महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून वर्धा जिल्हा प्रसिद्ध आहे. वर्धा शहरातील लक्ष्मी–नारायण मंदिर महत्त्वाच्या धार्मिक स्थानाबरोबरच अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार ठरले आहे. १९०५ मध्ये बांधलेले हे मंदिर जमनालाल बजाज यांनी १९२८ मध्ये हरिजनांसाठी खुले केले. दलित, अस्पृश्यांसाठी खुले झालेले हे देशातील पहिले मंदिर ठरले होते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील देवतांच्या मूर्तींना भरजरी वस्त्रांऐवजी केवळ खादीची वस्त्रे परिधान केली जातात. १०० हून जास्त वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जाते.
वर्धा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराचे सेठ बच्छराज यांच्या मार्गदर्शनाखाली १९०५ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि १९०७ मध्ये त्यात लक्ष्मी– नारायण यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. १७ जुलै १९२८ रोजी महात्मा गांधींच्या आदर्शांनी प्रेरित होऊन आणि जमनालाल बजाज यांच्या पुढाकाराने आचार्य विनोबा भावे यांनी या मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी दलितांच्या एका गटाचे नेतृत्व केले होते. गांधीजींना अभिप्रेत असलेले समाजसुधारणेचे धाडस जमनालाल बजाज यांनी दाखविले होते. गांधीवादी सामाजिक क्रांतिपर्वातील ही महत्त्वाची वाटचाल होती.
दलितांना प्रवेश देणारे भारतातील हे पहिलेच मंदिर ठरल्याने देश–विदेशातून तेव्हा त्याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या महत्त्वपूर्ण घटनेनंतर गांधीजींनी प्रसिद्ध केलेल्या आपल्या मनोगतामध्ये असे म्हटले होते की लक्ष्मी–नारायण मंदिरासारखे सुप्रसिद्ध मंदिर अस्पृश्यांना जाहीरपणे खुले करण्यात येत असताना सनातन्यांनी विरोधाचा ‘ब्र’ ही काढू नये, हे खरोखर आश्चर्यकारक आहे. आजपर्यंत मनाई असलेल्या हिंदू मंदिराचा उंबरठा ओलांडण्यास अस्पृश्य लोक पुढे येत आहेत, हे पाहूनही सनातन धर्माच्या नावाखाली धर्ममार्तंडांनी गोंधळ माजविला नाही, हे खरोखरच महत्त्वपूर्ण आहे. अस्पृश्यतेविरुद्ध चालू असलेल्या चळवळीची किती आश्चर्यकारक प्रमाणात प्रगती झाली आहे, याचे हे स्पष्ट निदर्शक आहे. सुधारणेच्या खऱ्या चळवळीसाठी दृढनिष्ठा व चिकाटी यांच्याद्वारे कणखर लोकमत कसे बनविता येते, तेही यावरून दिसून येईल. शेठ जमनालाल बजाज व त्यांचे सहकारी विश्वस्त यांनी हा जो धाडसी उपक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि सबंध हिंदुस्थानभर त्यांचे अनुकरण केले जाईल, अशी मी आशा बाळगतो.
१९४२ मध्ये सेवाग्राम येथून ‘छोडो भारत’ आंदोलनासाठी मुंबईला रवाना होण्याआधी महात्मा गांधी यांनी या मंदिरात येऊन लक्ष्मी–नारायणाचे दर्शन घेतले होते. हे भव्य मंदिर यावर असलेले वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम, उत्कृष्ट शिल्पे, स्तंभांवरील कुशल कारागिरी यासाठीही प्रसिद्ध आहे. दुमजली असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असून दोन्ही बाजूला द्वारपालांची शिल्पे आहेत. ६ ते ७ पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील द्वारपट्टीच्या वरच्या दोन्ही बाजूला बासरी वाजवितानाच्या श्रीकृष्ण मूर्ती आहेत़, तर ललाटबिंबावर श्रीगणेशाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. अंतराळातील स्तंभांवर कलाकुसर असून वरच्या बाजूला भारवाहक प्रतिमांचे अंकन आहे. गर्भगृहात उंच चौथऱ्यावर श्रीविष्णू व लक्ष्मी माता यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. श्रीविष्णूंची मूर्ती चतुर्भुज, तर लक्ष्मी मातेची मूर्ती द्विभुज आहे. या दोन्ही मूर्तींवर सुंदर मुकट आहेत.
स्वर्गीय जमनालाल बजाज यांनी हरिजनांसाठी हे मंदिर खुले केल्यानंतर १९ जुलै १९२८ रोजी या मंदिराच्या शेजारीच गोरगरिबांसाठी धर्मार्थ औषधालय सुरू केले होते. ९६ वर्षांनंतर आजही मंदिराशेजारी हे औषधालय सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात असणाऱ्या सेवाग्राम येथील बापू कुटी, पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम या वास्तूंना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचबरोबरीने जमनालाल बजाज यांच्या काळात सुरू झालेल्या लक्ष्मी–नारायण मंदिरालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणांना भेटी देण्यासाठी देश–विदेशातील अनेक पर्यटक येत असतात.
वृंदावनात साजरी होणारी ‘लठमार’ होळी देशात परिचित आहे. यामध्ये गोपिका आपल्या पती वा प्रियकरास लाठीने मारण्यासाठी जातात व ते त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. यावेळी रंगांची व फुलांची उधळण होत असते. अशाच प्रकारच्या होळीचे आयोजन लक्ष्मी–नारायण मंदिरातही दरवर्षी करण्यात येते. केवळ यामध्ये रंगांचा वापर न करता फुलांची उधळण होते. या देवस्थानाचे विश्वस्त प्रसिद्ध उद्योजक बजाज कुटुंबीय आहेत. हा होळीचा सण साजरा करण्यासाठी बजाज कुटुंबातील सदस्य पुण्याहून वर्धा येथे दरवर्षी आवर्जून येतात. येथील आणखी एक वैशिष्ट्य असे की या मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्यापासून नैवेद्याचा प्रसाद हा गाईचे दूध, तूप व मंदिराजवळ असलेल्या कुंडाच्या पाण्यापासूनच बनविला जातो.
या मंदिरामध्ये सुसज्ज ग्रंथालय असून त्यात संस्कृत, प्राकृत व हिंदी भाषेतील वेद, उपनिषदे, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचा संग्रह आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी वर्धा रेल्वे स्थानकाजवळ मंदिराच्या मालकीची सेठ बच्छराज धर्मशाळाही आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे येथे दररोज सकाळी ६ ते ७.३० पर्यंत निःशुल्क प्राणायाम वर्ग चालविले जातात. दररोज रात्री ८ ते ९.१५ वाजता येथे भजन होते. तसेच प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसाचे पठण केले जाते.