वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा या गावात सुमारे एक हजार वर्षें प्राचीन असलेले क्षेत्रपालेश्वर देवस्थान हे येथील पंचक्रोशीतील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. क्षेत्रपाल किंवा क्षेत्रपालेश्वर हे वेताळ, भैरव वा रवळनाथ यांच्या प्रमाणेच यक्ष कुळातील दैवत मानले जाते. कोकणात प्रामुख्याने ग्राम व नगर संरक्षक देव म्हणून या देवांची मान्यता आहे. रुजीव पाषाणातील हा देव क्षेत्रपालेश्वर भक्ताच्या केवळ हाकेने त्याच्या संकटांचे निवारण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ‘रुजीव पाषाण’ म्हणजे भूमीत एकजीव व्हावे, अशा पद्धतीने रुजलेल्या, एकजीव झालेला पाषाण.
क्षेत्रपालेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की या गावातील एक भक्त दररोज सातेरी देवीच्या दर्शनासाठी येथे येत असे. काही दिवसांनी त्याला सातेरी माता मंदिराच्या समोरील बाजूस जमिनीतून एक शिवलिंगाच्या आकाराचा पाषाण दिवसेंदिवस वर येत असल्याचे जाणवले. त्याने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितला. गावकऱ्यांनी अनेक दिवस निरीक्षण केल्यानंतर हा लिंगरूपी पाषाण जमिनीतून वर येत असल्याचे त्यांच्याही लक्षात आले. तेव्हा त्यांनी सातेरी देवीला कौल लावून लिंगरूपी पाषाणाची ओळख विचारली. हा पाषाण क्षेत्रपालेश्वराचा असल्याचा देवीने त्यांना कौल दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी येथे रुजीव पाषाणाच्या भोवतीने क्षेत्रपालेश्वर मंदिर बांधले. देवी सातेरी पंचायतनमधील देव क्षेत्रपालेश्वर एक देवता आहे.
होडावडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ असलेले क्षेत्रपालेश्वर मंदिर हे हिरव्या वनराईने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात आहे. रस्त्यावर असलेल्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. क्षेत्रपालेश्वर मंदिराच्या समोरील बाजूस एका चौथऱ्यावर दीपस्तंभ, त्यावर आमलक व कळस आहे. त्या शेजारी तुळशी वृंदावन आहे. या मंदिराची रचना इतर कोकणी स्थापत्यरचनेप्रमाणे दुमजली व कौलारू आहे. सभामंडप, अंतराळ व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा आहे व त्याच्या भिंतींच्या जागी भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या स्तंभांमधील दोन रांगांमधील जमिनीचा काही भाग हा कोकणी स्थापत्यरचनेनुसार काही इंच खोल आहे. येथील सर्व गोलाकार खांबांवर विविध देवदेवतांची सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत.
सभामंडपापासून सहा पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. येथील अंतराळ हे बंदिस्त स्वरूपाचे आहे. पुरेसा प्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी येथील भिंतींमध्ये गवाक्ष आहेत. येथील तुळयांवर नवसपूर्तीनंतर भाविकांनी अर्पण केलेल्या अनेक पितळी घंटा लावलेल्या आहेत. अंतराळात काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. याशिवाय एका बाजूला विविध देवतांच्या तरंग काठ्या ठेवलेल्या आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीलगत गणेश, शारदानंद, लक्ष्मी, विष्णू व इतर गणांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या दाराभोवती व भिंतीस कमानीच्या आकाराचे नक्षीकाम आहे. गर्भगृहाचे दार काहीसे अरुंद आहे. गर्भगृहात क्षेत्रपालेश्वराचे रुजीव पाषाणातील स्वयंभू लिंग आहे. स्वयंभूलिंग किंवा स्वयंभुवलिंग हे सर्वांत पवित्र मानले जाते. कारण ते निसर्गतः उत्पन्न झालेले असते व अनादी काळापासून अस्तित्वात असते. त्यामुळेच ते क्षतीग्रस्त झाले तरी त्याच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता नसते.
क्षेत्रपालेश्वर मंदिराच्या समोरील बाजूस देवी सातेरी मंदिर आहे. याच मंदिरात गावातील पाहिले मानकरी असलेले दळवी समाजाचे दळवी वस आहे. तसेच बाराचा पूर्वस, बाराचा ब्राम्हण, पूर्वेच्या वस, गावडे वस, नाईक वस अशा पाषाणी मूर्ती आहेत. देवी सातेरी मंदिराला लागून राजसत्ता (सरकारी पूर्वस) मंदिर आहे. तसेच देव दांडेकर व सावंत वस मंदिर आहे.
क्षेत्रपालेश्वर मंदिर पंचायतनात महाशिवरात्र, नवरात्रोत्सव, दसरा, शिमगा, पाडवा हे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. यानिमित्ताने अनेक भाविक येथे नवस बोलण्यासाठी व नवसपूर्तीसाठीही येतात. उत्सव काळात देवाचा अभिषेक व नित्य पूजा होते. तरंगकाठ्यांची मिरवणूक काढली जाते. देवाच्या सेवेकऱ्यांच्या अंगात वारे खेळते व त्यावेळी देवास प्रश्नोत्तरे केली जातात.