दुष्यंत आणि शकुंतलेचे पुनर्मिलन घडवणाऱ्या महागणपतीचे टिटवाळा येथील मंदिर राज्यातील प्रमुख गणेश मंदिरांपैकी एक आहे. येथील इच्छापूर्ती करणाऱ्या गणेशाला मनोभावे साकडे घातल्यास विवाह जमतात; तसेच दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होते, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या गणेशाला ‘विवाहविनायक’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचा उल्लेख प्राचीन ग्रंथ तसेच साहित्यातही आढळतो. दर मंगळवारी, संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश चतुर्थी, गणेश जयंतीला, तसेच नववर्षदिनी हजारो भाविक या गणेशाच्या दर्शनासाठी येतात.
मंदिराबाबतची आख्यायिका अशी की ऋग्वेद, अंगिरस आदी वेद लिहिणारे कण्व ऋषी या परिसरात आश्रम बांधून वास्तव्यास होते. विश्वामित्र ऋषी आणि मेनका यांच्या मिलनातून जन्माला आलेल्या शकुंतलेचा जन्मदात्यांनी त्याग केल्यावर कण्व ऋषींनी तिला दत्तक घेऊन पालनपोषण केले. एकदा गांधार देशाचा राजा दुष्यंत या परिसरातून जात असताना त्याची व सौंदर्यवती शकुंतला यांची भेट झाली. या भेटीत ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यांनी गांधर्व पद्धतीने विवाहही केला. काही दिवस एकत्र राहिल्यावर दुष्यंतला आपल्या राज्यात परत जावे लागले. त्यावेळी आपली आठवण म्हणून त्याने शकुंतलेला एक अंगठी दिली; तसेच लवकरच परतून माझ्यासोबत घेऊन जाईन, असे वचनही दिले. एकदा तापट स्वभावाचे दुर्वास मुनी कण्व ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी दुष्यंतच्या विचारात गुंतलेल्या शकुंतलेने त्यांचे यथायोग्य स्वागत न केल्याने ते संतप्त झाले आणि ज्याच्या विचारात मग्न होऊन माझे योग्यरित्या स्वागत केले नाहीस, त्या दुष्यंतला तुझे विस्मरण होईल, असा शाप त्यांनी शकुंतलेला दिला. दुर्वास मुनींच्या शापाप्रमाणेच पुढे घडत गेले. त्यामुळे दुःखात बुडालेल्या शकुंतलेची अवस्था पाहून कण्व ऋषींनी तिला एक गणेश मूर्ती देऊन उपासना करण्यास सांगितले. शकुंतलेच्या अनुष्ठानास यश येऊन दुष्यंतला तिची आठवण आली आणि तो तिला आपल्यासोबत घेऊन गेला. ज्या गणेशाने हा मंगल योग जुळवून आणला तो हा टिटवाळ्याचा महागणपती होय.
पेशवाईच्या काळात टिटवाळ्यानजीकच्या वासुंद्री येथे पेशव्यांचा तळ होता. एकदा परिसरात पडलेल्या दुष्काळामुळे पाण्याची सोय व्हावी म्हणून पेशव्यांनी आपले कारभारी रामचंद्र मेहेंदळे यांना येथे तलावासाठी उत्खनन करण्यास सांगितले. उत्खननादरम्यान मेहेंदळे यांना गणेशाची मूर्ती सापडली. त्यावेळी पुण्यात असलेल्या पेशव्यांना आदल्या रात्री मूर्तीबाबत दृष्टांत झाला होता. मेहेंदळेंकडून त्यांना मूर्ती सापडल्याचे समजले. दृष्टांतात दिसल्याप्रमाणेच ही मूर्ती होती. त्यामुळे पेशव्यांनी तलावाच्या बाजूलाच छोटे मंदिर उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मूर्तीच्या नित्यपूजेची जबाबदारी जोशी नावाच्या पुजाऱ्याकडे सोपवली. आजही जोशी घराण्याकडेच या मंदिरातील पूजेची जबाबदारी आहे.
पुढे वसईचा किल्ला जिंकल्यावर चिमाजी आप्पा यांनी या जागेवर मोठे मंदिर बांधून त्यात मूर्तीची पुनर्स्थापना केली. त्याचवेळी मंदिरासमोर लाकडी सभामंडपही उभारला. पेशव्यांनी या मंदिरासाठी तीन एकर जागा दिली होती. काही काळानंतर मंदिराचे पुजारी जोशी यांनी आपली १३ एकर जागा देऊन मंदिराचा विस्तार केला. कालौघात मंदिराची पडझड झाल्याने तसेच सभामंडप छोटा पडू लागल्याने १९६५–६६ मध्ये मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. १९९५–९६ मध्ये येथील सभामंडपाचे नूतनीकरण करण्यात आले.
टिटवाळा शहराच्या मध्यवर्ती भागात एका मोठ्या तलावाशेजारी सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. मंदिराच्या कमानीतून आत गेल्यावर पूजा साहित्य विक्रीची तसेच प्रसादाची सुमारे ६० ते ७० दुकाने दिसतात. पारंपरिक महाराष्ट्रीयन शैलीत उभारलेल्या मंदिराच्या आवारात दीपमाळ असून येथे रोज सायंकाळी दिवे लावले जातात. भाविकांची दररोज होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव येथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मेटल डिटेक्टर लावलेल्या दरवाजातून आत जाऊन, मोठी दर्शन रांग पार करून गर्भगृहात जाता येते.
गर्भगृहात साडेतीन फूट उंचीच्या, डाव्या सोंडेच्या गणेशाच्या शेंदूरचर्चित मूर्तीचे दर्शन घडते. सुमारे चार फूट उंचीच्या ओट्यावर ही मूर्ती विराजमान आहे. सिंहासनाधिष्ठित अशी ही मूर्ती चतुर्भुज असून मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात परशु, खालच्या हातात रुद्राक्षमाळा, वरच्या डाव्या हातात गदा व कमळ, तर खालच्या हातात लाडुपात्र आहे. लांब कान, उजवा सुळा तुटल्यासारखा, सोंड लाडुपात्राला स्पर्श केलेली, मोठे पोट, डाव्या पायाची मांडी घातलेली तर उजवा पाय तिरप्या अवस्थेत दुमडलेला, गळ्यात यज्ञोपवित व सर्प, तसेच पोटावरही सर्पाचा विळखा असे मूर्तीचे स्वरूप आहे. मूर्तीवर चांदीचा मुकुट असून वर चांदीचे छत्र आहे. डोळे व नाभीमध्ये माणके आहेत. मूर्तीच्या चरणांजवळ यक्ष–गंधर्व असून डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी–सिद्धी आहेत. या मूर्तीला नित्यनेमाने पितांबर नेसवले जाते. देव्हाऱ्यावर बारीक कलाकुसर करण्यात आली आहे. दररोज येथे फुलांची सुरेख आरास केली जाते. प्रत्येक संकष्टी चतुर्थी व विनायकी चतुर्थीला या मूर्तीला शेंदूर लावला जातो.
जाळी लावून गर्भगृह आणि सभामंडप वेगळे करण्यात आले आहे. गर्भगृहाच्या दुसऱ्या बाजूकडील दरवाजातून बाहेर पडल्यावर सभामंडपात जाता येते. गर्भगृहात प्रवेश केल्यापासून सभामंडपातून बाहेर पडेपर्यंत या गणेशमूर्तीचे दर्शन होत असते. गर्भगृहासमोर गणपतीचे वाहन मूषकाची चांदीची मूर्ती आहे. मनामध्ये इच्छा बोलून हार बरोबर उंदराच्या कानामध्ये टाकल्यास इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रशस्त सभामंडपात एकाच वेळी हजारो भाविक बसू शकतात. सभामंडपाच्या वर असलेल्या गॅलरीमधूनही गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते.
सभामंडपात उजवीकडे शिवलिंग व नंदीची मूर्ती आहे. डाव्या कोपऱ्यात गणेशभक्त वेणगावकर जोशी यांची समाधी आहे. याबाबत असे सांगितले जाते की महादेव मोरेश्वर जोशी (वेणगावकर) हे जंगल खात्यात मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यांचा देवधर्मावर विश्वास नव्हता. एका मित्राने त्यांना निग्रहाने या मंदिरात आणले. येथे येताच त्यांच्यात इतका बदल झाला की त्यांनी गृहप्रपंच सोडून परमार्थाचा मार्ग अवलंबिला. एक वर्ष केवळ लिंबाचा पाला, एक वर्ष केवळ रोज एक फळ, एक वर्ष पूर्ण मौनव्रत धारण करून त्यांनी गणेशाची तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना वाचासिद्धी दिली. ते मंदिरातच राहत असत. १९१० च्या सुमारास त्यांनी येथे समाधी घेतली होती.
या मंदिरात दररोज पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना महागणपतीचे दर्शन घेता येते. प्रत्येक संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थीला हीच वेळ पहाटे ४ ते रात्री ११ अशी आहे. गणेश चतुर्थी व गणेश जयंतीला ही वेळ पहाटे ४ ते रात्री १० अशी आहे. दररोज सकाळी ५, दुपारी १२ व सायंकाळी ६.४५ वाजता आरती होते. संकष्टी चतुर्थी व अंगारकीला पहाटे ४, दुपारी १२ व रात्री चंद्रोदयाच्या वेळेस आरती होते. गणेश चतुर्थीला पहाटे ४, दुपारी १२ व सायंकाळी ६.४५ वाजता आरती होते. या मंदिरात भाविकांना काही शुल्क भरून अभिषेक, पहाटेची महापूजा, स्वतः बसून अभिषेक, वार्षिक अभिषेक, सहस्त्रावर्तन, सत्यनारायण पूजा, सत्यविनायक पूजा, लघुरुद्र, गणहोम, गणेश याग, संकष्टी चतुर्थी उद्यापन, वाहन पूजा व ब्राह्मण भोजन हे विधी व पूजा करता येतात. (संपर्क : मंदिर समिती कार्यालय : मो. ९९२०५७०५७१) मंदिराजवळच असलेल्या तलावाला ‘अमृतकुंड’ असेही म्हणतात. येथे काही शुल्क देऊन बोटिंगचा अनुभव घेता येतो. मंदिर परिसरात भक्त निवासाची सुविधा आहे.