महालसा संस्थान

म्हार्दोळ, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा

गोव्यातील असंख्य भाविकांची आराध्यदेवता, तसेच कऱ्हाडे आणि पद्ये ब्राह्मण समाजाची कुलदेवता असलेली महालसा देवी हा भगवान विष्णुचा स्त्री अवतार आहे. सूर-असुरांनी केलेल्या समुद्रमंथनावेळी विष्णूने धारण केलेला मोहिनी अवतार म्हणजेच महालसा होय. ती विष्णूचा अवतार असल्यामुळे तिला महालसा नारायणी असे म्हणतात. म्हार्दोळ या गावातील देवीचे मंदिर गोमंतकांतील सर्वांत मोठ्या मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिरातील जत्रोत्सव आणि नवरात्रोत्सव या दोन उत्सवांस गोव्यासोबतच महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.

या देवीची पौराणिक आख्यायिका अशी की देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, सुरा, हालाहल विष, धन्वंतरी, चंद्र, कामधेनू, ऐरावत, रंभा-मेनका, सप्तमुखी उच्चैःश्रवा अश्व, शारंग धनुष्य, पांचजन्य शंख आणि अमृत ही चौदा रत्ने प्राप्त झाली. यातील अमृताच्या कुंभावरून देव आणि दैत्यांमध्ये भांडण सुरू झाले. तेव्हा तो लढा युक्तीने मिटवण्यासाठी विष्णूने विश्वसुंदरी सुमनोहर मोहिनीचे रूप धारण केले. तोच महालसा अवतार होय. देव आणि दैत्यांना अमृत वाटप करताना राहु व केतू हे देवांचा वेष घेऊन देवांच्या पंक्तीत येऊन बसले. ते अमृत प्राशन करीत असताना चंद्र, सूर्याने त्यांना ओळखले व मोहिनीला त्याची माहिती दिली. त्याबरोबर मोहिनीने त्यांचा शिरच्छेद केला, अशीही पौराणिक कथा आहे.

ही देवी गोमंतकात कशी आली याची कथा अशी की परशुरामाने गोमंतक वसवला व त्यानंतर आपल्या दिग्विजयार्थ एक यज्ञ केला. त्याच्या सिद्धीसाठी उत्तरेकडील त्रिहोत्रपूर (तिरहूत. सध्याच्या बिहार राज्यातील गंगेच्या उत्तरेकडील भाग.) येथून भारद्वाज, कौशिक, वत्स, कौंडिण्य, कश्यप, वसिष्ठ, जमदग्नी, विश्वामित्र, गौतम आणि अत्री अशा तपस्वी विद्वान सारस्वत ब्राह्मणांना गोमंतकात आणले. या ब्राह्मणऋषींची ६६ कुळे होती. त्यांनी आपल्यासमवेत आपली मंगेशी, महालक्ष्मी, महादेव, शांतादुर्गा, नागेश, सप्तकोटेश्वर आणि महालसा ही कुलदैवतेही येथे आणली. त्यात महालसा देवीचा समावेश होता. वेरणे हे गाव महालसादेवीचे आदिस्थान होय. येथे डिसेंबर १५६७ पूर्वी महालसादेवीचे मंदिर असल्याच्या नोंदी आहेत. हे देवालय असलेल्या जागेस जुने म्हाड्डोळ वा जुने म्हार्दोळ असे म्हणतात. तेथे स्वयंम् भगवान परशुरामाने महालसा देवीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. ‘देवभूमी गोमंतक’ या मंदिर अभ्यासक विनायक नारायण शेणवी धुमे यांच्या ग्रंथानुसार, इसवी सनाच्या अकराव्या शतकात तत्कालिन राज्यकर्त्यांच्या पदरी असलेल्या म्हाळू पै या कौशिक गोत्री सारस्वत ब्राह्मण सरदाराने वेरणे या गावामध्ये महालसादेवीचे भव्य देवालय बांधले होते.

पुढे गोमंतकात १५१० साली पोर्तुगीज फिरंग्यांचा प्रवेश झाला. या पोर्तुगिजांनी वेरणे येथील महालसा देवीचे देवालय व मंडप उद्‌ध्वस्त केल्याच्या आणि मूर्ती फोडून टाकल्याची नोंद १२ डिसेंबर १५६७च्या एका पत्रात आढळते. हे पत्र ‘डोकुमेंता इंडिका’ या ग्रंथाच्या सातव्या खंडात असून ते जेसुईट पाद्री फ्रै. गोमीस व्हाज याने गोव्याहून पाठवले होते. मात्र फोडून टाकलेली मूर्ती महालसा देवीची नव्हती. ती मूर्ती किंवा देवीचे प्रतिक त्या आधीच गावकऱ्यांनी अंत्रुज महालातील (हल्लीचा फोंडा तालुका) प्रियोळ गावात स्थलांतरीत केली होती. महालसा नारायणी संस्थानचे अध्यक्षपद भूषविलेल्या प्रेमानंद कामत यांनी सांगितलेल्या कथेनुसार, महालसा देवीची मूळ मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीत आढळणाऱ्या शिळीग्राम शिळेपासून घडवण्यात आली आहे. नेपाळमधून ती मूर्ती प्रथम सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे नेण्यात आली. मात्र तेथील मुस्लिम राजवटीतील त्रासामुळे ही मूर्ती तेथून प्रथम गोव्यातील डिचोली येथे आणण्यात आली व कालांतराने ती वेरणे येथे नेण्यात आली.

वेरणे येथून आणून प्रियोळ गावातील ज्या वाड्यावर देवीची स्थापना करण्यात आली, त्यास म्हाड्डोळ असे म्हणण्यात येऊ लागले. याचे कारण वेरणे गावास प्राचीन काळी महालसा देवस्थान असताना म्हाड्डोळ (‘पोन्नें म्हाड्डोळ’ म्हणजे जुने म्हाड्डोळ) असे म्हणत असत. तेच नाव नव्या जागेस देण्यात आले. कालांतराने या नव्या वाड्यासह सभोवतालच्या परिसराचे एक वेगळे गाव म्हाड्डोळ वा म्हार्दोळ या नावाने निर्माण झाले. एका आख्यायिकेनुसार, या नव्या जागेमध्ये आधीपासून सांतेरी देवीचे मंदिर होते. या देवीने महालसा देवीला येथे स्थायिक होण्यासाठी आपल्या शेजारी जागा दिली. त्यावेळी महालसा देवीने सांतेरीला असे सांगितले की ‘येथील पहिला मान तुझा आहे. त्यामुळे माझ्या दर्शनापूर्वी भाविक तुझे दर्शन घेतील.’ ही प्रथा आजही सुरू आहे. येथे रोज प्रथम सांतेरी देवीची आरती केली जाते. त्यानंतर महालसा मंदिराच्या मागे असलेल्या ग्रामपुरूष, ६४ योगिनी, कालभैरव, दाढ आदी देवतांच्या आरत्या होत्यात आणि नंतरच महालसा देवीची आरती केली जाते.

म्हार्दोळ येथील महालसा देवीचे हे स्थान किमान ४५० वर्षे प्राचीन आहे. या कालावधीत अनेकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिर वास्तूमध्ये नव्याने वाढ करण्यात आली. या मंदिरास राणोजी शिंदे यांचे दिवाण व पेशवाईतील एक मातब्बर मुत्सद्दी रामचंद्र बाबा मल्हार उर्फ रामचंद्र बाबा शेणवई सुखटणकर यांनी १७५४ साली मौजे प्रियोळ येथील एका वाड्याची सनद दिली होती व या सनदपत्राद्वारे मंदिरास कोणतीही तोशीस लागू देता कामा नये, अशी ताकीदही दिली होती.

म्हार्दोळ येथे विस्तिर्ण जागेवर वसलेल्या या मंदिराच्या प्रांगणात चारही बाजूंनी मोठ्या इमारती आहेत. तीन कमानदार दरवाजे असलेल्या भव्य महाद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथे प्रवेशताच लक्ष वेधून घेते ती समोर असलेली मंदिराची भव्य वास्तू, डाव्या हातास असलेला मोठ्या मनोऱ्यासारखा भासणारा उंच दीपस्तंभ आणि या त्यानजीक असलेली २० ताळ्यांची भव्य समई. या समईच्या समोर, बालाजीच्या दाक्षिणात्य मंदिरांमध्ये आढणारा पितळेचा उंच ध्वजस्तंभ आहे. मंदिराची वास्तु वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय स्थापत्यशैलीत उभारलेली आहे. मुखमंडप, चौक म्हणून ओळखला जाणारा भव्य सभामंडप, अर्धमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या मुखमंडपाच्या वरच्या बाजूस असलेल्या चौकोनाकार नगारखान्याच्या भिंतींवर समोरच्या बाजूला देवी महालसेची उभी मूर्ती विराजमान आहे. डाव्या व उजव्या बाजूस आदिमाया भगवती आणि सरस्वती देवीच्या मूर्ती आहेत. या दालनावर चारही बाजूंनी उतरते छप्पर व त्यावर कलश आहे. सभामंडप, अर्धमंडप, महामंडप यांच्यावरही दोन्ही बाजूंनी उतरते कौलारू छप्पर आहे. मंदिराच्या गर्भगृहावर अष्टकोनाकार बसक्या मनोऱ्यासारखे व त्यावर घुमट व सुवर्ण कलश असलेले शिखर आहे. या शिखरास ताम्रपत्र्याचे आवरण आहे. याची माहिती देणारा एक ताम्रपट पूर्वी देवालयात होता. त्यात असे म्हटले होते –

‘श्रीमहालसा विजयते
श्रीः ।। गो नागिद्रि विधू १७८९ न्मित शाके प्रभवाख्यवत्सरे राधे ।।
श्रीमन्महालसायाः प्रासादः प्राक्तनो विशीर्णोsभूत् ।।१।।
सच ताम्रमयैः पट्टैः संघटय दृढौ विनिर्मितो नूलः ।।
महतो लब्धेन जनादद्रवेण महाजनै स्तृषदिव्याः ।।२।। श्रीः’

याचा अर्थ असा की श्रीमहालसादेवीच्या पुरातन प्रासादाचा जीर्णोद्धार ताम्रपट घालून गोमंतकस्थ व कर्नाटकस्थ महाजनांनी द्रव्य उत्पन्न करून शके १७८९ (इ.स. १८६७) प्रभव संवत्सरी वैशाख मासी संपूर्ण केला. यावरून १५८ वर्षांपूर्वी या मंदिराचा एक जीर्णोद्धार झाल्याचे स्पष्ट होते. गर्भगृहासमोरील महामंडपातील कोरीव स्तंभांवरूनही याचे प्राचीनत्व लक्षात येते. महामंडपाच्या बाह्यभिंतीपासून आतल्या बाजूस काही अंतर सोडून ही कृष्णवर्णीय स्तंभांची रांग आहे. या स्तंभांवर तसेच त्यावरील तरंगहस्तांवर बारीक नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपाचे छतही नक्षीकामाने सुशोभित आहे. काचेच्या हंड्यांप्रमाणेच येथे एक वैशिष्ट्यपूर्ण पितळी घंटा टांगलेली आहे. घंटेमध्ये घंटानाद करण्यासाठी जी लोळी (रिंगर) असते ती येथे नाही. खऱ्याखोट्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी या घंटेचा वापर केला जात असे. भाविकांचा असा विश्वास असे की ही घंटा वाजवताना कोणी खोटे बोलल्यास त्या व्यक्तीचा तीन दिवसांत मृत्यू होतो. ही श्रद्धा एवढी प्रबळ होती की येथील साक्ष पोर्तुगीज राजवटीतील न्यायालयात स्वीकारार्ह मानली जात असे. येथे कोणास साक्ष द्यायची असेल, तेव्हाच घंटेत लोळी लावली जाते. या महामंडपाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे छताकडील बाजूवर विविध देवदेवतांची काष्ठशिल्पे आहेत.

गोमंतकातील अन्य महत्त्वाच्या मंदिरांप्रमाणेच येथील अंतराळाच्या भिंती व प्रवेशद्वारांवर चांदीचा नक्षीकाम केलेला पत्रा मढवलेला आहे. त्यावर पानाफुलांची नक्षी व स्वस्तिचिन्हे यांबरोबरच देवीच्या मोठ्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. महालसा ही मोहिनीचे रूप असल्याने, येथे द्वारचौकटीच्या वरच्या भागात समुद्रमंथनाचा प्रसंग कोरलेला आहे. गर्भगृहात चांदीच्या वज्रपीठावर देवी महालसेची चतुर्भूज मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे देवीच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुल आहे. उजव्या खालच्या हातात केसांना धरून असुराचे शीर व तलवार आहे. डाव्या वरच्या हातात अमृतपात्र आहे व डाव्या खालच्या हातात अमृतप्राप्तीसाठी वेशांतर केलेल्या असुराचे शीर आहे. या शिरातून गळणाऱ्या रुधीराचे प्राशन करण्यासाठी आलेल्या वाघाचे शिल्पही तेथे आहे. देवीच्या दोन्ही पायांखाली राहूचा संबंध देह आहे. देवीच्या अंगावर यज्ञोपवीत आहे. अशा प्रकारे यज्ञोपवीत धारण केलेली ही गोमंतकातील एकमेव देवी असल्याचे येथे सांगण्यात येते. देवी हा विष्णुचा अवतार असल्याने तिने यज्ञोपवीत धारण केलेले आहे. येथे तिच्या पूजनात विष्णूपुजेचे सर्व उपचार केले जातात. त्याप्रमाणे देवीपूजेचे साडी, ओटी वगैरे उपचार केले जातात. तसेच येथे देवीने त्रिशुल धारण केल्यामुळे ती रुद्रशक्ती असल्याचे मानले जाते. अशा प्रकारे विष्णू, शिव आणि देवी अशा तीन शक्ती धारण केलेली ही देवी आहे.

गर्भगृहात चांदीची सुंदर प्रभावळ असलेल्या उच्च मुख्यासनावर महालसादेवी विराजमान आहे. खेरीज तिच्या आसनाजवळ खाली श्रीम्हालपुरूष आहे. याशिवाय गर्भगृहाच्या भिंतीस बाहेरील बाजूस उजवीकडे गणपती, तर डावीकडे संकष्टी म्हणजे संकष्टनाशिनी देवी आहे.

महालसा देवीच्या मंदिराच्या पाठीमागे उजव्या बाजूस या स्थानावरील मूळ देवता असलेल्या सांतेरी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात उजवीकडे लक्ष्मीनारायण आणि डावीकडे सांतेरी देवी विराजमान आहे. सांतेरी देवीच्या मंदिराच्या डाव्या बाजूस आणखी एक मंदिर आहे. येथे श्रीरामपुरूष, भगवती, सोनाळभैरव (संहारभैरव), चतुष्ठी देवी, कालभैरव, तसेच दाड दैवत यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. दाडदैवताच्या गर्भगृहाच्या मागच्या बाजूस एका देवकोष्ठकात मल्हार देवाचे स्थान आहे. येथेच यज्ञमंडपही आहे. मंदिर परिसरात मागच्या बाजूस विस्तिर्ण दगडी तलाव आहे.

महालसा मंदिरात रोज सकाळी महाभिषेकादी पूजाकृत्ये होतात. त्यानंतर देवीस कुमारिकेचा वेशशृंगार केला जातो. दुपारी महापूजा होते. त्यावेळी तरूणीचा वेशशृंगार केला जातो. येथे दर रविवारी महालसादेवीचा शिबिकोत्सव (पालखी उत्सव) होतो. त्याच प्रमाणे दर महिन्याच्या शुक्ल वा कृष्ण पक्षाच्या पंचमीस सांतेरी देवीची पालखी काढली जाते. या देवस्थानातील खास उत्सव म्हणजे येथील जत्रा. माघ शुद्ध षष्ठीपासून माघ वद्य दशमीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवाची सांगता महालसादेवीच्या विजयरथोत्सवाने होते. संपूर्ण गोमंतकात हा उत्सव म्हाड्डोळची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय मंदिरात नवरात्रोत्सव, दीपावली आदी सर्व सण-उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून ८ किमी आणि पणजी येथून २३ किमी अंतरावर
  • फोंडा येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०८३२ २३४३४२१

महालसा संस्थान

म्हारडोल, तह. फोंडा, जिला. उत्तरी गोवा

Back To Home