महालक्ष्मी मंदिर

भुलाभाई देसाई मार्ग, महालक्ष्मी, मुंबई

महालक्ष्मी मंदिर, भुलाभाई देसाई मार्ग, महालक्ष्मी, मुंबई. महालक्ष्मीला मुंबई महानगरीची धनदेवता मानले जाते. येथे समुद्रकाठी एका लहान टेकडीवर वसलेले महालक्ष्मी मंदिर हे या शहराच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे. परकीय आक्रमणांच्या काळात मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी त्या समुद्रात लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पुढे इ.स. १७७५ च्या सुमारास मुंबईची सात बेटे भराव टाकून जोडण्याचे काम सुरू असताना कंत्राटदार रामजी शिवजी प्रभू यांना देवीने स्वप्नात दृष्टांत देऊन आपल्या मूर्ती बाहेर काढण्याची आज्ञा दिली. त्यानंतर समुद्रातून महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवींच्या मूर्ती सापडल्या. या मूर्तींची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. एकाच ठिकाणी या तिन्ही आदिशक्ती एकत्र असणे हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. हे मंदिर मुंबईच्या समृद्धीचे आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या स्थापनेनंतरच मुंबईची भरभराट झाली, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.

या मंदिराचा इतिहास साधारणतः चौदाव्या शतकापासून सुरू होतो. माहीम येथे राजधानी असलेल्या दोन बिंब राजांनी मुंबई बेटांवर राज्य केले होते. त्यातील पहिला व मुंबईचा आद्य राजा हा प्रताप बिंब होय. त्याची राजधानी प्रथम केळवे-माहीम येथे होती. पुढे इ.स. ११३८ मध्ये तो त्या वेळी बरडबेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावर आला. त्यास त्याने आपल्या पहिल्या राजधानीचे ‘माहीम’ हे नाव दिले. या मुंबई-माहीमला त्याने राजधानीचा दर्जा दिला. वाळकेश्वर ते वसईपर्यंतचा प्रदेश त्याच्या राज्याचा भाग होता. येथील दुसरा बिंब राजा हा बिंबदेव यादव होय. देवगिरीच्या रामदेवराव यादवाचा चौथा पुत्र असलेल्या बिंबदेव याला मुस्लिम तवारिखांमध्ये भीमदेव असे संबोधले आहे. याने येथे इ.स. १२९५ मध्ये आपली राजधानी स्थापन केली. येथील प्रभादेवीचे मंदिर हे त्याच्या कारकिर्दीत उभारण्यात आले होते. ठाणे-मुंबईतील हिंदूंचा अखेरचा राजा नागरदेव ऊर्फ नागरशा हा होय. चौदाव्या शतकात मुबारक शहा पहिला हा गुजरातचा सुलतान होता. त्याने इ.स. १३१८ मध्ये माहीम आणि सालशेत हे भाग काबीज केले. इसवी सन १३१८ च्या या आक्रमणादरम्यान त्याच्या फौजेने येथील मुंबादेवीचे मंदिर उद्‌ध्वस्त केले. त्या वेळी ‘या दडपशाहीच्या धोरणामुळेच महालक्ष्मी आणि तिच्या भगिनींनी आपल्या किनाऱ्यावरून तात्पुरते प्रस्थान केले,’ अशी नोंद मुंबई गॅझेटियरचे लेखक एस. एम. एडवर्ड्स यांनी त्यांच्या ‘द राईज ऑफ बॉम्बे’ (१९०२) या पुस्तकात केली आहे. १३२१ ते १३२४ या काळात ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या जॉर्डनस आणि ओडेरिक या ख्रिस्ती धर्मगुरूंनी लिहून ठेवले आहे की ‘सारासेन्सनी (म्हणजे मुस्लिम आक्रमकांनी) अलीकडेच सत्ता बळकावून संपूर्ण प्रदेशावर ताबा मिळवला आहे. त्यांनी मूर्तीपूजा करणारी असंख्य मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत, तसेच अनेक चर्च नष्ट करून त्यांच्या मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेतल्या आहेत.’

पुढे १३४७ मध्ये त्याचा सरदार मलिक निका आणि नागरशा यांची भायखळा येथे मोठे युद्ध झाले. त्यात नागरशाचा पराभव होऊन मुंबईवर मुस्लिम सत्ता स्थापन झाली. सोळाव्या शतकापर्यंत सर्व स्थिरस्थावर होत असतानाच पुन्हा एकदा मुंबई बेटांवर एक संकट चालून आले. ते होते पोर्तुगीज आक्रमकांचे. इ.स. १५३४ मध्ये मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, माझगाव, परळ, वरळी, माटुंगा आणि माहीम अशी सात बेटे पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतान बहादूरशहाकडून जिंकून घेतली होती. ‘ग्रेटर बॉम्बे गॅझेटियर’मधील नोंदीनुसार, परधर्माबाबत अत्यंत असहिष्णू असलेल्या पोर्तुगीज जेसुईटांनी या काळात येथील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. प्रभादेवी, वाळकेश्वराप्रमाणेच महालक्ष्मी मंदिरासही त्यांच्या धर्मांधतेची झळ पोहोचली. त्या काळात प्रभादेवीच्या मंदिरांमधील मूर्ती पाठारे प्रभू समाजातील लोकांनी सुरक्षिततेसाठी विहिरीत लपवून ठेवल्या होत्या. त्याचप्रमाणे महालक्ष्मी मंदिरातील मूर्तीही समुद्रात दडवण्यात आल्या असाव्यात, असे सांगितले जाते. ही घटना १५७० च्या सुमारास वा त्यापूर्वी घडली असल्याचे संकेत ‘ग्रेटर बॉम्बे गॅझेटियर’मधून प्राप्त होतात. याबाबत गॅझेटियरमध्ये असे म्हटले आहे की ‘जेसुइट्सच्या मालकीची सर्वाधिक मंदिरे (धर्मस्थळे) होती आणि उत्तरेकडील बेटांपासून पार दक्षिणेला भायखळ्यापर्यंतची बहुतेक सर्व जमीन त्यांच्याकडे भाडेतत्त्वावर होती. त्यांचा मोठा प्रभाव होता, परंतु त्यांच्या अविचारी कृत्यांमुळे केवळ लोकसंख्या आणि व्यापाराची वाढच खुंटली नाही, तर ती पोर्तुगीजांसाठी धोक्याचा स्रोत बनली. त्यांनी सातत्याने हिंदू मंदिरे आणि मुस्लिम मशिदी नष्ट केल्या. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरला आणि त्यांनी तेथून पळ काढण्यास सुरुवात केली. यामुळे जनता दुखावली गेली आणि त्यातूनच प्रतिशोधाच्या घटना घडू लागल्या. उदाहरणार्थ डिसेंबर १५७० मध्ये ठाणे येथे घडलेली घटना. त्या वर्षी मलबारच्या चाच्यांनी शहराची लूट केली आणि कॅथेड्रलची मोठी घंटा चोरून नेली. या काळात वाळकेश्वरचे जुने मंदिर पाडण्यात आले होते. महालक्ष्मी आणि तिच्या भगिनींची मंदिरे त्या काळापुरती नाहीशी झाली होती आणि त्या देवी गुप्तवासात राहिल्या होत्या.’

पुढे ब्रिटिश कालखंडात सामाजिक परिस्थिती पूर्ववत झाल्याचे पाहून या मूर्ती वर काढून त्यांची मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. याबाबतही एक कथा सांगण्यात येते. ती अशी, मुंबईचे गव्हर्नर चार्ल्स बून यांच्या काळात, जून १७२० मध्ये वरळीची मोठी खिंड (द ग्रेट ब्रीच) बांध घालून बंदिस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम कॅप्टन एलियास बेट्स याच्यावर सोपवण्यात आले होते. बेट्स याने त्याच्या बांधकामाचे कंत्राट रामजी शिवजी प्रभू या तरुणास दिले होते. हे काम १७२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे तो बांध टिकत नव्हता. १७२४ पर्यंत असे चालले होते. एके रात्री रामजी शिवजी याला महालक्ष्मी मातेने स्वप्नदृष्टांत दिला. आपण महाकाली व महासरस्वतीसह समुद्रात मूर्तीरूपात आहोत. या मूर्ती बाहेर काढून त्यांची प्रतिष्ठापना केल्यास बांध घालण्याचे काम यशस्वी होईल, असा संकेत तिने दिला. दुसऱ्या दिवशी रामजी शिवजीने वरळीच्या खाडीत जाळी टाकून या मूर्तींचा शोध घेतला. तेव्हा तेथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या तीन पाषाणमूर्ती सापडल्या. सध्या महालक्ष्मीचे मंदिर जेथे आहे त्या टेकडीवर या मूर्ती ठेवण्यात आल्या. नंतर सरकारकडून ती टेकडी व जागा बक्षीस घेऊन या टेकडीवर महालक्ष्मीचे मंदिर बांधण्यात आले. ‘मुंबईचे वर्णन’कार गोविंद नारायण माडगांवकर यांना एका स्थानिक सधन प्रभू गृहस्थांकडून उपलब्ध झालेल्या बखरीमध्ये ही कथा देण्यात आली आहे. या बखरीमध्ये रामजी शिवजी यांचा नामोल्लेख असला, तरी कोणत्याही इंग्रज अधिकाऱ्याचा उल्लेख नाही.

पुढे १७७१ ते १७८४ या काळात मुंबईचे गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी या बांधाची दुरुस्ती व बंदिस्ती केली. या बांधास ‘हॉर्नबी व्हेलार्ड’ असे नाव देण्यात आले. परिणामी लोकस्मृतीत त्याचे नाव कोरले गेले व मंदिराविषयीची आख्यायिका त्याच्या काळाशी जोडली गेली. ‘द गॅझेटिअर ऑफ बॉम्बे सिटी अँड आयलंड’नुसार, हे मंदिर साधारण १७८५ च्या सुमारास बांधले गेले असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘मुंबईतील आद्य जागृत शक्तिपीठे’ या पुस्तकात डॉ. भालचंद्र आकलेकर यांनी हा काळ १७६१ ते १७७१ असा सांगितला आहे. वस्तुतः १७२८ मध्ये हा बांध बांधून पूर्ण झाला होता. तो कॅप्टन एलियास बेट्स याच्या काळात, रामजी शिवजीच्या साह्याने बांधण्यात आला होता. तो काळ १७२० ते १७२८ असा आहे. त्यामुळे महालक्ष्मीचे मंदिरही याच दरम्यान उभारण्यात आले असावे, असे मत ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकाचे लेखक व मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक नितीन साळुंखे यांनी मांडले आहे.

महालक्ष्मी मंदिराच्या प्रकटीकरणाशी संबंधित दुसरी कथा अशी की पावसाळ्यापूर्वीचा काळ असताना कोळी बांधव मासेमारीसाठी समुद्रात लांबवर गेले होते. अचानक आलेल्या वादळामुळे आणि पावसामुळे त्यांची नौका भरकटली आणि जीविताचा धोका निर्माण झाला. अशा जीवघेण्या संकटात त्यांनी आई जगदंबेचा धावा सुरू केला आणि देवीची आरती गायली. काही वेळातच समुद्राचे तांडव शांत झाले आणि आकाश स्वच्छ झाले. कोळी बांधवांनी समुद्रात टाकलेले जाळे वर ओढले असता त्यात माशांऐवजी देवीच्या तीन सुंदर मूर्ती सापडल्या. या मूर्ती पाहून सर्व जण थक्क झाले. या मूर्ती घेऊन कोळी बांधव किनाऱ्यावर आले आणि त्यांची जिथे स्थापना झाली तेच आजचे महालक्ष्मी मंदिर होय. बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांच्या ‘मुंबईचा वृत्तांत’ (१८८९) या पुस्तकात असे म्हटले आहे की ‘महालक्ष्मीच्या देवळाची प्रतिष्ठा शामाचार्य नावाच्या इकडील स्थायिक यजुर्वेदी ब्राह्मणाने केली आहे.’

महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवतांना हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. महालक्ष्मी ही ऐश्वर्य, सौंदर्य आणि समृद्धीची देवता आहे. ती विष्णूची पत्नी आहे आणि सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवी माणसाच्या जीवनाचा मूलाधार आहेत. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर ही तिन्ही रूपे एकाच गर्भगृहात एकत्र विराजमान आहेत, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात तीन या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव आणि सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या त्रिदेवी सृष्टीच्या कार्याचा आधार आहेत. सत्त्व, रज आणि थम हे तीन गुण, भूत, वर्तमान आणि भविष्य हे तीन काळ आणि वात, पित्त, कफ हे शरीरातील तीन दोष मानले जातात. महालक्ष्मी मंदिरात या तीनही शक्तींचे एकत्र वास्तव्य असणे हा एक विलक्षण योग समजला जातो.

माता पार्वतीच्या रौद्र रूपाला महाकाली किंवा कालिका म्हटले जाते. शुंभ-निशुंभ राक्षसांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी देवांनी हिमालयात जाऊन प्रार्थना केली तेव्हा पार्वतीच्या शरीरातून कौशिकी प्रकट झाली आणि पार्वतीचे शरीर कृष्णवर्णीय झाले. ते महाकाली म्हणून ओळखले जाऊ लागले. महाकालीने रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध केला. रक्तबीजाला असा वर होता की त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडला की त्यातून नवा राक्षस निर्माण होईल. महाकालीने आपल्या जिभेने त्याचे सर्व रक्त प्राशन करून त्याचा संहार केला. वधानंतरही देवीचा राग शांत होत नव्हता तेव्हा महादेव तिच्या वाटेत आडवे पडले आणि त्यांच्या शरीराला स्पर्श होताच देवी शांत झाली. महाकालीची दक्षिणा काली, भद्रकाली, चंडिकाली अशी सात स्वरूपे मानली जातात. कोलकाता येथील दक्षिणेश्वर मंदिर हे महाकालीचे प्रसिद्ध स्थान आहे, जिथे रामकृष्ण परमहंस यांनी साधना केली होती. याशिवाय चित्तोडगड, दिल्ली, पावागड आणि अकोला येथेही कालीमातेची जुनी मंदिरे आहेत.

महालक्ष्मीच्या उत्पत्तीबाबत समुद्रमंथनाची कथा प्रसिद्ध आहे. दुर्वासांच्या शापामुळे इंद्राने आपले ऐश्वर्य गमावले तेव्हा विष्णूच्या सांगण्यावरून देवांनी समुद्रमंथन केले. त्यातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक म्हणजे लक्ष्मी होय. दिव्य वस्त्रे आणि अलंकारांनी नटलेली ही लक्ष्मी कमळावर विराजमान होऊन प्रकट झाली आणि तिने विष्णूचा पती म्हणून स्वीकार केला. महालक्ष्मीला भार्गवी असेही म्हणतात कारण तिचा जन्म भृगू ऋषींच्या पोटी झाला होता. महालक्ष्मीची आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, भोगलक्ष्मी, सत्यलक्ष्मी आणि योगलक्ष्मी अशी आठ रूपे मानली जातात. गजान्तलक्ष्मी हे तिचे वैभवशाली रूप आहे, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी हत्ती देवीवर अभिषेक करताना दाखवले जातात. कोल्हापूर, गोवा, झांशी आणि चेन्नई येथे महालक्ष्मीची महत्त्वाची मंदिरे आहेत.

महासरस्वती ही बुद्धी, ज्ञान आणि कलेची अधिष्ठात्री देवता आहे. ती ब्रह्मदेवाची कन्या मानली जाते. वेदांमध्ये तिचा उल्लेख वागीश्वरी असा येतो. वैदिक वाङ्मयात सरस्वतीचा उल्लेख मुख्यतः नदी देवता किंवा विद्या देवता असा येतो. सरस्वती नदीची कथा अशी सांगितली जाते की वडवानल अग्नीला शांत करण्यासाठी ब्रह्मदेवाने तिला हा अग्नी वाहून नेण्याची आज्ञा केली होती. सरस्वतीने पाताळ मार्गाने हा अग्नी वाहून नेला आणि वाटेत ती ऋषींच्या आश्रमांजवळ नदीरूपाने प्रकट झाली. सरस्वतीची जन्मकथा पुराणांनुसार वेगवेगळी आहे. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार ती विष्णूच्या मुखातून प्रकट झाली तर शिवपुराणानुसार ब्रह्मदेवाने तिला जन्म दिला. सरस्वती ही शुभ्रवस्त्रा, वीणावादिनी आणि हंसारूढ रूपात पूजली जाते. बुद्धी आणि नवीन शोध घेण्याची प्रतिभा तिच्याच कृपेने प्राप्त होते असे मानले जाते.

या तिन्ही देवींचे हे मंदिर शहराच्या गजबजलेल्या भागात समुद्रकिनाऱ्याला लागून स्थित आहे. मुख्य मार्गावरून मंदिरापर्यंतच्या मार्गावर शेकडो पूजा साहित्य व प्रसाद विक्रीची दुकाने आहेत. मुख्य मंदिरासमोर एक दीपमाळ, दीपस्तंभ आणि चांदीच्या पत्र्याने मढवलेला उंच ध्वजस्तंभ आहे. दर्शनमंडप, सभामंडप व अंतराळ अशी या मंदिराची संरचना आहे. दर्शनमंडप व सभामंडपात भाविकांच्या सोयीसाठी दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथील दर्शनमंडप व सभामंडप हे खुल्या स्वरूपाचे आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील उजवीकडील देवकोष्टकात विठ्ठल रुक्मिणीच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत व डावीकडील देवकोष्टकात गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात चांदीच्या सिंहासनावर मध्यभागी महालक्ष्मी विराजमान आहे, तसेच तिच्या उजवीकडे महाकाली आणि डावीकडे महासरस्वती यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. या मंदिराच्या शिखरावर एकूण नऊ कळस आहेत. २९ एप्रिल २००२ रोजी श्री कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामिगल यांच्या हस्ते या कळसांचे प्रतिष्ठापन व महाकुंभाभिषेक विधी पार पडला होता. मंदिराच्या मागील बाजूला काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर येथे गणपती व महादेव यांची मंदिरे आहेत.

महालक्ष्मी मंदिरातील दैनंदिन विधी आणि उत्सव परंपरेने पार पाडले जातात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती होते. यावेळी भाविकांना प्रसाद म्हणून केशरयुक्त दूध व शिरा दिला जातो. शुक्ल पंचमीला देवीच्या मूर्तींना हिंगूळ लेपन केले जाते आणि शुक्ल अष्टमीला नवचंडी याग होतो. पौर्णिमेला कणकेच्या दिव्यांनी विशेष आरती केली जाते. वर्षातून दोनदा येथे किरणोत्सव सोहळा होतो. त्यावेळी सूर्याची किरणे थेट गर्भगृहातील मूर्तींवर पडतात. मंदिराची बांधणी अशा प्रकारे केली आहे की सूर्याची किरणे आतपर्यंत पोहोचतात. हे येथील स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे.

चैत्र आणि आश्विन महिन्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गुढीपाडव्याला ध्वजारोहण होऊन नवरात्राला सुरुवात होते. या काळात दररोज पालखी सोहळा होतो आणि चंडीपाठाचे वाचन केले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत महाकालीचा त्रिशूळ घटाजवळ ठेवून त्याची पूजा केली जाते. दसऱ्याला या उत्सवाची सांगता होते. वैशाख महिन्यात अक्षय्य तृतीयेला आंबा महोत्सव साजरा होतो. त्या वेळी देवीला आंब्यांच्या राशी अर्पण केल्या जातात. १७ जून रोजी ध्वजस्तंभाचा वर्धापन दिन असतो. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मंदिरातील विठ्ठल-रखुमाईची विशेष पूजा होते. गणेश चतुर्थीला पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेव मंदिरात रुद्राभिषेक होतो. त्रिपुरारी पौर्णिमेला देवीला छप्पन भोग म्हणजेच अन्नकूटाचा नैवेद्य दाखवला जातो. हे सर्व पदार्थ मंदिराच्या पाकशाळेतच बनवले जातात आणि नंतर भाविकांना वाटले जातात. मकरसंक्रांतीला सत्यनारायणाची पूजा होते आणि माघ महिन्यात गणेश जयंती साजरी केली जाते. महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात लघुरुद्राचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबईतील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • राज्यातील अनेक शहरांतून रेल्वे व एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०२२ २३५१३८३१

महालक्ष्मी मंदिर

भूलाभाई देसाई मार्ग, महालक्ष्मी, मुंबई

Back To Home