लक्ष्मी नरसिंह मंदिर

सांगवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर

हिंदू धर्मात वैष्णव आणि शैव हे दोन भिन्न पंथ असले, तरी भारतीय धर्मपरंपरेने विष्णू आणि शिव म्हणजेच हरि आणि हर यांच्यात ऐक्य असल्याचे मानले आहे. याची प्रचिती सांगवडे येथील लक्ष्मीनरसिंह मंदिरातून येते. विष्णूपत्नी लक्ष्मी आणि विष्णूचा चौथा अवतार मानण्यात आलेला नरसिंह यांच्या या मंदिरात शंकराचेही निवास असल्याचे मानले जाते. त्यामुळे एरवी शिवमंदिरात दिसणारा नंदी या मंदिरात विराजमान आहे. विष्णू आणि शिव यांची एकत्रित पूजा केली जाणारे असे मंदिर दुर्मिळ असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात

नरसिंह पुराणाच्या ४१ ते ४३ या अध्यायांत विष्णूच्या या चौथ्या अवताराची कथा देण्यात आली आहे. त्यानुसार, दैत्यराज हिरण्यकश्यपू याचा पुत्र प्रल्हाद विष्णूभक्त होता. त्यामुळे हिरण्यकश्यपूने त्यास मारण्याचे अनेक प्रयत्न केले. ते सर्व विष्णूकृपेने फोल ठरल्यामुळे तो त्याची चंद्रहास नामक तलवार घेऊन प्रल्हादाच्या अंगावर धावून गेला. तो म्हणाला कीत्वयोक्तं हि सर्वत्र कस्मात्स्तम्भे दृश्यते। यदि पश्यामि तं विष्णुमधुना स्तम्भमध्यगम्।।याचा अर्थ असा की विष्णू सर्वत्र आहे असे तू म्हणाला होतास. मग या स्तंभात तो का दिसत नाही? ‘तर्हि त्वां वधिष्यामि भविष्यसि द्विधान्यथा प्रल्हादोsपि तथा दृष्ट्वा दध्यौ तं परमेश्वरम् ।।मला विष्णू या स्तंभात दिसला, तर मी तुला मारणार नाही. पण तसे झाल्यास या तलवारीने तुला ठार मारीन

हिरण्यकश्यपूने अशी धमकी देताच तेथील स्फटिकासारख्या स्तंभाचे दोन तुकडे झाले आणि त्यातून नरसिंह प्रकट झाला. अर्ध सिंह, अर्ध पुरूष असा हा नरसिंह – ‘संध्याकाले गृहद्वारि स्थित्वोरौ स्थाप्यं तं रिपुम्। वज्रतुल्यमहोरस्कं हिरण्यकशिपुं रूषा। नखैः किसलयमिव दारयत्याह सोsसुरः।।म्हणजे संध्याकाळच्या वेळी त्या वज्रासमान कठोर विशाल छाती असलेल्या हिरण्यकश्यपुला आपल्या मांडीवर घेऊन नखांनी त्याला वृक्षाच्या पानाप्रमाणे विदिर्ण करू लागला. अशा प्रकारे नरसिंहाने हिरण्यकश्यपुचा वध केला. नरसिंह पुराणानुसार, यानंतर नरसिंह सर्व लोकांचे कल्याण करण्याकरीता श्रीशैल शिखरावर जाऊन राहिले. परंतु शैव ग्रंथांनुसार, हिरण्यकश्यपूच्या वधानंतरही नरसिंहाचा संताप शमला नाही. त्या संतापाचा चटका अखिल सृष्टीला बसू लागला. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी भगवान शंकर पुढे सरसावले. त्यांनी उग्र शरभाचा अवतार घेतला. हिंदू पुराणांमध्ये वर्णिलेला हा अंशतः सिंह अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे. शरभ आणि नरसिंह यांच्यात त्यावेळी तुंबळ युद्ध झाले. त्यात त्यांनी परस्परांचे वेष ओढून काढले. सिंह आणि शरभ बाजूला झाल्यानंतर हरि आणि हर एकाकार झाले.

येथील मंदिराबाबत आख्यायिका अशी की सांगवडे गावात एक नरसिंहभक्त होता. तो कोळे नरसिंहपूर येथील मंदिरात नियमितपणे दर्शनासाठी जात असे. वार्धक्यामुळे त्याला तो प्रवास करणे अशक्य झाले. त्यामुळे अवस्थ झालेल्या त्या भक्ताला नरसिंहाने लक्ष्मीसह स्वप्नदृष्टांत दिला. त्यानुसार त्याला दुसऱ्या दिवशी गावाजवळच पाषाण स्वरुपात नरसिंह प्रकट झालेला दिसला. या नंतर या तांदळा स्वरुपातील मूर्तीचे मंदिर बांधण्यात आले. येथील मूळ मंदिर तीनशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते

मंदिर मोठ्या प्रांगणात वसलेले आहे. प्रांगणास उंच, कमानदार दगडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या छतावर तीन मेघडंबऱ्या आहेत. येथून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. समोरच दोन भव्य दगडी दीपमाळा, तसेच तुळशीवृंदावन आहे. बाजूला अन्नछत्रालय, पूजासाहित्याची दुकाने, तसेच नव्याने बांधलेले दुमजली भक्तनिवास आहे. परिसरात मुख्य मंदिराबरोबरच विठ्ठलरखुमाई, संत ज्ञानेश्वर, हनुमान आदी देवतांची मंदिरेही आहेत

लक्ष्मी नरसिंहाचे मुख्य मंदिर दगडी चिऱ्यांनी बांधलेले आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे सध्याचे स्वरूप आहे. सभामंडपावर छोटे शिखर, तर गर्भगृहावर वर निमुळते होत गेलेले उंच शिखर आहे. मंदिराचा सभामंडप हा अलीकडे, १९७९ मध्ये बांधण्यात आला आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपास बाजूने गोल स्तंभ आहेत ते एकमेकांना कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या समोरील बाजूस कमानीच्या वर मध्यभागी सिंहमुखाचे शिल्प आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस सूर्यनारायणाची कोरीव प्रतिमा आहे. येथेच खालच्या बाजूस मोठा दगडी चौथरा आहे. खाली चौकोनी आणि वर मध्यभागी अष्टकोनी असलेल्या या चौथऱ्यावर यात्राकाळात देवाची पालखी ठेवली जाते. सभामंडपात अनेक घंटा टांगलेल्या आहेत. अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे आहे त्यास कोरीव काम केलेले दगडी स्तंभ आणि दगडी तुळया आहेत. हे बांधकाम मंदिराच्या पुरातनतेची साक्ष देतात. येथे काळ्या पाषाणात कोरलेली नंदीची मोठी मूर्ती आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीची शिंगे, तसेच कान पितळेचे आहेत

गर्भगृहाचे प्रवेशद्वार तीन शाखीय कोरीव नक्षीकामाने सुशोभित आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. आत बैठ्या सिंहासनावर नरसिंहाची बसलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे. स्वयंभू दगडी तांदळ्यावर चांदीचा मुखवटा अशा स्वरूपातील या मूर्तीच्या मस्तकी चांदीचा मुकूट आहे. बाजूलाच लक्ष्मीची नाकात नथ, गळ्यात विविध अलंकार धारण केलेली पितळी मुखवटा असलेली मूर्ती आहे. मूर्तींच्या मागे चांदीची, कोरीव नक्षीकाम असलेली प्रभावळ आहे. त्यात मध्यभागी, नरसिंह मूर्तीच्या बरोबर वरच्या भागात पंचमुखी नागाची मोठी प्रतिमा आहे. त्याच्यावर सिंहमुख आहे. या मूर्तींसमोर खालच्या बाजूला अश्वारूढ भैरव स्वरूपातील नरसिंहाची लहान पितळी मूर्ती, तसेच हनुमानाचा मस्तकी फेटा बांधलेला पितळी मुखवटा आहे. नृसिंह अवताराचे प्रकटीकरण प्रदोष कालावधीत झाले असल्याने या मंदिरात दर संध्याकाळी त्याची पूजा करण्यात येते. शनिवार हा नरसिंहाचा वार मानला जातो. मुख्यतः त्या दिवशी त्याची उपसाना केली जाते. पण सांगवडेच्या या मंदिरात सोमवारला मोठे महत्व आहे. दर श्रावणी सोमवारी येथे भक्तमंडळींची झुंबड उडते. नरसिंहाच्या देवळात अभिषेकाच्या वेळी पुरुष सुक्त किंवा पंचसुक्ताचा पाठ केला जातो. या मंदिरात मात्र देवतांच्या मूर्तीला जेव्हा अभिषेक होतो तेव्हा रुद्र सुक्ताचा पाठ केला जातो. मंदिरातील नृसिंहाची पालखी निघते तेव्हा दिली जाणारी ललकारी शिवहरी अशी आहे

या मंदिरात साजरे होणारे दोन मोठे उत्सव म्हणजे, वैशाख महिन्यात साजरी होणारी नरसिंह जयंती आणि चैत्र महिन्यात होणारा पाकाळणी उत्सव. प्रक्षालन या शब्दाचा अपभ्रंश होऊन पाकाळणी हा शब्द तयार झाला असावा. त्याचा अर्थ आहे अंतर्बाह्य स्वच्छ करणे. या उत्सवाच्या वेळी मंदिराची सर्व तऱ्हेने स्वच्छता करण्यात येते. या निमित्ताने भाविकांनीही आपल्या तनामनात असलेला मेद, मोह, मत्सर दूर करावा, अशी या उत्सवामागची प्रेरणा असल्याचे सांगितले जाते. या उत्सवात सासनकाठ्या नाचवल्या जातात. पालखी निघते तेव्हा खारीक, खोबरे आणि गुलालाची उधळण होते आणि सारा परिसर हरिहराच्या जयजयकाराने दुमदुमून जातो. याशिवाय श्रावण महिन्यातील सोमवारी आणि प्रत्येक अमवास्येलाही येथे गर्दी होते. मंदिराच्या मागच्या बाजूला वडाचे मोठे झाड आहे. त्या भोवती बांधण्यात आलेल्या पारावर काही प्राचीन मूर्ती, तसेच वीरगळ आहेत. त्यास देवांची पंचायत असे म्हणतात.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून १४ किमी अंतरावर
  • कोल्हापूरपासून एसटीची सुविधा
  • राज्यातील अनेक शहरांतून कोल्हापूरसाठी एसटी रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home