नृसिंह किंवा नरसिंह हा भगवान विष्णूचा चौथा अवतार होय. नृसिंह मूर्तींमध्ये बहुतेकदा हिरण्याकश्यपूचा वध करतानाचे रूप पाहायला मिळते. परंतु, काही ठिकाणी योगनृसिंह म्हणजेच योग मुद्रेतील शांत व संयमी चेहऱ्याचा नृसिंह कयाधू व प्रल्हाद यांच्यासह पुजला जातो. दक्षिण भारतातील कर्नाटक व आंध्र प्रदेशातील काही भागांसहित महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यांत नृसिंहाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. देगलूर तालुक्यातील शेळगाव येथेही नृसिंहाचे एक प्रसिद्ध मंदिर असून येथील जागृत नृसिंह नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर प्राचीन शिवमंदिरालगत बांधलेले आहे. येथील नृसिंहाची मूर्ती ३० सप्टेंबर १९३७ रोजी गावातील एका महिलेस सोनाबाई पाटील यांच्या शेतातून माती काढताना सापडली. त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी मिळून गावातील महादेव मंदिरात नव्या गर्भगृहाची उभारणी करून तिथे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तमलूर मठाचे मठाधिपती बसवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली. अभ्यासकांच्या मते,ही नृसिंह मूर्ती बाराव्या शतकातील असून ज्या ठिकाणी ती सापडली, त्याच ठिकाणी प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे शेळगावचा व येथील मूर्तीचा इतिहास कमीतकमी सातशे ते आठशे वर्षे प्राचीन असल्याचे मानले जाते. पंढरपूर येथील विठ्ठल मूर्तीच्या पाषाणाशी या नृसिंह मूर्तीच्या पाषाणाचे साम्य असल्याने या दोन्ही मूर्ती समकालीन असाव्यात, असाही अंदाज व्यक्त केला जातो. गावात अनेक ठिकाणी प्राचीन मंदिराचे अवशेष म्हणजेच स्तंभ, कणी, हस्त व तुळई वगैरे भाग सर्वत्र विखुरलेले आढळतात. नृसिंह मंदिराच्या बांधकामात याच प्राचीन अवशेषांचा वापर केला असावा, असे सांगितले जाते.
मांजरा, लेंडी व मण्यार या तीन नद्यांच्या संगमावर शेळगाव वसलेले आहे आणि गावाच्या एका टोकाला हे मंदिर आहे. मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण आहे. सभामंडप व दोन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या स्वरूपातील येथील सभामंडप अलीकडील काळात बांधलेला आहे. सभामंडपात चौकोनी स्तंभ आहेत. या सभामंडपात नृसिंह व महादेव यांची शेजारी-शेजारी स्वतंत्र गर्भगृहे आहेत. दोन्ही गर्भगृहे सभामंडपापेक्षा काहीशी उंचावर आहेत. प्रवेशद्वारांच्या द्वारशाखा सपाट आहेत.
ललाटबिंबस्थानी गणपती मूर्ती आहेत. प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूला नक्षीदार स्तंभ व तंभावरील उत्तरांगावर शिखरशिल्पे आहेत. मंडारकास चंद्रशिळा आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून अंतराळाची रचना केलेली आहे.
नृसिंह गर्भगृहात एका कमी उंचीच्या वज्रपीठावर नृसिंह मूर्ती आहे. असे सांगितले जाते की हे वज्रपीठ मूळ मंदिरातील असून ते मूर्ती सापडली त्याच ठिकाणी मिळाले होते. त्यामुळे ते मूर्तीइतकेच प्राचीन असल्याचे मानले जाते. नृसिंह मूर्तीच्या चेहऱ्यावर सौम्य भाव आहेत. देव योगमुद्रेत योगासनात बसले आहेत. चतुर्भुज देवाच्या वरील दोन हातांत शंख-चक्र आहेत व खालील दोन हात गुडघ्यांवर ठेवले आहेत. एका पायावर दुसरा पाय ठेवून देव उत्कटासनात बसले आहेत. देवाच्या शेजारी गदा आहे. मूर्तीवर वस्त्रे व अलंकार कोरलेले आहेत. देवाच्या गळ्यात माळा, दंडात दंडपट्टा, कंबरेला मेखला व डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीचे दात, जिव्हा, डोळे, आयाळ, हातापायाची बोटे व नखे अत्यंत सुस्पष्ट पद्धतीने घडवली असल्याने हे एखाद्या निष्णात शिल्पकारांचे काम असल्याचे दिसून येते. देवाच्या पायाकडे उजव्या बाजूला भक्त प्रल्हाद व डाव्या बाजूला माता कयाधू यांची शिल्पे आहेत. मूर्तीच्या मागील पाठशिळेवर वर मध्यभागी कीर्तिमुख आणि दोन्ही बाजूला मकर शिल्पे आहेत. पाठशिळेवरील तोरणात विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. त्यात मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, बलराम, बुद्ध व कलकी अशा शिल्पांचा समावेश आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला विष्णूचे वाहन गरुडाचे शिल्प आहे. गर्भगृहाच्या छतावर शिखर आहे. या गर्भगृहाच्या शेजारी असलेल्या गर्भगृहासमोर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती व गर्भगृहात मोठी शिवपिंडी आहे. या गर्भगृहाची रचना नृसिंह मूर्ती असलेल्या गर्भगृहासारखीच आहे.
मंदिरात वैशाख शुद्ध चतुर्दशीला नृसिंह जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय श्रावण मास, भाद्रपद गणेशोत्सव, चैत्र पाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, शारदीय नवरात्री, दसरा, दिवाळी आदी वर्षभरातील विविध सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, महाप्रसाद, नृत्य, नाटिका आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवकाळात अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. सोमवार, गुरुवार, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.