बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात, सातपुडा पर्वतरांगांच्या निसर्गरम्य परिसरात व मास नदीच्या तीरावर किन्ही महादेव हे गाव वसलेले आहे. विदर्भाच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक परंपरेतील ते महत्त्वाचे केंद्र समजले जाते. या गावात तेराव्या शतकापासून दिमाखात उभे असलेले किन्ही महादेव मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वयंभू शिवलिंग होय. या शिवलिंगाच्या शाळुंकेतील पोकळीत भीषण दुष्काळातही बाराही महिने पाणी साठलेले असते. चैत्र शुद्ध द्वादशीला भरणारी येथील मोठी जत्रा, ‘शिखरकाठी’ उत्सव आणि चैत्र अष्टमीला होणारा ‘शिव-पार्वती विवाह सोहळा’ हे उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
विदर्भ ही शैव आणि शाक्त संप्रदायाची भूमी मानली जाते. प्राचीन काळापासून म्हणजे अगदी वाकाटक आणि सातवाहन काळापासून या भागात शिवाची उपासना प्रचलित आहे. राष्ट्रकूट आणि त्यानंतर आलेल्या यादव काळात या उपासनेला राजाश्रय मिळाला आणि भव्य मंदिरांची निर्मिती झाली.
१२व्या आणि १३व्या शतकात देवगिरीच्या यादवांचे राज्य या भागावर होते. हा काळ महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्याचा सुवर्णकाळ मानला जातो. किन्हीचे मंदिर हे यादवांच्या काळातील किंवा त्यांच्या प्रभावाखालील स्थानिक सरदारांनी बांधलेले असावे, अशी दाट शक्यता आहे. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की गाभाऱ्यातील शिवलिंगापासून ५० फूट अंतरावर असलेल्या तटबंदीतील छिद्रातून वर्षातील काही दिवस येथील शिवपिंडीवर सकाळची सूर्यकिरणे पडतात.
या मंदिराची आख्यायिका अशी की सध्या जिथे मंदिर आहे, तेथे पूर्वी घनदाट जंगल होते. या जंगलात गावातील गुराखी आपल्या गायी चरण्यासाठी घेऊन येत असत. त्यातील एक गाय रोज एका ठराविक वेळी एका वारुळाजवळ उभी राहत असे आणि तिच्या कासेतून आपोआप दुधाचा अभिषेक त्या जागेवर होत असे. हे दृश्य पाहून गुराख्याने आणि गावकऱ्यांनी कुतूहलाने ती जागा खणून पाहण्याचे ठरवले. खोदकाम करत असताना, अचानक एका कुदळीचा वार जमिनीतील एका दगडाला लागला. त्याचबरोबर त्या दगडातून रक्ताची धार वाहू उडाली. हे पाहून सर्वजण भयभीत झाले. त्या रात्री त्या गावातील प्रमुखाच्या स्वप्नात भगवान शंकराने दृष्टांत दिला आणि सांगितले की मी येथे स्वयंभू रूपात विराजमान आहे.
येथे माझे मंदिर बांधा. त्याप्रमाणे गावकऱ्यांनी तिथे पूजा सुरू केली आणि मंदिराची उभारणी झाली. आजही त्या शिवलिंगावर घाव लागल्याची खूण आहे. श्रावण महिन्यात मंदिराच्या गाभाऱ्यात जिवंत नाग येतो आणि येथील शिवलिंगाला विळखा घालून बसतो, पण कोणालाही दंश करत नाही, अशीही येथे वदंता आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका हा ऐतिहासिकदृष्ट्या कापूस आणि चांदीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. या भागात ‘किन्ही’ नावाने सुरू होणारी किन्ही सवडत, किन्ही राजा, किन्ही नाईक अशी गावे आहेत. येथील महादेवाच्या मंदिरामुळे या गावाला ‘किन्ही महादेव’ असे नाव पडले. हे गाव वसण्यापूर्वीपासून येथील स्वयंभू शिवलिंग अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. तीन एकरांच्या प्रशस्त परिसरात असलेल्या या मंदिराच्या चारही बाजूंनी सुमारे २० ते २५ फूट उंचीची भक्कम दगडी तटबंदी आहे. या तटबंदीत चार बुरुज आहेत. ही तटबंदी आणि बुरुजांचे बांधकाम सोळाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. येथील तटबंदीला दोन दुमजली प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी वरच्या बाजूस महादेवाची मूर्ती आहे. तटबंदीच्या वरच्या भागात जाण्यासाठी या प्रवेशद्वाराजवळून जिने आहेत.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मध्यभागी किन्ही महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोरील भागात एक लहानशी विहीर व शेजारी वर निमुळता होत जाणारा दीपस्तंभ आहे. त्यापुढे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील भिंतींवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन चौथरे व भिंतींत दीपकोष्ठके आहेत. यापैकी डावीकडील चौथरा हा गजानन महाराजांचे बसण्याचे ठिकाण होते, असे सांगितले जाते. ‘श्री गजानन विजय’ ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे महाराज स्वतः शिवभक्त होते आणि ते परिसरातील अनेक प्राचीन शिवमंदिरांच्या शांत परिसरात ध्यानस्थ बसत असत. किन्ही येथील महादेव मंदिर तेराव्या शतकातील असल्यामुळे आणि त्याचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने, या परिसरात महाराज अनेकदा येत असत, असे सांगितले जाते.
सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटपट्टीवर गणेशाचे शिल्प आहे. दुमजली सभामंडपात लाकडी स्तंभ आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडील देवकोष्ठकात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. सभामंडपापेक्षा येथील गर्भगृह खोलगट जागेत असल्यामुळे पाच पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर स्वयंभू शिवलिंग आहे. स्वयंभू लिंग हे सर्वांत पवित्र मानले जाते, कारण ते निसर्गतः उत्पन्न झालेले असते व अनादी काळापासून ते अस्तित्वात असते. येथील स्वयंभू शिवलिंग रुजी पाषाणाचे म्हणजे भूमीत एकजीव व्हावे, अशा पद्धतीने रुजलेल्या पाषाणाचे आहे. हे स्वयंभू शिवलिंग जागृत आहे आणि त्याच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या शिवलिंगाला नक्षीदार पितळी पत्र्याने मढविलेले आहे. येथील शाळुंकेमध्ये असलेल्या पोकळीत बाराही महिने पाणी असते. येथील सभामंडपावर पत्र्याचे छत व गर्भगृहावर तीन थरांचे वर निमुळते होत जाणारे शिखर आहे. या शिखरावरील देवकोष्ठकांत विविध संत व देवतांच्या मूर्ती आहेत. शीर्षभागी कमलपुष्पासारख्या रचनेत आमलक व कळस आहे. या मंदिराच्या दक्षिणेला बलिश्वराचे मंदिर आहे. परकोटामधील ओवऱ्यांमध्ये गणेश, जगदंबामाता तसेच राम-लक्ष्मण-सीता यांची मंदिरे आहेत.
येथे महाशिवरात्रीसह विविध सण-उत्सव साजरे केले जातात. चैत्र शुद्ध द्वादशीला येथे मोठी यात्रा भरते. अनेक भाविक आदल्या दिवसापासूनच येथे येतात.
दुपारी मंदिर परिसरातून शिवशंकरांची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. सायंकाळी बलिश्वर आणि किन्ही महादेवाच्या शिखरावर पगडी ठेवण्यात आल्यानंतर भाविक डफांच्या नादात २० ते २५ फूट उंचीच्या शिखरकाठ्या हातात घेऊन नाचवितात. चैत्र शुद्ध अष्टमीला मंदिरात ‘शिव-पार्वती विवाह सोहळा’ पार पडतो.
नजीकच असलेल्या लातुर्डा येथून पार्वतीमातेची वरात या मंदिरात येते. रात्री बारा वाजता विवाह सोहळा होतो. तत्पूर्वी शिवलिंगावर अभिषेक करून हळद लावली जाते. त्यानंतर लिंगावर शिवमुखवटा चढवला जातो.
त्यावर टोपी ठेवण्यात येते. त्यानंतर वधू-वरांच्या मध्ये आंतरपाट धरून मंगलाष्टकांच्या उच्चारणात विवाह सोहळा पार पडतो. या वेळी शिवशंकरांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो.
विदर्भात ‘पोळा’ हा सण बैलांच्या पूजेचा सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो. किन्हीमध्ये पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून या मंदिरात दर्शनासाठी आणले जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर तोरण तोडण्याचा कार्यक्रम होतो.