शिवलिंग हे उत्त्पत्ती अर्थात प्रजननाचे प्रतीक आहे व शिवपिंडीवरून वाहणारे पाणी उत्पादन क्षमता वाढवते, अशी पारंपारीक श्रद्धा आहे. त्यामुळेच नदी तिरावर वा नदी पात्रात स्थापित शिवलिंग अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. भारतातील सर्वच नदी तिरांवर शिवमंदिरे अर्थात शिवलिंगे हजारो वर्षापासून स्थित आहेत. यापैकीच एक प्रसिद्ध लकमेश्वर शिवमंदिर आजरा तालुक्यातील गजरगाव येथे हिरण्यकेशी नदीच्या तिरावर आहे. जागृत देवस्थान व मंदिराची पुरातन स्थापत्य शैली यामुळे हे मंदिर अभ्यासक व भाविकांना आकर्षित करते.
असे सांगितले जाते की हे देवालय सुमारे ५०० ते ६०० वर्षांपूर्वीचे आहे. मंदिर परिसरात सापडलेल्या प्राचीन मूर्ती व वीरगळ पाहता त्याची खात्री पटते. या मंदिराची आख्यायिका अशी की गावातील लकमाजी नावाच्या एका शेतकऱ्याची गाय रानात करवंदीच्या वनात एका विशिष्ट जागी पान्हा सोडत असे. ही बाब नित्याची झाल्याने लकमाजीला कुतूहल वाटले व त्याने ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांच्या सहकार्याने लकमाजीने करवंदीच्या काटेरी वनातील झाडी तोडून शोध घेतला असता तेथे शिवपिंडी दिसून आली. झाडी तोडत असताना लकमाजीच्या कुऱ्हाडीचा एक घाव चुकून शिवपिंडीस लागला. त्यामुळे त्याला फार पश्चाताप झाला व प्रायश्चित म्हणून त्याने अन्नपाणी त्यागून प्राणत्याग केला. तेव्हापासून शिवभक्त लकमाजीचे नाव देवासोबत जोडले गेले व या देवस्थानास लकमेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले.
हिरण्यकेशीच्या तिरावरून लकमेश्वर मंदिराकडे जाताना सर्वप्रथम नजरेस पडते ते मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके व त्याच्या वर व खाली कमळ फुलांचे उठाव शैलीतील नक्षीकाम आहे. प्रवेशद्वारावर मध्यभागी छताला पितळी घंटा टांगलेली आहे. दोन्ही बाजूंच्या नक्षीदार स्तंभांवर महिरपी कमान आहे. आत दोन्ही बाजूला नक्षीदार स्तंभ असलेले पहारेकरी कक्ष व वरच्या मजल्यावर नगारखाना आहे.
प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर समोरच एका मोठ्या चौथऱ्यावर असलेली वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ लक्ष वेधून घेते. हा चौथरा दोन थरांचा आहे. यातील पहिल्या मोठ्या थरावर चारही कोनांत गजशिल्पे व दुसऱ्या लहान थरावर सिंहशिल्पे आहेत. चौथाऱ्याच्या चारही बाजूंना कमळ फुलांची उठाव शैलीतील नक्षी आहेत. चौथऱ्यावरील दीपमाळेचा पाया उखळाच्या आकाराचा आहे व त्यावरील दीपमाळ खालून वर निमुळती होत गेलेली आहे. दीपमाळेतील दीपहस्तांवर वृषभ, कासव, वराह व अश्व या प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. ही दीपमाळ १९३६ ते १९३८ साली स्थानिक कारागिरांनी बांधली असल्याचा उल्लेख दीपमाळेवर आहे. पुढे चौथऱ्यावर चौकोनी तुलसी वृंदावन आहे व ते १९०८ साली बांधून पूर्ण झाल्याची नोंद आहे. प्रांगणात कमळ फुलाच्या प्रतिकृतीत पुष्करणी आहे. पुष्करणीत शंकराची मूर्ती आहे.
पुढे मंदिराच्या दर्शनी भागात ८ स्तंभ व त्यापुढे ओसरी आहे. चौकोनी पायावर उभ्या असलेल्या गोलाकार स्तंभांच्या खालील बाजूस मंगल कलशांचा आकार आहे. त्यावर उभ्या धारेची नक्षी आहे. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. वरील बाजूस कमळ फुलांची उठाव नक्षी व विविध देवतांची चित्रे साकारलेली आहेत. स्तंभांवर हस्त व त्यावर वरच्या मजल्याचा सज्जा आहे. सज्जास कठडा आहे व कठड्यात ८ चौकोनी स्तंभ आहेत. स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या कमानींवर पानाफुलांची नक्षी आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ओसरी आहे. मंदिराचे प्रवेशद्वार लाकडी आहे व त्यावरील द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे.
सभामंडपात एकूण २२ दंडगोलाकार स्तंभ चौकोनी पायांवर उभे आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा (गूढमंडप) आहे व त्यात हवा व प्रकाश येण्यासाठी गवाक्षे आहेत. प्रवेशद्वारापासून खांबामधील जमीन सुमारे एक फूट खोल आहे. खोलगट भागात मधोमध मंदिरांचे गर्भगृह आहे. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग व त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. गर्भगृहाच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग व दोन्ही बाजूने मंदिराबाहेर पडण्यासाठी दरवाजे आहेत. मंदिराच्या छतावर सभोवती कठडा व मध्यभागी शिखर आहे. पाच थरांच्या शिखराचे खालील तीन थर अष्टकोनी आहेत. त्यातील देवकोष्ठकांत विविध देवतांच्या प्रतिमा आहेत. तिसऱ्या थरावर कमळदल नक्षीचे रिंगण व त्यावर घुमट आहे. घुमटावर आमलक, कळस व ध्वज पताका आहेत.
मंदिराच्या प्रांगणात उजव्या बाजूला चालुक्य कालीन शिवमंदिराचे भग्नावशेष आहेत. येथे शिवपिंडी व अनेक प्राचीन पाषाणमूर्ती आहेत. बाह्य बाजूस भग्न देवकोष्टकांत गणेश, शंकर व विष्णूच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या बाजूला एका पाषाणपटावर ब्राम्हणी, कौमारी, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, महेंद्री व चामुंडा या सप्तमातृकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. विविध आयुधे धारण केलेल्या या सप्तमातृका त्यांच्या हंस, मोर, वृषभ, गरुड, महेश, गज व अश्व या वाहनांवर आरुढ आहेत. प्रांगणात अलीकडील काळात बांधलेले श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती असलेले श्रीराम–जानकी मंदिर आहे. याशिवाय मुख्य मंदिराच्या शेजारी पार्श्वनाथ मंदिर आहे. अलीकडील काळात लकमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करताना जमिनीत पार्श्वनाथाची मूर्ती सापडली होती. ती या मंदिरात स्थापित आहे. याच मूर्तीच्या बाजूला असलेली पार्श्वनाथांची लहान मूर्तीं मंदिराजवळील शेतात सापडली होती. मंदिरासमोर नदीवर घाट आहे व येथे हिरण्यकेशी नदी दक्षिण दिशेला वाहते.
मंदिरात महाशिवरात्र हा मुख्य वार्षिक उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हजारो भाविक देवाच्या दर्शनाला येतात. भल्या पहाटे लघुरूद्र अभिषेक व पूजनाने दिवसाची सुरवात होते. दिवसभरात भजन–कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवाच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा करतात. यावेळी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमा, श्रावणी सोमवार, वैकुंठ चतुर्दशी, दसरा, दिवाळी या दिवशीही येथे असंख्य भाविक येतात.