे किरणोत्सव होय. येथे दरवर्षी ३१ जानेवारी आणि ९ नोव्हेंबर रोजी सूर्याची किरणे महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. त्यानंतर १ फेब्रुवारी व १० नोव्हेंबर रोजी ती देवीच्या छातीपर्यंत पोचतात, तर २ फेब्रुवारी व ११ नोव्हेंबर रोजी सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात. हा किरणोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशांतून भाविक येथे येतात.