देवगडमधील श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथील कुणकेश्वराचा लिंगेश्वर महादेव हा थोरला बंधू मानला जातो. इळये सड्यावर, निसर्गरम्य व शांत अशा परिसरात लिंगेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरात केलेली पूजा कुणकेश्वरापर्यंत पोहोचते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिरास अधिक धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या मंदिराच्या मागील बाजूस दाखविले जाणारे भुयारमुख आणि मंदिराच्या समोरच्या बाजूस असलेली प्राचीन विहीर ही येथे येणाऱ्या भाविकांची आकर्षण स्थाने आहेत.
लिंगेश्वराचे हे मंदिर नेमके कधी बांधले गेले हे अज्ञात आहे. मात्र ते प्राचीन आहे. असा प्राचीन इतिहास माहीत नसलेल्या वास्तू वा गोष्टींना ‘पांडवकालीन’ म्हणण्याची पद्धत आहे. महाभारताचा लेखनकाळ हा इसवी सन पूर्व ८६० ते ८४० असल्याचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे, तर महाभारतातील घटना या इसवी सन पूर्व तीन हजार म्हणजे सिंधू संस्कृतीच्याही आधीच्या काळात घडल्याचे मत काही संशोधकांनी मांडले आहे. हे मंदिर इतके प्राचीन नसले, तरी येथील ग्रामस्थांची तशी श्रद्धा आहे. त्याच प्रमाणे हा देव कुणकेश्वर येथील कुणकेश्वर महादेवाचा मोठा भाऊ असल्याचे येथील लोक मानतात. महाशिवरात्रीस कुणकेश्वराची जत्रा असते, तेव्हा पंचक्रोशीतील अनेक देव त्याच्या भेटीसाठी जातात; परंतु गढीताम्हाणे येथील राटेश्वर वा राहाटेश्वराप्रमाणेच इळयेचा लिंगेश्वरही कुणकेश्वराच्या भेटीसाठी जात नाही.
याबाबत आख्यायिका अशी की महाशिवरात्रीची यात्रा इळये येथील लिंगेश्वर मंदिरात भरत असे. तेव्हा लिंगेश्वर देव स्नानासाठी कुणकेश्वर येथे जात असे. त्या वेळी एकदा गावातील एक वृद्ध स्त्री कुणकेश्वर येथील काळ्या कातळावरून खाली पडली. तेव्हापासून लिंगेश्वराने कुणकेश्वरी स्नानास जाणे बंद केले. मात्र दर तीन वर्षांतून एकदा लिंगेश्वर मिठमुंबरा येथे जातो.
पूर्वाभिमुख असलेल्या लिंगेश्वर मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आल्याचे दिसते. मंदिर उंच जगतीवर बांधलेले आहे. मंदिरासमोर उंच चौथऱ्यावर कोकणी पद्धतीचा दीपस्तंभ आहे. त्याच्या उजव्या बाजूला थोड्या अंतरावर असलेल्या चौथऱ्यावर तुळशी वृंदावन व सिंहमूर्ती आहे. शंकर महादेवाच्या मंदिरासमोर नेहमी नंदी असतो. येथे मात्र सिंहाची मूर्ती आहे. या चौथऱ्याच्या समोरच लिंगेश्वराची पावले, तसेच स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. दीपस्तंभाच्या डाव्या बाजूस मारुतीची छोटी प्रतिमा आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप आणि त्यापुढील मंदिर यांच्या स्थापत्यशैलीत फरक आहे. सभामंडप हा कोकणी स्थापत्यशैलीत बांधलेला, दोन खापी उतरत्या छपराचा व अर्धखुल्या प्रकारचा आहे. सभामंडपात कक्षासने व त्यावर बसवलेले आठ अष्टकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या शीर्षस्थानी चौरंगासारखा आकार आहे व त्यावर कोरीव काम केलेले तरंगहस्त आहेत. यातील नागप्रतिमा, तसेच सिंहप्रतिमा लक्षवेधक आहेत. या लाकडी तरंगहस्तांतून या मंदिराचे प्राचीनत्व दिसते. सभागृहात अनेक घंटा टांगलेल्या दिसतात. येथे घंटा टांगून भाविक देवास केलेला नवस फेडतात.
सभागृहाच्या जमिनीपासून पाच पायऱ्या उंचावर ओसरीसारखे अंतराळ आहे. अंतराळात गर्भगृहाच्या दरवाजाच्या एका बाजूस नंदीची पाषाण मूर्ती आहे, तर गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत, उजव्या बाजूस कोनाड्यामध्ये गणेशाची काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार साध्या पद्धतीचे आहे व त्याच्या वरच्या बाजूस कीर्तिमुख आहे. या मंदिरात लिंगेश्वराचे पाताळ लिंग प्रतिष्ठापित केलेले आहे. जमिनीपासून खालच्या बाजूस प्रतिष्ठापित केलेल्या लिंगास पाताळ लिंग म्हणतात. या मंदिरात अंतराळातून तीन पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. तेथे जमिनीवर लिंगेश्वराची पिंड आहे. या पिंडीचे वैशिष्ट्य असे की त्यात शाळुंकेच्या मधोमध अनघड, छोट्या खडकासारखे दिसणारे लिंग आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीतील कोनाड्यामध्ये लिंगेश्वराचा लिंग स्वरूपातील मुखवटा आणि मुकुट आहे. या मुकुटावर लिंगेश्वराची मुखमूर्ती आहे.
या चौकोनाकार मंदिरावर नव्याने बांधलेले उंच शिखर आहे. या अष्टकोनी शिखराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. खालच्या स्तरावर मोठ्या आकाराची देवकोष्ठके व आतल्या बाजूला त्याहून कमी आकाराची देवकोष्ठके आहेत. या सर्व देवकोष्ठकांवर आमलक व लहान कळस अशी ही रचना आहे. सर्वांत वरच्या बाजूस कमळ पाकळ्यांत आमलक व त्यावर उंच कळस आहे. मंदिराच्या छताच्या चारी कोपऱ्यांत बुटक्या चौकोनी खांबावर घटकमलाकार आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूस, भिंतीपासून थोड्या अंतरावर दोन पाषाण आहेत. त्यांवर फुले व कुंकू वाहिले जाते. यातील एका पाषाणाच्या खाली भुयाराचे मुख असल्याचे सांगण्यात येते. याबाबत अशी आख्यायिका आहे की लिंगेश्वराने त्याचा छोटा भाऊ कुणकेश्वर यास या भुयारातून कुणकेश्वरास पाठविले होते. भाविक या ठिकाणावरून कुकेश्वराची पूजा करतात. ही पूजा कुणकेश्वरापर्यंत पोहोचते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या तुळशी वृंदावनापासून पुढे काही अंतरावर एक प्राचीन विहीर आहे. या विहिरीस पायऱ्या आहेत व त्यात वर्षभर तुडुंब पाणी असते, असे ग्रामस्थ सांगतात.
या मंदिरात महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने लिंगेश्वराच्या दर्शनास येतात. त्याच प्रमाणे येथे दर श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.