रामटेक तालुक्यातील नगरधन येथे असलेले प्राचीन कोटेश्वर महादेवाचे मंदिर येथील वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंगामुळे प्रसिद्ध आहे. येथील शिवलिंग दुभंगलेल्या अवस्थेत असून अशा प्रकारचे ते राज्यातील एकमेव शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. हे स्थान नंदिवर्धन क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. द्वारका, नंदिवर्धन आणि मेखला या तीर्थक्षेत्रांवर वास केल्यावर एकसारखे पुण्य मिळते, असा उल्लेख सिंधुरागिरी पुराणात आढळतो.
कोटेश्वर महादेव मंदिर १२ व्या ते १३ व्या शतकातील असून हेमाडपंती शैलीशी साधर्म्य दाखविणारी याची रचना आहे. वाकाटकांची राजधानी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध होते. त्यानंतर शैल राजवंशाचे हे राजधानीचे शहर होते. यादव काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा. या मंदिरात शिवपिंडीसह अनेक प्राचीन मूर्ती आहेत. त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तींचाही समावेश आहे. असे सांगितले जाते की नगरधन परिसर व येथील भूमीत अनेक मूर्ती दडलेल्या आहेत. एका मोठ्या तलावाशेजारी हे देवस्थान स्थित आहे.
कोटेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की या गावातील एक गौळण महादेवांची निस्सीम भक्त होती. घरातून दूध घेऊन बाजारात विक्रीसाठी जाण्यापूर्वी ती या मंदिरात येऊन महादेवांची पूजा– अर्चा करून मगच पुढे बाजाराच्या गावी जात असे. तुलनेने इतरांपेक्षा तिच्या दुधाला जास्त भाव मिळत असे; परंतु यामुळे तिच्या पतीला संशय येऊ लागला. दररोज ही वेळेआधी घरातून बाहेर पडते आणि तुलनेने हिची कमाईही चांगली होते, यावरून त्याच्या मनात तिच्या चारित्र्याबद्दल वाईट विचार येऊ लागले. संशयाने तो वेडापिसा झाला व त्याने तिचा पाठलाग करण्याचे ठरविले. नेहमीप्रमाणे ती गौळण दुधाचे मडके घेऊन घरातून निघाली. तिचा पती तिच्या मागे होताच. घरातून निघून ती थेट महादेवाच्या मंदिरात शिरली. तिच्या पतीला वाटले की तिचा प्रियकर या मंदिरात लपून बसत असेल आणि त्याला भेटायला ती मंदिरात जात असेल. त्यामुळे रागाने लालबुंद होऊन तो मंदिरात शिरणार इतक्यात त्या गौळणीचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याच्या हातात भाला होता. तो त्या गौळणीच्या दिशेने येत असतानाच गौळणीने महादेवांचा धावा केला की आता माझे काही खरे नाही. मला या संकटातून वाचवा. त्याचक्षणी गाभाऱ्यात असलेली शिवपिंडी दुभंगली व त्यात त्या गौळणीने उडी घेतली. हा प्रकार तिच्या
पतीने पाहिल्यावर तो अजून क्रोधित झाला व दुभंगलेली शिवपिंडी पूर्ण सांधण्याआधीच त्याने लिंगावर भाल्याने जोरदार प्रहार केला. ती खूण आजही शिवपिंडीवर दिसते.
कोटेश्वर मंदिराला तटबंदी आहे. तटबंदीच्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश होतो. संपूर्ण मंदिर परिसराला फरसबंदी आहे. मुख्य मंदिरासमोर स्वतंत्र नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. नंदीमंडप एका चौथऱ्यावर आहे व त्यात तीन नंदी आहेत. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर डावीकडे प्राचीन गणेशमूर्ती आहे. सभामंडपात भव्य असे दगडी खांब आहेत, त्यामध्ये दोन गणेशमूर्ती आहेत. अंतराळातही गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गणेशमूर्ती व ललाटबिंबावरही लहानशी गणेशमूर्ती आहे. यापैकी अंतराळातील उजव्या बाजूची गणेशमूर्ती ही द्विभुज आहे. द्विभुज गणेशाच्या महाराष्ट्रात सापडणाऱ्या मूर्ती या अतिप्राचिन समजल्या जातात. या मूर्ती येथे असणे व या मंदिराची रचना यावरून हे स्थान अतिप्राचीन असल्याचे सिद्ध होते. गर्भगृहातील शिवपिंडी ही संपूर्ण दगडातील आहे. ती नीट निरखून पाहिल्यास दुभंगलेल्या अवस्थेत दिसते.
येथील द्विभुज गणेशाची मूर्ती साधारणतः तीन फूट उंच आहे. उजवा पाय पुढे व मुडपलेला व डावा पाय मांडी घातलेल्या अवस्थेत आहे. याशिवाय मंदिर परिसरात कडुनिंबाच्या झाडाखाली असलेल्या एका लहानशा मंदिरात असलेली गणेशमूर्तीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील गणेशाची मूर्ती मंदिराच्या मध्यभागी नसून ती उजवीकडील भिंतीकडे स्थापित असल्याचे दिसते. येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शेतकरी आपल्या शेतात पिकलेले धान्य प्रथम या गणेशाला वाहतात. त्यामुळे पुढील वर्षी आणखी बरकत होते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. श्रावणी सोमवारी येथे हजारो भाविकांची गर्दी होत असून महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते. भाविकांच्या सोयीसाठी येथे देवस्थान ट्रस्टतर्फे अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत.