कोळेश्वर मंदिर

रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील नलगंगा आणि जलगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले रोहिणखेड हे गाव ऐतिहासिक तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे बाराशे वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती कोळेश्वर महादेव मंदिर होय. हे मंदिर त्याच्या भव्य शिवलिंगासाठी ओळखले जाते. कारंजाच्या लुटीनंतर परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे मुक्काम केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.

रोहिणखेडचा इतिहास हा ८ व्या ते ९ व्या शतकापासून सुरू होत असल्याचे पुरातत्त्वीय पुराव्यावरून स्पष्ट होते. हे गाव अजिंठा डोंगररांगांच्या पश्चिम दिशेला आणि नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या दोन नद्यांनी गावाला नैसर्गिकरीत्या तीन बाजूंनी वेढले आहे. मध्ययुगीन इस्लामी राजवटींच्या उदयापूर्वीच येथे एक समृद्ध हिंदू संस्कृती नांदत होती. शेतात आणि घरांच्या बांधकामादरम्यान सापडलेली मातीची भांडी, प्राचीन शिल्पे आणि मंदिराच्या पायाचे अवशेष या क्षेत्राच्या पुरातनतेची साक्ष देतात. मध्ययुगीन काळात, विशेषतः निजामशाहीच्या कालखंडात, या गावाला रोहिणाबाद किंवा रौनकाबाद या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या काळी हे एक राजधानीचे शहर म्हणून नावारूपास आले होते. व्यापारी दृष्टिकोनातून हे शहर इतके समृद्ध होते की त्याची तुलना त्यावेळच्या मोठ्या व्यापारी केंद्रांशी केली जात असे. निजामशाहीतील राजकीय उलथापालथींमुळे या गावाला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले, ज्याचा पुरावा आजही तेथे असलेल्या वेशी आणि बुरुजांच्या रूपाने पाहायला मिळतो. या गावाला एकूण १२ प्रवेशद्वारे (वेशी) होत्या आणि प्रत्येक वेशीच्या रक्षणासाठी एका मारुती मंदिराची स्थापना करण्यात आली होती. ही ‘१२ वेशी आणि १२ मारुतीं’ची संकल्पना गावाच्या चतुःसीमा सुरक्षित ठेवण्यासाठी केली गेली होती. यांपैकी काही वेशींचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत.

रोहिणखेड हे गाव येथील ऐतिहासिक जामा मशिदीसाठीदेखील ओळखले जाते. ही मशीद १५८२ मध्ये खुदावंद खान महादवी याने बांधली होती. या मशिदीचे मोठे आकर्षण म्हणजे येथील ‘जादुई भिंती’ होय. मशिदीच्या भिंतीवर पर्शियन आणि अरबी भाषेत कुराणातील आयती कोरलेल्या आहेत. असे सांगितले जाते की जेव्हा या भिंतीवर ओला कपडा फिरवला जातो, तेव्हा त्यावरील अक्षरे लाल आणि काळ्या रंगात स्पष्टपणे दिसू लागतात आणि भिंत सुकल्यावर ती पुन्हा अदृश्य होतात. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली असलेली ही मशीद एक राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक मानली जाते.
आध्यात्मिक केंद्र असलेले रोहिणखेड हे गाव दोन मोठ्या ऐतिहासिक युद्धांचे साक्षीदारही राहिलेले आहे. या लढायांनी रोहिणखेडचे नाव इतिहासात अजरामर केले. त्यापैकी पहिली लढाई इ.स. १४३७ मध्ये झाली होती. त्यावेळी खानदेशचा सुलतान नझीर खान याने बेरार प्रांतावर आक्रमण केले. त्याचे कारण म्हणजे त्याची मुलगी, जी बहमनी सुलतान अलाउद्दीन शाह याला दिली होती, तिला मिळालेली वागणूक. या युद्धाचा मुख्य संघर्ष रोहिणखेड येथे झाला. दौलताबादचा गव्हर्नर खलफ हसन बसरी याने नझीर खानच्या सैन्याचा दारूण पराभव केला. नझीर खानला त्याच्या राजधानीपर्यंत (बुऱ्हाणपूर) हुसकावून लावण्यात आले होते. दुसरी लढाई इ.स. १५९१ मध्ये झाली. त्या काळात अहमदनगरच्या निजामशाहीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला होता. बुऱ्हाण निजाम शाह (मुर्तझा निजाम शाहचा भाऊ) याने सम्राट अकबराच्या आश्रयाखाली बेरारवर स्वारी केली. त्याच्या विरोधात जमाल खान हा सेनापती होता. रोहिणखेडच्या मैदानावर या दोन्ही सैन्यात भीषण युद्ध झाले. यात जमाल खान मारला गेला आणि बुऱ्हाण निजाम शाहचा विजय झाला.

येथील कोळेश्वर मंदिराच्या उभारणीबाबत अनेक मतमतांतरे आढळतात. देवगिरीच्या यादवांच्या काळात हे मंदिर बांधण्यात आल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर काहींच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट राजांच्या सत्ताकाळात उभारले गेले असावे. राष्ट्रकूट राजवंशाने उभारलेल्या या मंदिराला पूर्वी कोटेश्वर महादेव मंदिर असे नाव होते, पण कालांतराने ते कोळेश्वर महादेव असे रूढ झाल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी उत्खनन व संशोधनार्थ येथे आलेल्या काही जैन संशोधकांना मंदिराबाहेरील ओट्यावर संस्कृतमध्ये शिलालेख आढळला. त्यावरून हे मंदिर राष्ट्रकूट राजवंशाच्या काळातील असावे, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता.

मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मंदिरासमोर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेले छोटे प्रांगण आहे. त्यात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. या प्रांगणात काही प्राचीन मूर्ती आहेत. या मंदिराभोवती एखाद्या किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. या तटबंदीजवळ उजवीकडे शिवशंकरांची मोठी मूर्ती आहे आणि डावीकडे दीपस्तंभ आहे. तटबंदीत असलेल्या लहान प्रवेशद्वाराजवळ तुळशीवृंदावन आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या आतील प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात तटभिंतीजवळ एका चौथऱ्यावर लहान शिवलिंग व त्रिशूळ आहे. या प्रांगणात उजवीकडे ओवऱ्यांची रचना केलेली आहे व मध्यभागी होमकुंड आहे.

सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात दोन नक्षीदार स्तंभांच्या मध्यभागी व गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या देवकोष्टकांमध्ये डावीकडे शंकर-पार्वतीची प्राचीन मूर्ती व उजवीकडील देवकोष्टकात गणेशाची मोठी पाषाणमूर्ती आहे. या गणेशमूर्तीच्या समोर सभामंडपात हातात मोदक असलेल्या मूषकाची मूर्ती आहे. सभामंडपातून चार पायऱ्या उतरून खालच्या बाजूला असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहात मध्यभागी एका भल्या मोठ्या शाळुंकेमधील शिवलिंगावर शिवशंकरांचा पंचमुखी मुकुट ठेवण्यात आला आहे. हे शिवलिंग जिल्ह्यातील सर्वात मोठे व स्वयंभू असल्याचे मानले जाते. या शिवलिंगावरील पंचधातूच्या मुकुटाचे वजन सुमारे चाळीस किलो आहे. या मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर बाहेरून दिसत नाही, परंतु गर्भगृहातून दगडी चिऱ्यांमध्ये बांधलेल्या शिखराचा अंतर्भाग दिसतो.

येथील जागृत शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. महाशिवरात्र हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. त्यानिमित्त येथे अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. चैत्र शुद्ध द्वादशीला या मंदिरातील शिवशंकराच्या मुकुटाची गावातून रथातून मिरवणूक काढण्यात येते. त्या मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी होतात. श्रावण महिन्यातही येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  • मोताळा येथून १५ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून २५ किमी अंतरावर
  • मोताळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापासून काही अंतरावर नदीपर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
  • संपर्क : गोपाल आप्पा तोतरे, अध्यक्ष,
  • मो. ९५५२८८६१६६, संजय स्वामी, पुजारी, मो. ९८२२२५७९२५

कोलेश्वर मंदिर

रोहिनखेड, ताल. मोटाला, जिला. बुलढाणा

Back To Home