लक्ष्मीनारायण मंदिर

वालावल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

असे म्हटले जाते की कोकणातील निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे वालावल. वेगळा बाज असणारा मराठी चित्रपटचानीच्या माध्यमातून वालावल हे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. कुडाळ प्रांताचे बाराव्या शतकातील स्वामी चंद्रभान आणि सूर्यभान देसाई यांची वालावल ही राजधानी होती. या ऐतिहासिक निसर्गसमृद्ध वालावलचे खरे वैभव म्हणजे येथील लक्ष्मीनारायण मंदिर होय. असे सांगितले जाते की या मंदिरात कधीही शेजारती होत नाही. कारण देव लक्ष्मीनारायण भक्तांच्या कल्याणासाठी नेहमी जागरूक आणि तत्पर असतो. देव लक्ष्मीनारायण येथील प्रभूसरदेसाई कुटुंबीयांचे कुलदैवत आहे

ऐतिहासिक माहितीनुसार, .. १३५१५२ मध्ये बहामनी सुलतान हसन गंगूने राजे कदंब यांच्या ताब्यात असलेल्या गोवा प्रांतावर विजय मिळविला होता. .. १३५२१३८० या काळात बहामनी सत्तेकडून गोव्यातील नागरिकांचे सक्तीने धर्मांतर केले जात होते. नागरिकांचा छळ करून तेथील देवालये भ्रष्ट केली जात होती. तेथील सप्तकोटीश्वर हे गोव्यातील कदंब राजघराण्याचे कुलदैवत होते. त्यामुळे कदंब घराण्यातील राजांनी गोव्यातील सप्तकोटीश्वर मंदिरात संपत्ती दडवून ठेवली असेल, असा समज करून बहामनी सत्तेकडून संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले होते. अशा या काळात देव नारायणाच्याहरमल’ (गोव्यातील एक गाव) येथील देवालयाला धोका उत्पन्न झाला होता. असे सांगितले जाते की हा धोका ओळखून तेथील ब्राह्मण पुजारी कल्याण पुरुष याने देव नारायणाची मूर्ती हरमल गावातून आणून तिची दक्षिण कोकणातील वालावल येथे स्थापना केली होती.

लक्ष्मीनारायणाचे मंदिर हे वालावल गावातील मुड्याचा कोन दरीच्या पायथ्याशी, एका विस्तीर्ण तलावाकाठी आहे. या मंदिराचे बांधकाम जांभ्या दगडाचे, तर गर्भगृहाचा दरवाजा आणि आतील खांब काळीथर दगडाचे (विशिष्ट प्रकारचा काळा दगड) आहेत. भव्य प्रवेशद्वाराच्या कमानीतून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील प्रशस्त प्रांगण, मंदिराचे कौलारू छप्पर, मंदिरासमोर असलेल्या मोठ्या चौथऱ्यावर उंचच उंच अशा पाच दीपमाळा शेजारी विस्तीर्ण जलाशय यामुळे या निसर्गसमृद्ध परिसराचे सौंदर्य आणखी खुलते. दीपमाळांच्या चौथऱ्यावर कल्याण पुरुषाची घुमटी तुळशी वृंदावन आहे. या घुमटीवर श्रींच्या पादुका कोरलेल्या आहेत. असे सांगितले जाते की कल्याण पुरुषाने समाधी घेताना आपली नजर सतत श्रींच्या चरणाकडे असावी आणि श्रींच्या पादुकांवरील तीर्थ आपल्या मस्तकावर पडावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. या घुमटीला तीन सें.मी. लांबी रुंदीचे एक भोक आहे. त्यातून पाहिले असता गाभाऱ्यातील लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीचे दर्शन घडते. तुळशी वृंदावनाच्या समोरील बाजूस दास मारुतीची मूर्ती आहे.

लक्ष्मीनारायणाचे हे मंदिर चौदाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराची रचना त्रिस्तरीय म्हणजेच मुख्य सभामंडप, मध्यवर्ती सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी आहे. मुख्य सभामंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा असून बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या सभामंडपात असलेल्या चौकोनी आकाराच्या लाकडी खांबांच्या वरील बाजूस गजमुखांची शिल्पे आहेत त्यांनी आपल्या सोंडेमध्ये दिवे धरलेले आहेत. कोकणी स्थापत्य शैलीनुसार सभामंडपाचा मधला आयताकृती भाग हा बाजूच्या जमिनीपासून काही इंच खोलगट आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस असलेल्या पाच पायऱ्या चढून मध्यवर्ती सभामंडपात प्रवेश होतो. या मंडपाच्या समोरील बाजूस सिंहाचे शिल्प आहे. मध्यवर्ती सभामंडपाचीही रचना मुख्य सभामंडपासारखीच असली तरी येथील खांब हे आकाराने मोठे त्यावर अत्यंत बारीक कलाकुसर केलेली दिसते. खांबांच्या वरील भागात भक्कम नक्षीदार तुळया आहेत. या सभामंडपाच्या मध्यभागी पितळी कासवमूर्ती आहे. त्यावर सन १८८९ असा उल्लेख स्थापनकर्त्याचेभानू बापू हळदणकरअसे नाव आहे.

येथून आणखी तीन पायऱ्या चढून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे, तर नक्षीदार द्वारपट्टीच्या खालील दोन्ही बाजूस व्याल कोरलेले आहेत. अंतराळात काळाकभिन्न आणि गुळगुळीत असे सहा कोरीव खांब आहेत. या खांबांची उंची सुमारे साडेसहा फूट इतकी आहे. या पाषाणी खांबांवरील कोरीव काम शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. प्रत्येक खांबांच्या मध्यावर सुमारे १५ सें.मी. उंचीच्या विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या खांबावरील मूर्तीच्या वरची आणि खालची नक्षी वैशिष्ट्यपूर्ण भिन्न भिन्न अशा आहेत.

या मंदिराचे वेगळेपण म्हणजे येथील अंतराळाच्या छतावर कोरलेली काष्ठशिल्पे. या अंतराळाच्या छताच्या डावीकडील भागात नैऋत्येस निऋती, दक्षिणेस यम, आग्नेयेस अग्नी उजवीकडील भागात वायव्येस वायू, उत्तरेकडे कुबेर आणि ईशान्येला इशान यांची शिल्पे आहेत. याशिवाय ब्रह्मदेव, गंडभेरूंड, वरुण, इंद्र, नाग, नरसिंह, मत्स्य, कुर्म, महिषासुरमर्दिनी, गणपती, मोहिनीरूपी विष्णू, परशुराम, श्रीराम, कृष्ण बुद्ध यांची काष्ठशिल्पे आहेत

येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर शेषशायी विष्णूचे शिल्प आहे. त्याच भागाजवळ डावीकडे अग्नी, कुबेर, ब्रह्मदेव, सूर्यपत्नी छाया ही शिल्पे, तर उजवीकडे सूर्यपत्नी प्रत्युषा, भैरव, कार्तिकेय इंद्र यांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला द्वारपाल आहेत. द्वारपालांच्या वरच्या बाजूलाही विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराला लागून उजवीकडे मारुती डावीकडे गरुड यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहात असलेली सुमारे दीड मीटर उंचीची काळ्या वालुकाश्मात कोरलेली लक्ष्मीनारायणाची मूर्ती ही आठव्या शतकात चालुक्यांच्या आमदनीत किंवा अकराव्या शतकातील असावी, असे सांगितले जाते. ही मूर्ती अतिशय प्रमाणबद्ध अशी आहे. ही मूर्ती उलट्या पाकळ्यांच्या वरच्या सुलट्या पाकळ्यांच्या कमलासनात समभंग (दोन्ही पायांवर सारखा भार) उभी आहे

लक्ष्मीनारायणाच्या मस्तकावर उभट असा करंडक मुकुट आहे त्याच्या वरच्या भागात शिवलिंग कोरलेले आहे. करंडक मुकुटामागे उभट गोल प्रभामंडल आहे. या मूर्तीला नंतर चांदीचे डोळे बसविले आहेत. मूर्तीच्या पुढच्या उजव्या हातात चक्र, मागच्या (वरच्या) उजव्या हातात गदा ही आयुधे, तर वरच्या डाव्या हातात शंख आणि खालच्या डाव्या हातात पद्म (कमळ) आहेत. या चारही हातात कंकणे दंडांवर बाजूबंद आहेत. डाव्या खांद्यावरून पोटापर्यंत रुळलेले यज्ञोपवीत (जानवे) गळ्यात एक हार आहे. मूर्तीच्या कमरेवर अधोवस्त्र त्यावर कटिमेखला आहे. साधारणतः बहुतेक सर्व प्रकारच्या विष्णू मूर्तींमध्ये विष्णूपत्नी लक्ष्मी ही विष्णू मूर्तीच्या डाव्या बाजूला असते. या मूर्तीत मात्र कमलपुष्प धरणारी लक्ष्मीची मूर्ती लहान आकाराची आणि विष्णूच्या उजव्या पायाजवळ आहे. डाव्या बाजूला देहुडापाऊली (उजवा पाय किंचित दुमडून डाव्या पायामागे ठेवलेला) नमस्कार मुद्रेतील मानवरूपातील गरुडमूर्ती आहे, हे या मूर्तीचे वेगळेपण असल्याचे सांगितले जाते. नंतरच्या काळात या मूर्तीभोवती धातूची कलाकुसरयुक्त महिरप बनविण्यात आलेली आहे. त्यात मूर्तीच्या मुकुटाजवळ नागफण्यासारखी कलाकुसर आहे

वालावल येथील लक्ष्मीनारायणाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती हा कोकणचा अमूल्य ठेवा समजला जातो. गुढीपाडव्याला येथे मोठा उत्सव असतो. या शिवाय मंदिरामध्ये भाविकांना आगाऊ कल्पना देऊन काही शुल्क भरून लघुरुद्र, सत्यनारायण पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक, पवमान अभिषेक, सहस्त्र नामजप, महारुद्र तुलाभार विधी करता येतात

उपयुक्त माहिती

  • कुडाळपासून ११ किमी अंतरावर
  • कुडाळ येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात भक्त निवासाची सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२१० ७६०६४
Back To Home