लक्ष्मी मंदिर

जांभवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग


पाचल वैभववाडी मार्गावर तिरवडेपासून सात किमी अंतरावर जांभवडे या गावी असलेले लक्ष्मी मंदिर हे येथील पंचक्रोशीचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी हे आदिशक्तीचे एक रूप आहे. त्रिगुणात्मक, सर्वश्रेष्ठ सर्वव्यापक अशी महालक्ष्मी ही जगाचे आदिकारण आहे, असेदुर्गासप्तशतीया ग्रंथात म्हटलेले आहे. महालक्ष्मी ही दुर्गा रूप असल्याचेही मानण्यात येते. महिषासुरमर्दिनी चंडीला महालक्ष्मी मानण्यात आले आहे, तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे स्थान हे शक्तिपीठ असल्याने तेथील देवीही दुर्गारूप आहे. जांभवडे येथील लक्ष्मी मंदिरही महालक्ष्मीच्या याच दुर्गास्वरूप देवीचे मंदिर आहे

जांभवडेतील देवीचे हे स्थान जागृत असून लक्ष्मीदेवी भक्तांच्या हाकेला धावून येते नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गावापासून ५०० मीटर अंतरावर रस्त्याला लागूनच या मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंच महिरपी कमान आहे. मंदिराला सर्व बाजूंनी जांभ्या दगडात बांधलेली तटबंदी आहे. तटबंदीस पूर्व पश्चिम दिशेस प्रवेशद्वारे आहेत. यातील पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीतून आत येताच मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या फरसबंद केलेल्या प्रांगणात भाविकांच्या सोयीसाठी, तसेच हरिनाम सप्ताह, नवरात्रोत्सव आदी धार्मिक सोहळे साजरे करण्यासाठी पत्र्याची विस्तीर्ण पडवी उभारण्यात आली आहे. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारानजीक नव्यानेच बांधलेला चार स्तरीय चौरसाकार दीपस्तंभ आहे. या स्तंभाच्या चौथऱ्याजवळ काही जुन्या मूर्ती दगडी पादुका आहेत

पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर जमिनीपासून अडीच ते तीन फूट उंचीच्या जगतीवर बांधलेले आहे. कोकणातील अन्य अनेक मंदिरांप्रमाणेच हे मंदिर कौलारू असून ते दुमजली चार पाखी आहे. सभामंडप, गर्भगृह गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग असे मंदिराचे स्वरूप आहे. दीपस्तंभापासून समोरील तीन पायऱ्या चढल्यावर खुल्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात बाहेरच्या आतील बाजूने मिळून एकूण २० लाकडी खांब आहेत. काही खांबांवर कोरीव नक्षीकाम दिसते. खांबांचा आकार चौकोनी आहे. प्राचीन हेमाडपंती मंदिरातील खांबांवर ज्या प्रमाणे तुळयांना आधार देण्यासाठी खांबाच्या शीर्ष भागात अधिकच्या आकाराचे तरंगहस्त असतात, तसेच तरंगहस्त येथेही आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी तुळयांना अनेक घंटा टांगलेल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवसपूर्तीनंतर भाविकांकडून या घंटा येथे बांधल्या जातात

सभामंडपात तुळईच्या वरच्या भिंतींवर लक्ष्मीच्या प्रतिमा आहेत. मात्र ही देवी दुर्गास्वरूपात नसून ती चतुर्भुज कमळात बसलेली आहे. मंडपातील मधल्या खांबांच्या वरील तुळईस समोरासमोर अशी दोन मृगशिरे बसवण्यात आलेली आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर लाकडी महिरपी कमान आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस छोट्या देवळीत गणपती उजव्या बाजूला विठ्ठलरुख्मिणीच्या पितळी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर ओमकार आहे. बाजूस फुलांची नक्षी आहे. गर्भगृहात सजलेल्या वज्रपीठावर लक्ष्मीदेवीच्या दोन पाषाण मूर्ती आहेत. यातील एक मूर्ती चतुर्भुज देवीची आहे. तिच्या एका हातामध्ये खड्‌ग पायाशी दोन नरमुंडे आहेत. विशेष म्हणजे या मूर्तींच्या मागे भिंतीवर विष्णू पत्नी लक्ष्मीची प्रतिमा चितारण्यात आली आहे. वज्रपीठावर मयूर कमळ आदी आकृत्या कोरलेल्या आहेत. गर्भगृहात डाव्या बाजूला १७ लहान मोठे, गोल, तसेच दंडाकृती गुळगुळीत दगड मांडलेले आहेत. त्यांचीही येथे रोज पूजा केली जाते. येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे स्थानिक लोकदेव आहेत

मंदिराच्या गर्भगृहावर उंच शिखर आहे. शिखराचा आकार खालच्या बाजूने घटपल्लवासारखा आहे. त्यावर वर्तुळाकार स्तंभ त्यांदरम्यानच्या खोलगट भागांत खालून कमळाच्या उमलत्या पाकळ्या असलेले घटाकार एकावर एक बसवण्यात आलेले आहेत. यामुळे शिखराची रचना वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. या शिखरावर मोठा आमलक त्यावर सोनेरी कळस आहे. आमलकाच्या खालच्या बाजूला याच आमलकाच्या अनेक छोट्या प्रतिकृती लावलेल्या आहेत

या मंदिरात नवरात्रोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा आदी उत्सव साजरे केले जातात. मंदिरातील विस्तीर्ण पडवीत वेळोवेळी कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या समोर काही अंतरावर होळीचा मांड म्हणजे पालखी ठेवण्याचा चौथरा आहे. येथे शिमगोत्सवात होलिकादहन केले जाते

उपयुक्त माहिती

  • वैभववाडीपासून ३५ किमी, तर खारेपाटणपासूनही ३५ किमी अंतरावर
  • वैभववाडी तसेच खारेपाटण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home