लक्षतीर्थ / सर्वेश्वर मंदिर

कोल्हापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर

‘यवाधिक दक्षिण काशी। ऐसे म्हणती जयासी।’ त्या करवीर नगरीमध्ये विविध देवतांचा वास आहे, तसेच विविध तीर्थे आहेत. त्यामुळेच ‘करवीर माहात्म्य’कारांनी ‘जें सर्वतीर्थांनी युक्त सुंदर। प्राचीन प्रख्यात पापनाशकर। जेथें मल्लिकार्जुन शोभे पर्वतावर। ऐसे क्षेत्र कोणतें असे।’ असा सवाल करून करवीर हे त्याचे उत्तर दिले आहे. या तीर्थांपैकी एक रमणीय तीर्थ म्हणजे लक्षतीर्थ तलाव होय. कोल्हापूर शहराच्या उत्तरेकडील भागात हा तलाव वसला आहे व त्याच्या तीरावर लक्षेश्वराचे मंदिर आहे. या तीर्थास पूर्वी विमुक्ततीर्थ, तर येथील लिंगास विमुक्तेश्वर असेही म्हणत असत.

लक्षतीर्थाबाबत एक आख्यायिका अशी की प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर याने या भागामध्ये आपल्या दुष्ट कारवायांनी देवी-देवतांना त्राही माम् करून सोडले होते. त्यामुळे सर्व देवतांनी त्याच्यापासून मुक्ती मिळावी म्हणून देवीची याचना केली. तेव्हा देवी कोल्हापुरात आली. कोल्हासुराने या स्थानाच्या पूर्वेस रक्तलोल, पश्चिमेस रक्ताक्ष, उत्तरेस रक्तभोज आणि दक्षिणेस रक्तबीज या राक्षसांची नियुक्ती केली होती. देवीने त्या क्षेत्रांवर आक्रमण करून या राक्षसांचा वध केला. त्या समयी काही दैत्यांनी देवीकडे आम्हाला तुझ्या हातून मुक्ती मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. देवीने त्यांची इच्छापूर्ती केली. लाखाच्या संख्येने असणाऱ्या दैत्यांना ज्या तीर्थावर मुक्ती मिळाली, त्यास तेव्हापासून लक्षतीर्थ हे नाव पडले. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या तीर्थावर स्नान करणाऱ्याचे पापक्षालन होऊन त्यास मुक्ती मिळते.

कोल्हापूरचा भौगोलिक इतिहास पाहता लक्षात येते की या शहर व परिसरात अनेक तलाव, तळी होती. फिरंगाई, वरुणतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर तलाव ही त्यातील काहींची नावे. लक्षतीर्थ हे त्यातीलच एक. जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तेथे नागरी वस्ती झाली. ब्रिटिशांचे राजकीय प्रभुत्व येथे प्रस्थापित झाल्यानंतर म्हणजे साधारणतः १८८४ नंतर ही प्रक्रिया सुरू झाली. आता काही मोजकेच तलाव आणि तळी येथे शिल्लक आहेत. रंकाळा आणि कोटीतीर्थ प्रमाणेच लक्षतीर्थ हा त्यातील एक तलाव.

मुख्य शहरापासून साधारणतः दोन ते तीन किमी अंतरावर असलेल्या लक्षतीर्थाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. आजूबाजूला शेतमळे व झाडे आहेत. तलाव कमळांच्या फुलांनी फुललेला आहे. त्याच्या काठावर एका मोठ्या दगडी चौथऱ्यावर लक्षेश्वराचे छोटेखानी मंदिर स्थित आहे. या मंदिरासमोर भाविकांच्या सोयीकरीता पत्र्याची शेड बांधलेली आहे. या शेडखाली मंदिरासमोर दगडी चौथऱ्यावर धातूची नंदीमूर्ती आहे. डाव्या बाजूला हनुमानाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

मंदिर दगडात बांधलेले आहे व त्यास पिरॅमिडच्या आकाराचे शिखर आहे. वर सोनेरी आमलक आणि कळस आहे. मंदिरात लक्षेश्वराची शिवपिंडी आहे. या पिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती चौकोनाकार आहे. मध्यभागी काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे व त्यावर शंकराचा पितळी मुखवटा आहे. मुखवट्यावर नागफणा आहे. येथेच मागच्या बाजूस गणेशाची छोटी मूर्ती विराजमान आहे. तसेच वरच्या बाजूला पितळी देव्हाऱ्यामध्ये पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरात दर सोमवारी, तसेच शिवरात्रीस भाविकांची मोठी गर्दी असते. वस्तीपासून काही अंतर दूर असल्याने मंदिराचा परिसर अत्यंत शांत आहे. त्यामुळे अनेक जण येथे ध्यानसाधनेसाठी येत असतात.

लक्षेश्वराप्रमाणेच कोल्हापूरमध्ये सर्वेश्वराचेही प्राचीन मंदिर आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की कोल्हापूरमधील लक्षतीर्थात स्नान केल्यास ज्याप्रमाणे एक लाख तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते, त्याच प्रमाणे सर्वेश्वराचे दर्शन घेतले की करवीर नगरीतील सर्व तीर्थांच्या दर्शनाचे पुण्य लाभते. या मंदिराची आख्यायिका अशी की ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्यानंतर महायज्ञ करण्यासाठी त्याने कोल्हापूरची निवड केली. ब्रम्हदेवाची अशी इच्छा होती की महायज्ञ करण्यापूर्वी सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन करावे, पण देवगुरू बृहस्पतीने त्यास सर्व तीर्थांचे फळ एकाच ठिकाणी मिळेल, अशी एक शिवपिंडी तयार करून महायज्ञ करण्यास सांगितले. ब्रम्हदेवाने गुरूची आज्ञा मानून एक शिवपिंडी तयार केली. ती पिंडी म्हणजे सर्वेश्वराचे स्थान होय.

सर्वेश्वराचे हे मंदिर पंचगंगेच्या तीरावर स्थित आहे. मंदिराचा महिमा मोठा असला तरी आकार मात्र छोटेखानी आहे. छोटा मंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या समोर एका वैशिष्ट्यपूर्ण दगडी चौथऱ्यावर नंदीची प्राचीन मूर्ती आहे. येथे येताच मंडपाचे दोन मोठे स्तंभ लक्ष आकर्षित करतात. या स्तंभांच्या रचनेवरून मंदिराच्या प्राचिनत्वाचा बोध होतो. मंडपाच्या बाहेर डावीकडे संगमरवरी देवळीत गणेशाची पाषाणमूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार लहान आहे व आत सर्वेश्वराची काळ्या पाषाणातील पिंडी आहे. या मंदिराचे शिखरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते बसक्या मनोऱ्यासारखे घुमटाकार आहे. सर्वेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस उग्रनृसिंहाचे मंदिर आहे. या मंदिरात दर सोमवारी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूर बस स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • महाराष्ट्र व कर्नाटकमधील अनेक शहरांतून कोल्हापूरसाठी थेट एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home