महादेव मंदिर

तांबडी सुर्ला, ता. धारबांदोडा, जि. दक्षिण गोवा

गोमंतकातील आजही तुलनेने सुस्थितीत असलेले सर्वांत प्राचीन शिवमंदिर ही तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिराची ओळख आहे. कदंब काळात होयसाळ-चालुक्य शैलीत बांधलेल्या या मंदिरात महादेवाचे स्वयंभू लिंग प्रतिष्ठापित आहे. सुमारे २४० चौ. किमी क्षेत्रात पसरलेल्या भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याचा निसर्गरम्य व शांत परिसर, तसेच मंदिराजवळच असलेला तांबडी सुर्ला धबधबा यामुळे हे मंदिर भाविकांबरोबरच देश-विदेशातील पर्यटकांनाही आकर्षित करीत आहे. केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.

इतिहासकारांच्या मते, या महादेव मंदिराचा निर्मितीकाल बारावे-तेरावे शतक आहे. या काळात येथे कदंब राजवंशाची सत्ता होती. सप्तकोटेश्वर महादेव हे या राजवंशाचे कुलदैवत होते. इसवी सनाचे बारावे शतक ते तेराव्या शतकाचा उत्तरार्ध या काळातील कदंब राजवंशाचे अन्य काही शिलालेख, ताम्रपट आणि नाणी यांवर सप्तकोटेश्वराचे उल्लेख आढळतात. या राजवंशातील कोणत्या राजाने तांबडी सुर्ला येथील महादेवाचे मंदिर उभारले याची नोंद नाही. मात्र हे मंदिर इ.स. ११५० ते १२५० या शंभर वर्षांच्या काळात उभारण्यात आले असावे, असा इतिहासकारांचा कयास आहे. कदंब राजा जयकेशी दुसरा याच्या मृत्युनंतर इ.स. ११४७-४८मध्ये राजगादीवर आलेला शिवचित्त पेर्मांडीदेव व त्याची पट्टराणी कमलादेवी ही सप्तकोटेश्वर शिवाची परमभक्त होती. एका आख्यायिकेनुसार, त्यांनी हे मंदिर उभारले.

ही आख्यायिका अशी की कदंब राजा शिवचंद्रादित्य (शिवचित्त पेर्मांडी) एकदा या अरण्यात शिकारीसाठी आला होता. त्यावेळी त्यास अचानक येथील स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन झाले. या कथेचा पाठभेद असा की अरण्यात शिकारीसाठी आलेल्या शिवचित्त पेर्मांडी याला तांबडी सुर्ला येथील धबधबा दिसला. तेथून कोसळणाऱ्या पाण्यामध्ये त्याला शिवाच्या तांडवनृत्यातील रौद्रता जाणवली. त्यामुळे त्याने या ठिकाणी शिवमंदिर उभारण्याचे आदेश दिले. या मंदिराविषयी आणखीही काही लोककथा आहेत. त्यापैकी एक अशी की येथे सुर्ला नदीचे पाणी पिण्यासाठी एक वाघ येत असे. मंदिराच्या उभारणीनंतरही त्याचे येणे सुरुच राहिले. आजही रात्रीच्या वेळी एक वाघ देवाच्या दर्शनासाठी आणि पाणी पिण्यासाठी येतो, असा दावा केला जातो. भाविकांची अशीही श्रद्धा आहे की मंदिराच्या गाभाऱ्यात एक विशालकाय नाग वास्तव्याला आहे व तो शिवपिंडीचे रक्षण करतो.

अत्यंत घनदाट जंगलात, दुर्गम परिसरात हे मंदिर बांधण्यात आले होते. कमला माणकेकर यांच्या ‘कल्चर अँड रिलिजियस ट्रॅडिशन्स इन टेम्पल्स ऑफ गोवा’ या पुस्तकात याबाबत असे म्हटले आहे की या मंदिराचे स्थान लक्षात घेता ते प्राचीन काळी शैव पंथातील तांत्रिकांच्या साधनेचे केंद्र असावे. गोव्यातील अनेक मंदिरांना आधी बहमनी सत्तेची आणि नंतर पोर्तुगीजांच्या धर्मांधतेची झळ पोचली. असंख्य मंदिरे त्या काळात उद्‌ध्वस्त करण्यात आली. मात्र हे मंदिर दाट जंगलात असल्याने आणि येथे येण्यासाठी नीट मार्गही नसल्याने या मंदिरास आक्रमकांचा उपद्रव पोचू शकला नाही व ते बचावले. आज हे मंदिर राष्ट्रीय धरोहर मानण्यात येत आहे.

अभयारण्यात वसलेल्या या मंदिरापासून दूर अंतरावर वाहने उभी करून, वाटेत नदीवरील पूल पार करून पुढे आल्यानंतर मंदिराची ही काळ्या पाषाणातील प्राचीन वास्तू दिसते. गोव्यातील मंदिरे सामान्यतः जांभ्या दगडात बांधलेली आहेत. हे मंदिर मात्र काळ्या पाषाणात उभारलेले आहे. हे मंदिर एका सपाट जगतीवर उभारण्यात आले आहे. मुखमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या पूर्वाभिमुख मंदिराची संरचना आहे. मुखमंडपास समोरून आणि डाव्या व उजव्या बाजूने प्रवेशमार्ग आहे.

अर्धखुल्या प्रकारच्या मुखमंडपात एकूण १४ स्तंभ आहेत. यातील मध्यभागी असलेल्या चार स्तंभांवर बारीक कोरीवकाम केलेले आहे. यातील एका स्तंभाच्या तळाशी घोड्याला चिरडणाऱ्या गजराजाचे शिल्प आहे. हे कदंब राजवटीचे चिन्ह मानले जाते. स्तंभाच्या शीरोभागात नागबंध प्रकारची सजावट आहे. नागबंध सजावटीत नाग आणि नागीण यांच्या एकमेकांत गुंतलेल्या जोडीचे शिल्प, कधीकधी एखाद्या पट्ट्याप्रमाणे कोरलेले असते. या चार स्तंभांवर शिव, विष्णू, ब्रह्मा आणि त्यांच्या सहचरी पार्वती, लक्ष्मी, सरस्वती यांचेही शिल्पांकन आहे. त्यासोबत सूरसुंदरी आणि नृत्य मुद्रांमध्ये असलेल्या नर्तकी कोरलेल्या आहेत. मुखमंडपाच्या मागच्या बाजूच्या भिंतींत चार कोरीव देवकोष्ठके आहेत. येथे कक्षासनेही आहेत. मध्यभागी गोलाकार रंगशिलेवर तीन फूट उंचीची भग्नावस्थेतील शिरोहीन नंदीमूर्ती आहे. मुखमंडपाच्या वितानावर कमलफुलांची नक्षी कोरलेली आहे.

अंतराळाच्या दगडी द्वारचौकटीच्या दोन्ही बाजूंस दगडात कोरलेली नक्षीदार वातायने आहेत. या वातायनांशेजारी स्तंभांना खेटून मोठी नागशिल्पे ठेवलेली आहेत. गर्भगृहाच्या द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी चौरसाकार दगडी शाळुंखेवर ते स्थापित आहे. शिवलिंगावर नैसर्गिक रेषेतून तयार झालेली नागाकृती दिसत असल्याचे सांगितले जाते. या शिवलिंगावर कोणताही मुखवटा वा सजावट करण्यात आलेली नाही. स्वयंभू लिंगाला कोणतीही सजावट न करण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते. या शिवपिंडीवर वर्षातील काही दिवस सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे पडतात.
या मंदिराच्या बाह्यभिंतींवर फारसे कोरीव नक्षीकाम नाही. मुखमंडपावर दगडी शिळांचे उतरते छप्पर आहे. गर्भगृहावर गुंतागुंतीची रचना असलेले चौकोनाकार शिखर आहे. त्यावर चारही बाजूंनी कोरीव नक्षीकाम असलेली देवकोष्ठके आहेत. यात ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देवतांच्या मूर्ती आहेत.

या मंदिरात साजरा करण्यात येणारा मुख्य उत्सव महाशिवरात्र हा आहे. यावेळी येथे जागरण असते. शिवलिंगाला अभिषेक व रुद्राभिषेक केला जातो. भजन-कीर्तन आणि आरतीही होते. यात शेकडो भक्त सहभागी होतात. अन्य उत्सवांत श्रावणी सोमवार, कार्तिक एकादशीची विशेष पूजा यांचा समावेश आहे. मंदिरात रोज सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या काळात भाविक येथे देवदर्शन घेऊ शकतात.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून ३५ किमी आणि मडगाव येथून ५० किमी अंतरावर
  • दक्षिण गोव्यातील अनेक शहरांतून तांबडी सुर्ला येथे येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही

महादेव मंदिर तंबड़ी

सुरला, धारबंदोडा, जिला दक्षिण गोवा

Back To Home