ठाणे जिल्ह्यातील खिडकाळी येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिर हे जिल्ह्यातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. येथून काही अंतरावर असलेल्या अंबरनाथ येथील शिवमंदिराशी साधर्म्य सांगणारे, काळ्या पाषाणात उभारलेले हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचा सुंदर नमुना आहे. प्रत्यक्ष महादेवांनी येथे प्रकट होऊन पांडवांना दर्शन दिले होते व त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पांडवांनी हे मंदिर उभारले होते, अशी मान्यता आहे. येथील वैशिष्ट्य असे की दरवर्षी महाशिवरात्रीला खिडकाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी काशी, अयोध्या तसेच उत्तराखंड येथून शेकडो साधू येथे येतात.
मंदिराबाबतची आख्यायिका अशी की वनवास काळात दंडकारण्यात असताना पांडवांना येथे स्वयंभू शिवलिंग आढळले होते. त्यावेळी युधिष्ठिरासह पाचही बंधूंनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी एकत्रित पूजा करण्यास सुरुवात केली. पांडवांची निस्सीम भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी पांडवांची भक्ती व त्यांच्यातील बंधुभाव पाहण्यासाठी परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार महादेवांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते पांडवांसमोर आले. ब्राह्मणाला पाहताच युधिष्ठिराने त्यांना नमन करून ‘आपली काय सेवा करू,’ अशी विचारणा केली. त्यावर त्या ब्राह्मणाने सूर्यास्तापूर्वी आपल्यासाठी पाच फुले आणण्यास सांगितले; परंतु येथे पाचही भावंडांची पूजा सुरू होती. फुले शोधण्यासाठी गेल्यास ही पूजा खंडित होईल म्हणून युधिष्ठिराने सहदेवाला पूजा सुरू ठेवण्यास सांगितले व इतर चार बंधू फुले शोधण्यासाठी निघाले.
वरवर पाहता फुले आणण्याचे काम सोपे वाटत होते. मात्र बराच वेळ शोध घेऊनही त्यांना फुले सापडली नाहीत. सूर्य मावळतीला आल्याने आता फुले मिळण्याची शक्यता नाही, असे वाटत असतानाच अर्जुनाला एका तलावात उमललेली कमलपुष्पे दिसली. तो ही फुले तोडत असताना डोंगरावरून एक मोठी शिळा त्याच्या दिशेने येत असल्याचे भिमाने पाहिले. त्याने आपल्या शक्तीने ती शिळा थोपवून धरली, त्यामुळे अर्जुनाचे प्राण वाचले. त्याच वेळी पाण्यात असलेल्या अर्जुनाकडून फुले घेऊन नकुल चपळाईने सूर्यास्त होण्याआधी ब्राह्मणाकडे गेला व ती फुले त्याला सुपूर्द केली. यावेळी सहदेवाकडून मंत्रजप सुरूच होता. अशा प्रकारे महादेवाची पूजा खंडित न करताही आलेल्या ब्राह्मणाची पांडवांकडून सेवा झाली होती. त्यामुळे प्रसन्न होऊन महादेवांनी आपल्या मूळ रूपात पांडवांना दर्शन दिले व आगामी काळात कौरवांशी होणाऱ्या युद्धात तुमचा विजय होईल, असा आशीर्वादही दिला. प्रत्यक्ष महादेव या जागेवर प्रकट झाल्यामुळे पांडवांनी येथे महादेवाचे मंदिर उभारले. सतराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे.
कल्याण–शिळ मार्गावर खिडकाळी गावच्या तलावाकाठी हे मंदिर आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीतून मंदिरापर्यंत जाताना वड, पिंपळ, उंबर, चिंच यांसारखे प्राचीन वृक्ष दिसतात. या झाडांखालीच हार, फुले, बेल, नारळ तसेच प्रसादाची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. काही पावले चालल्यावर मंदिरालगत असलेल्या वटवृक्षाच्या पारावर गणेश, शंकर–पार्वती, स्वामी समर्थ, तसेच दुर्गादेवीच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात. मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याच्या शेड उभारण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या दोन्ही बाजूंना बाह्य भागावर सिंहांची शिल्पे आहेत. मंदिराच्या भिंती, खांब, प्रवेशद्वार, खिडकी, कोनाडे यांवर सुंदर कलाकुसर केलेली दिसते.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात अंतराळाच्या समोर एका आयताकृती चौथऱ्यावर नंदीची अखंड काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. देवदेवतांच्या अनेक शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. नंदीच्या समोरील डाव्या बाजूच्या कोनाड्यात गणपती व उजव्या बाजुला शीतला देवी यांच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर दगडांमध्ये कोरलेले नक्षीकाम आहे. त्यात खालच्या बाजुला चवऱ्या ढाळणाऱ्या स्त्रिया व ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. येथील गर्भगृह अंतराळापासून थोडे खाली असल्यामुळे पायऱ्या उतरून आत जावे लागते. येथील स्वयंभू शिवपिंडी चांदीच्या पत्र्याने मढविलेली असून त्यावर चांदीच्या पाच फण्यांच्या नागाने छत्र धरलेले आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूस पार्वतीची मूर्ती आहे.
या परिसरात अनेक साधूंच्या समाध्या आहेत. मंदिराच्या शेजारीच स्वामी शिवानंद महाराजांचे समाधी मंदिर आहे. या समाधीच्या मागे दत्तमूर्ती आहे. १९३४ साली स्वामी शिवानंद महाराजांनी येथे जिवंत समाधी घेतली होती. खिडकाळेश्वर मंदिरासमोर मोठा यज्ञमंडप व सभामंडप आहे. तेथे दररोज अनेक धार्मिक विधी पार पडत असतात. (संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२१६६९२२१, ८६९२८०७५०८). दररोज सकाळी ५.४५ ते ६.१५ या वेळेत आरती, दुपारी १२.३० ते १२.४५ या वेळेत नैवेद्य व सायंकाळी ६.४५ ते ७.१५ या वेळेत आरती होते. प्रत्येक सोमवारी खिडकाळेश्वराच्या दर्शनासाठी येथे भाविकांची गर्दी असते. श्रावणी सोमवारी या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी काशी, अयोध्या तसेच उत्तराखंड येथून अनेक साधू येथे दर्शनासाठी येतात. ठाणे, कल्याण व डोंबिवली येथून यावेळी एसटी व शहर परिवहनतर्फे भाविकांसाठी प्रत्येक पाच ते दहा मिनिटांनी विशेष बस सोडल्या जातात. २०२३ साली या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे पाच कोटींचा निधी देण्यात आला होता.
मंदिरासमोर असलेल्या खिडकाळी तलावाचे क्षेत्रफळ सुमारे सव्वाचार एकर आहे. ठाणे जिल्ह्यातील प्राचीन तलावांच्या यादीत या तलावाचाही समावेश आहे. उन्हाळ्यात यातील पाण्याची पातळीत काहीशी कमी होते. मात्र तो कधीही आटत नाही. तलावाच्या चहूबाजूंनी पायऱ्या असल्याने आत पाण्यापर्यंत जाता येते. तलावाभोवती फिरण्यासाठी पदपथ व तलावापलिकडे जाण्यासाठी मंदिरासमोरून एक पूल बांधण्यात आलेला आहे. तलावाच्या पलिकडच्या भागात विविध प्रकारच्या धार्मिक विधी तसेच दशक्रिया विधी होतात. या मंदिराच्या परिसरात ज्ञानेश्वर महाराज मुंढे यांनी उभारलेली संत सावळाराम गोशाळा आहे.