मच्छिंद्रनाथ तपोभूमी

देवाचा डोंगर, आंबडपाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात नाथ संप्रदायास अनन्यसाधारण स्थान आहे. महाराष्ट्रात भागवत धर्माचाअमृताचा वेलुलावणारे संत ज्ञानेश्वर हे स्वतः नाथ संप्रदायाचे दीक्षित होते. मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायाचे आदिसिद्ध मानले जातात. याच मच्छिंद्रनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले कुडाळ तालुक्यातील स्थान म्हणजे देवाचा डोंगर. मुंबईहून गोव्याकडे जाताना कुडाळच्या अलीकडे महामार्गावर पावशीनजीक देवाचा डोंगर आहे. या ठिकाणी महाकालिकादेवी आणि शंकराचेही स्थान आहे. मस्त्येंद्रनाथ यांची तपोभूमी म्हणूनही हे स्थान ओळखले जाते.

धार्मिक इतिहासानुसार, आंध्र प्रदेशातील श्रीशैलकर्दलीबन ही नाथ संप्रदायाची उदयभूमी आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही या संप्रदायाची प्रथम लीलास्थली आहे. हा संप्रदाय नाथ संप्रदाय, सिद्ध पंथ, अवधूत मत, कानफाटा संप्रदाय, गुरुमार्ग आदी नावांनी उल्लेखिला जातो. या संप्रदायाचे पहिले ऐतिहासिक पुरुष मत्स्येंद्रनाथ हे होत. त्यांच्या मूलस्थानाविषयी विविध मते आहेत. त्यांचा काळ दहाव्या शतकाचा उत्तरार्ध असल्याचे मत थोर इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांनी मांडले आहे. मत्स्येंद्रनाथ यांच्या नावावर कौलज्ञाननिर्णय, श्रीकामाख्यागुह्यसिद्धी, अकुलागमतंत्र, कुलार्णवतंत्र, कौलोपनिषद्, कौलावलिनिर्णय आदी प्रसिद्ध ग्रंथ आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्येयोगाब्दिनीसरोवरआणिविषयविध्वंसैकवीरया विशेषणांनी गौरव केलेले गोरखनाथ (काळ .. १०५० ते ११५०) हे मत्स्येंद्रनाथांचे शिष्य होते. अशा या आदिसिद्धाने देवाचा डोंगर येथे तीन दिवस वास्तव्य केले होते, असा उल्लेखनवनाथ भक्तिसारया ग्रंथात आहे

नवनाथ भक्तिसारया ग्रंथाची रचना धुंडिसुत मालु नरहरी यांनी केली आहे. ग्रंथातील उल्लेखानुसार सन १८१९ मध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. यात ४० अध्याय ७६०० ओव्या आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटीनाथ, गहिनीनाथ, गोपीचंदनाथ, अडबंगनाथ भर्तरीनाथ या नवनाथांचे महिमान या ग्रंथात वर्णिले आहेत. त्यातील सहाव्या अध्यायात कुडाळ प्रांतातील आडूळ या गावाचा उल्लेख आलेला आहे. हे गाव आज आंबडपाल म्हणून ओळखले जाते. हे गाव शंकराचार्यांना इनाम म्हणून देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आडूळचे नामांतर आंबडपाल असे केले होते. नवनाथ भक्तिसारमध्ये असे म्हटले आहे कीयापरी बारामल्हार करूनि तीर्थ। कुमार दैवत करूनि कोकणस्थानांत। कुडाळ प्रांत आडूळ गांवांत। येऊनियां राहिला।। तों ग्रामाबाहेर दुर्गालयीं। महाकाळिका दैवत आहे। तयाचे दर्शना लवलाहें। मच्छिंद्रनाथ पैं गेला।।’ (अध्याय , ओवी ,). अर्थातबारामल्हार या स्थानी पिशाच्चांशी युद्ध केल्यानंतर मत्स्येंद्रनाथ कोकण प्रांतात कुमार दैवताच्या म्हणजे शंकराचे पुत्र कार्तिकेय यांच्या दर्शनासाठी आले. येथील आडूळ गावात ते येऊन राहिले. त्या गावाबाहेर एका डोंगरावर कालिकादेवीचे स्थान होते. तेथे ते दर्शनासाठी गेले. कालिकादेवी हे शंकराच्या हातातील कालिका अस्त्राचेच रूप. या अस्त्राने शंकराने अनेक दैत्यांचा वध केला होता. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने या अस्त्रास वर मागण्यास सांगितले. त्यावर या अस्त्राने म्हणजेच देवीने वर मागितला की मला आता काही काळ विश्रांती द्यावी अशी जागा द्यावी की जेथे कोणी मला जागे करू नये. तेव्हा शंकराने तिला अडूळ गावाबाहेरील एका स्थानी स्थापन केले. याच कालिकादेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी मत्स्येंद्रनाथ येथे आले होते. त्यावेळीदेवीप्रती करूनि नमन म्हणे माय वो आश्चर्यपण। म्यां मंत्रकाव्या केलें निपुण। त्याजला साह्य होई तूं।।’ (अध्याय , ओवी १३) अशी प्रार्थना त्यांनी केली. मात्र आपल्या विश्रांतीत व्यत्यय आल्याने देवी कोपिष्ट झाली म्हणाली, ‘अरे मी आपला भोग सारून। निवांत बैसलें सेवीत स्थान। तैं तूं मातें वरा गोंवून। शिणवूं पाहसी दुगत्मया।।’ (अध्याय , ओवी २३) त्या वेळी देवीने मत्स्येंद्रनाथांप्रतीक्षीणचिलट, दुरात्मा, मूर्खअसे शब्द वापरले. त्यावरून मत्स्येंद्रनाथ यांनी देवीचा अभिमान उतरवण्यासाठी वाक्‌ताडन केले. त्यावरून त्यांचे प्रचंड युद्ध झाले. त्यांनी एकमेकांवर अनेक अस्त्रांचा प्रयोग केला. अखेरीस मत्स्येंद्रनाथ यांनी फेकलेल्या गुप्त मंत्रास्त्राने तेथील वात कुंठित झाला आणि देवी निश्चेष्ट पडली. त्यावेळी तेथे महादेव प्रकट झाले. त्यांनी कालिकादेवीस शुद्धीवर आणण्यास मत्स्येंद्रनाथांना सांगितले. तेव्हा आपल्या शाबरी (सावरी) कवित्वास वर द्यावे, अशी प्रार्थना मत्स्येंद्रनाथांनी केली. शंकराने तसा वर दिल्यानंतर मत्स्येंद्रनाथांनीवातास्त्रमंत्रआकर्षणमंत्र जपला देवी शुद्धीवर आली. या नंतर देवीने त्या स्थानी त्यांना तीन दिवस, तीन रात्री ठेऊन घेतले. याबाबत ग्रंथात असे म्हटले आहे कीमच्छिंद्र आणि उमानाथ। देवीनें ठेवूनि तीन रात्र। मग स्नेहसंपन्न बोल बोलत। मच्छिंद्रनाथा ओडविलें।।’ (अध्याय , ओवी ४३). त्यानंतर मच्छिंद्रनाथ तेथून समुद्रतीरी हरेश्वर दैवताच्या दर्शनास गेले

या कथेच्या लोकमानसातील स्मृतीदेवाचा डोंगरया नावाने जपल्या गेल्या आहेत. मात्र त्यास तसे का म्हणतात यांबाबत लोकांस विस्मृती झाली होती. याबाबत अशी आख्यायिका आहे की या डोंगरावर १९७९ मध्ये कुडाळ शहराला पाणीपुरवठा करण्याकरीता एक भव्य जलकुंभ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार एका कंत्राटदाराला त्याचे काम देण्यात आले. या डोंगरावर ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेवर त्याच्या कामगारांनी पायासाठी खोदकाम सुरू केले. त्यावेळी त्यांनायहां से देढसो फीट दूर जाओअसे आवाज येऊ लागले. येथे साप दिसू लागले. एवढेच नव्हे, तर त्यांनी खोदलेले खड्डे रात्रीतून भरून येऊ लागले. कामातील हा व्यत्यय आणि अडचणी कशामुळे येत आहेत हे कोणास समजेना. हे कोणा समाजकंटकांचे कृत्य असावे, असे समजून कंत्राटदाराने तेथे रात्री पहाऱ्यासाठी आपली माणसे ठेवली, पण तरीही सकाळी ते पाहायचे तर ते खड्डे भरून आलेले असत. अखेर त्या कंत्राटदाराने सखोल चौकशी केल्यावर त्याला समजले की हा देवाचा डोंगर असून येथे नाथांचे स्थान आहे. तेव्हा ग्रामस्थांच्या सांगण्यावरून त्या पाण्याच्या टाकीची जागा अन्यत्र हलवण्यात आली. त्याच सुमारास गगनगिरी महाराजांचे भक्त अनंत महेश्वर सावंत यांना महाराजांनी आदेश दिला की या देवाच्या डोंगरावर नवनाथांचे स्थान आहे. त्याचा शोध घे आणि तेथे सेवा सुरू कर. त्यांनी त्यानुसार या स्थानाचा शोध घेतला आणि १९८० मध्ये येथे मंदिर बांधले.

या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. कौलारू रचनेचे हे मंदिर जमिनीपासून काहीसे उंच आहे. सुमारे २० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. हे मंदिर डोंगरावरील एका सपाट जमिनीवर आहे. मंदिराच्या प्रांगणात, मंदिरासमोरील जागेत, भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. प्रांगणात तुळशी वृंदावन हवनकुंड आहे. या प्रांगणात काहीशा उंचीवर मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे. सभामंडप त्यासमोरील बाजूस प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या मध्यभागी एका लहानशा चौथऱ्यावर कासवाची मूर्ती आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर मध्यभागी मच्छिंद्रनाथ त्यांच्या उजव्या बाजूला महादेव डाव्या बाजूला कालिकादेवी यांच्या तसबिरी आहेत. त्या तसबिरींसमोर त्यांच्या पादुका आहेत. या मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ तपोभूमी मंदिरात महाशिवरात्र, धर्मनाथ बीज, दत्त जयंती तसेच गुरुपौर्णिमा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. महाशिवरात्रीस येथे ११ दिवसांचा कार्यक्रम असतो. नऊ दिवस नवनाथ पोथीचे पारायण केले जाते. त्यानंतर महाशिवरात्रीला शिवलिलामृताचे सामुदायिक पारायण केले जाते दुसऱ्या दिवशी भंडारा असतो. या काळात येथे भजनकीर्तनही होते. या ठिकाणी गुरुपौर्णिमेलाही एक दिवसाचा भंडारा असतो. या मंदिरात रोज सकाळी ते या वेळेत पूजाविधी केला जातो. दुपारी १२.३० ते या वेळेत आरती नैवेद्य अर्पण कार्यक्रम असतो. त्यानंतर सायंकाळी ते हरिपाठ नंतर आरती केली जाते. येथे दर गुरुवारी अन्नदान केले जाते. या मंदिरात नवनाथ याग, दत्त याग, महाकाली याग विष्णू याग होम हवन केले जातात. याशिवाय कालसर्प, ग्रहशांती, नक्षत्र जनन शांती यांसारखे विधी केले जातात.

उपयुक्त माहिती

  • कुडाळपासून किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्गमधील अनेक शहरांतून कुडाळसाठी एसटी सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : प्रभाकर सावंत, मो. ८१०८४८५१७५, ९८३३२१८७२१
Back To Home