कृष्णामाई मंदिर

प्रिती संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा

राजा युधिष्ठिराने योजलेल्या राजसूय यज्ञाचा भाग म्हणून दक्षिण दिग्विजयात सहदेवाने जिंकलेले शहर ही कराडची पौराणिक ओळख. प्रागैतिहासिक काळापासूनच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या शहरास कृष्णा आणि कोयना या नद्यांच्याप्रितिसंगमामुळे तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘कऱ्हाड माहात्म्या तीर्थ म्हणून वर्णन केलेल्या या प्रितिसंगमावरील घाटावर कराडची ग्रामदेवता असलेल्या कृष्णामाईचे प्राचीन मंदिर स्थित आहे. येथे वर्षातून दोनदा कृष्णामाईचा यात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. संपूर्ण कराड शहर या उत्सवात सहभागी होत असते

सह्याद्री खंडानुसार मूळचे ब्राह्मणांचे आणि म्हणून आदिस्थान असे गणले गेलेले हे शहर प्राचीन काळी करहटक, करहाटक, करहाटदेश आदी नावांनी ओळखले जाई. .. पूर्व सातवे ते .. पूर्व तिसरे शतक या काळात येथे राष्ट्रिकांचे राज्य होते. या राष्ट्रिकांवरून आपल्या राज्यास महाराष्ट्र असे नाव पडल्याचे म्हटले जाते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार यांच्यापासून यादव, बहामनी, आदिलशाही, मराठे, ब्रिटिश अशा विविध सत्ताचा काळ या शहराने पाहिला. शिलाहार नृपतींची राजधानी कोल्हापूरला असली तरी ते स्वतःलाकरहाटाधिपतीअसे म्हणवून घेत असत. या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले ते प्रितिसंगमावरून. उत्तरेकडून वाहत येणारी कृष्णा नदी आणि दक्षिणेकडून येणारी कोयना या दोन नद्यांचा संगम होतो ते ठिकाण प्रिती संगम या काव्यमय नावाने ओळखले जाते

आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रितिसंगम हे ठिकाण महत्त्वपूर्ण मानले जाते. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणणारे, राज्याचे पहिले मुख्यमंत्री देशाचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे २५ नोव्हेंबर १९८४ रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर प्रितिसंगम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. ती अंत्यसंस्काराची जागा आणि त्या लगत पूर्वी असलेली स्वामीची बाग मिळून येथे सुंदरसे उद्यान स्मृतीस्थान उभारण्यात आलेले आहे. हिंदू धार्मिक परंपरेनुसार नद्यांच्या संगमस्थानी अनेक मंदिरे उभारण्यात येतात. कृष्णाकोयनेच्या संगमावरही हाटकेश्वर, रत्नेश्वर, काशी विश्वेश्वर, कपिलेश्वर, पावकेश्वर अशी विविध मंदिरे आहेत. कराडचे ग्रामदैवत असलेल्या कृष्णामाईचे मंदिरही याच संगमावरील घाटावर स्थित आहे

या मंदिराबाबत आख्यायिका अशी की चाफळ येथील बाजीपंत करकरे यांनी उत्तर हिंदुस्थानातून देवीची पांढऱ्या पाषाणातील मूर्ती करवून आणली होती. या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांना कोकणात करावयाची होती. परंतु एक दिवशी त्यांच्या पत्नीला स्वप्नदृष्टान्त झाला. देवीने तिला सांगितले कीही मूर्ती कराड येथील अंताजी बहिरव यांच्या स्वाधीन करावी तिची कृष्णेकाठी स्थापन करावी.’ त्यानुसार त्यांनी कराडमध्ये कृष्णेकाठी एका छोट्या देवळात देवीची स्थापना केली तिची व्यवस्था अंताजी बहिरव आवटे यांच्याकडे सोपवली. औंध संस्थानचे प्रजाहीतदक्ष राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या पत्नी राजसबाई या विटे येथे राहात असताना त्यांच्याकडे कामास एक गुजराती ब्राह्मण होता. तो निपुत्रिक वारल्यानंतर त्याच्या सुमारे तीन हजार रूपयांच्या बेवारसी मालमत्तेचा विनियोग करून, कृष्णामाईच्या मूळ झोपडीवजा देवळाच्या जागी सध्या अस्तित्वात असलेले मोठे दगडी मंदिर बांधण्यात आले

महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर (१८५६१८९५) हे मूळचे कराडनजीकच्या टेंभ या खेड्यातील. . मा. गर्गे लिखित नॅशनल बुक ट्रस्टप्रकाशित आगरकर चरित्रानुसार, आगरकरांच्या मातोश्री ठकूबाई ऊर्फ सरस्वतीबाई यांचे माहेर कराड हे होते. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यावेळच्या पद्धतीनुसार त्यांनी पोथ्यापुराणे वाचलेली होती. त्यांनी स्वतः काही गाणी रचली होती. त्यातील एका गाण्यात त्यांनी कृष्णामाईच्या मूर्तीचे वर्णन केले आहे. त्यानुसार, देवीचा चेहरा हसतमुख आहे. ती दशभुजा आहे तिच्या दंडांत वाक्या आहेत. एका हातात त्रिशुल धरलेले आहे. तिने दैत्याचे मर्दन केलेले आहे. देवीच्या कमरेस कमरपट्टा, कानात बुगड्या, गळ्यात मंगळसूत्र ठुशी, पायामध्ये साखळ्या, अंगावर जरतारी साडी बुट्ट्यांची चोळी आहे. मुळात या मंदिरातील देवी ही महिषासूरमर्दिनी आहे. देवीच्या मूर्तीची मान तिरकी आहे ती कृष्णा नदीकडे पाहात आहे. त्यामुळे तिला कृष्णामाई असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे.

देवीच्या येथील जुन्या दगडी मंदिरास आता आधुनिक साज चढवण्यात आला आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. समोरून किल्ल्याचे प्रवेशद्वार भासावे अशी या मंदिराची रचना आहे. जमिनीपासून काहीसे उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. येथील सभामंडप बंदिस्त स्वरुपाचा आहे. सभामंडपात अंतराळाकडील बाजुस दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहात एका वज्रपिठावर कृष्णामाईची शुभ्र संगमरवरी दशभुज मूर्ती आहे. या मंदिरात अभिषेक, महापूजा, भजनकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने आयोजित केले जातात.

कृष्णामाईची यात्रा येथे श्रावणातील शेवटच्या सोमवारी चैत्र महिन्यात अशी वर्षातून दोनदा भरते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी पंचक्रोशीतील सर्व देवदेवतांच्या पालख्या कृष्णामाईच्या भेटीस येतात. यामध्ये संगमेश्वर मंदिर, रत्नेश्वर, भैरोबा, नवग्रह, कमळेश्वर, संतसंखू, गरुडमामा राधाकृष्ण मंदिर, उत्तरा लक्ष्मी, भैरवनाथ हाटकेश्वर या मंदिरांचा समावेश आहे. या दिवशी असंख्य भाविक कृष्णेत स्नान करून देवीचे दर्शन घेतात. तसेच अनेक सुवासिनी कृष्णामाईची खणानारळाने ओटी भरतात.

दुसरी यात्रा चैत्र वद्य प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत भरते. चार दिवस चालणारा हा कृष्णामाईचा उत्सव येथील सुप्रसिद्ध लोकप्रिय असा उत्सव आहे. पूर्वी औंधच्या पंतप्रतिनिधी संस्थानातर्फे हा उत्सव आयोजित करण्यात येत असे. पुढे १८११च्या सुमारास ग्रामस्थांनी वर्गणी काढून हा उत्सव भरवण्यास सुरूवात केली. या यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी, चैत्र शुक्ल पौर्णिमेस उत्सवमूर्ती कृष्णाईच्या पुजाऱ्यांच्या घरून घाटावर मिरवत आणली जाते. उत्सवात मंगळवारी किंवा शुक्रवारी कृष्णामाईचे हळदीकुंकू झाल्यानंतर कराडातील घरोघरी चैत्र गौरीचे हळदीकुंकू करतात. शेवटच्या दिवशी छबिना निघून पुजाऱ्याच्या घरी उत्सवमूर्ती नेण्यात येते. या उत्सवकाळात येथे महाप्रसादही आयोजित केला जातो. १९५७पासून या उत्सवास अधिक व्यापक स्वरूप आलेले आहे. याच बरोबर येथे कार्तिक पौर्णिमेस दीपोत्सव केला जातो. त्यास घाट पाजळणे असे म्हणतात. रात्री वाळवंटात शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते.

उपयुक्त माहिती

  • कराड बस स्थानकापासून किमी
  • तर साताऱ्यापासून ५२ किमी अंतरावर
  • कराड येथून खासगी वाहनांची सुविधा
  • राज्यातील अनेक शहरांतून कराडसाठी थेट एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home