महाकाली वट मंदिर

कांथरपुरा, ता. दहेगाम, जि. गांधीनगर

भारतातील सर्वात मोठ्या वटवृक्षांमध्ये भरुच जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘कबीरवड’ गणला जातो, जो अंदाजे ४.३३ एकरांवर पसरलेला आहे. त्याच्याच एवढा भव्य आणि विस्तृत असा आणखी एक प्राचीन वटवृज कांथरपुरा गावात स्थित आहे. अर्ध्या एकराहून अधिक क्षेत्रफळात पसरलेला आणि सुमारे ४० मीटर उंची असलेला हा ५०० वर्षांहून जुना वृक्ष, त्याच्या मध्यभागी असलेल्या माता महाकालीच्या स्वयंभू मूर्तीमुळे ओळखला जातो. या दैवी उपस्थितीमुळे या वटवृक्षाला ‘महाकाली वट’ म्हणून पूजले जाते. याचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन गुजरात सरकारने २००६ मध्ये याला धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले.

वटवृक्षाला भारताचा राष्ट्रीय वृक्ष असल्याचा मान लाभला असून देशाच्या धार्मिक परंपरांमध्ये त्याचे पवित्र स्थान आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया या वटवृक्षाची प्रदक्षिणा घालतात आणि प्रत्येक जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करतात. संपूर्ण भारतात अनेक विस्तृत वटवृक्ष आहेत. जगातील सर्वात मोठा वटवृक्ष आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे ‘थिमम्मा मरिमानु’ नावाने प्रसिद्ध आहे, ज्याचा अवाढव्य विस्तार चार एकरांवर पसरलेला आहे. अशाच प्रकारे, कबीरवड आणि कोलकात्याच्या बोटॅनिकल गार्डनवरील ‘द ग्रेट बरगद’ हे त्याचे आयकॉनिक उदाहरणे आहेत. कांथरपुरा येथील या वृक्षाला, महाकालीच्या मंदिराच्या उपस्थितीमुळे ‘मिनी कबीरवड’ म्हणूनही संबोधले जाते. या जागृत देवीला अत्यंत श्रद्धेने केलेली प्रार्थना सर्व मनोकामना पूर्ण करते अशी भक्तांची श्रद्धा आहे.

आख्यायिकेनुसार हा वटवृक्ष एका प्राचीन बारवीच्या (बावडीच्या) वर वाढला आहे. आता एका निर्जन हिरवगार आश्रमाचे रूप धारण केलेल्या या परिसरात हजारो पक्षी आणि माकडे आश्रय घेतात. विशेष म्हणजे हा वृक्ष दरवर्षी सुमारे पाच मीटरने बाहेरील बाजूस वाढतो आहे. त्याच्या पारंब्यांनी आजूबाजूच्या जमिनीमध्ये खोलवर मूळ धरले आहे, ज्यामुळे त्याला एका छोट्या जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे – तो इतका महाकाय आहे की एका दृष्टिक्षेपात संपूर्ण पाहता येत नाही. अनेकांना या वृक्षाचा मूळ खोड ओळखताना कसरत करावी लागते. उत्साही भक्तगण याच्या लटकणाऱ्या पारंब्या मोजण्यात तासनतास घालवतात. या पारंब्या जवळील शेतजमिनीपर्यंत पसरल्या आहेत, तरीही आदराखातर कोणीही त्यांना हात लावण्याची हिंमत करत नाही. या वटवृक्षाला कापण्याचा किंवा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर संकट येते, अशी येथील स्थानिकांची श्रद्धा आहे.

या जीवंत चमत्काराच्या मध्यभागी महाकाली देवता विराजमान आहे, जिला येथे ‘वडवाली माता’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर या वृक्षाएवढेच प्राचीन मानले जाते. काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी देवीच्या अनुमतीने, आतमध्ये मंदिर बांधण्यासाठी काही फांद्या कापल्या होत्या. या मंदिराला लोखंडी कमानीचे प्रवेशद्वार, टीनचे छत असलेले सभागृह आणि शेवटच्या टोकाला एक लहान गाभारा आहे. प्रार्थना हॉल फुलांच्या माळांनी सजवलेला असून भक्तांना बसण्यासाठी एका बाजूला रेलिंग बसवलेले आहे. भिंतींवर माता कालीची मोठी चित्रे रेखाटलेली आहेत आणि विधींसाठी हॉलमध्ये एक लहान यज्ञकुंड आहे. गाभाऱ्यामध्ये देवीची स्वयंभू मूर्ती सुंदरपणे सजवलेली असून अखंड ज्योतीने उजळून निघालेली आहे. गाभाऱ्याभोवती काचेचे पॅनल्स बसवलेले असल्यामुळे भक्तांना आत प्रवेश करता येत नाही परंतु ते बाहेरूनच दर्शन घेऊ शकतात. मूर्तीच्या डाव्या बाजूला देवीचे वाहन असलेला सिंहाचा प्रतीकात्मक पुतळा उभा आहे. या मंदिराला लागूनच महाकालीची नव्याने स्थापित केलेली एक मूर्ती लहान गाभाऱ्यात विराजमान आहे.

येथे अत्यंत भक्तिभावाने रोजचे विधी आणि पूजा अर्चा केली जाते. देवीला दररोज नवीन वस्त्रे व दागिने घातले जातात, आणि सकाळ व संध्याकाळच्या आरतीला मोठी गर्दी असते. प्रत्येक पौर्णिमेला मंदिर भक्तांनी गच्च भरून जाते आणि एक विशेष महाआरती आयोजित केली जाती. चैत्र नवरात्री उत्सवादरम्यान पाच हजाराहून अधिक भाविक नतमस्तक होतात. या पवित्र महिन्यात विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. चैत्र शुद्ध त्रयोदशी हा एक मोठा सण मानला जातो. त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रीत मंदिर सर्व नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. आश्विन शुद्ध अष्टमीला दर्शनासाठी शेकडो भाविक गर्दी करतात. नवरात्रीच्या मेळ्यात मंदिराचा परिसर इतका तुडुंब भरलेला असतो की चालण्यासाठी जागाच उरत नाही. येथील इतरही अनेक हिंदू सण अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. भक्तगण नवस बोलतात आणि इच्छापूर्तीनंतर देवीला मातीची मडकी अर्पण करतात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही जण वटवृक्षाच्या फांद्यांवर ‘चुनाऱ्या’ (चुनड्या) बांधतात.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकाली वट परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी विशेष रस दाखवला होता. मंदिर परिसराच्या विकासाची जबाबदारी ‘गुजरात पवित्र यात्राधाम विकास बोर्डा’कडे सोपवण्यात आली असून यासाठी १४.९६ कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले.

मुख्य वैशिष्ट्ये

  • दहेगामपासून १९ किमी आणि गांधीनगरपासून ३१ किमी अंतरावर स्थित
  • दहेगाम आणि गांधीनगर येथून एसटी बसेस उपलब्ध
  • खाजगी वाहने थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकतात
  • जवळच हलका नाश्ता मिळण्याची सोय, परंतु राहण्याची कोणतीही सोय नाही
Back To Home