ठाणे जिल्ह्यातील ‘प्रति जेजुरी’ अशी ओळख असलेले खंडोबाचे प्रसिद्ध मंदिर शहापूर तालुक्यातील शेलवली येथे आहे. खंडोबाचे प्राचीन स्थान असलेले हे निसर्गसंपन्न गाव ‘खंडोबाची शेलवली’ म्हणूनच ओळखले जाते. या मंदिरात खंडोबाबरोबरच शंकराचे स्वयंभू शिवलिंगही आहे. गावात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सात दरोडेखोरांना मृत्युदंड देणारा येथील खंडोबा जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे नवस करणाऱ्या भाविकांच्या हाता-पायांमध्ये ‘कोड्याबेड्या’ टाकण्याची प्रथा आहे. त्या आपोआप तुटल्यास नवस पूर्ण झाल्याचे समजण्यात येते.
मुंबईची तहान भागवणारा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे. या तालुक्यात तानसा, भातसा आणि वैतरणा ही प्रमुख धरणे आहेत. पूर्वी शहापूर तालुका कोळवण या नावाने ओळखला जाई. काहींच्या मते शहापूरचे मूळ नाव ‘सिंहपूर’ असे होते. पुढे अपभ्रंश होऊन ते ‘शहापूर’ झाले. निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या या तालुक्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वामुळे विशेष स्थान प्राप्त झाले आहे. तालुक्यातील शेलवली येथे टेकडीवर असलेल्या या मंदिरापर्यंत येण्यासाठी जेजुरीप्रमाणेच पायऱ्या करण्यात आल्या आहेत. काही पायऱ्या चढल्यावर एके ठिकाणी सात पायऱ्या असलेले स्थान दिसते.
या स्थानाबाबत अशी आख्यायिका आहे, की पूर्वी या गावात अनेक दरोडे पडत. दरोडा घालण्यापूर्वी दरोडेखोर खंडोबाला कौल लावत. देवाने कौल दिला तरच गावात दरोडा घालत असत. एके दिवशी सात दरोडेखोरांनी देवाकडे कौल मागितला. मात्र, देवाने कौल न दिल्याने त्यांनी रागाच्या भरात आपल्याजवळील शस्त्रांनी मंदिरातील योगिनी व अन्नपूर्णा देवीच्या मूर्तींचे हात-पाय तोडले. त्यानंतर परत जात असताना खंडोबाने मंदिराजवळील मोहाच्या झाडाखाली त्यांना गाठून ठार मारले आणि त्या प्रत्येकाच्या शरीरावर पाय ठेवून ते वर मंदिरात गेले. त्याचे प्रतीक म्हणून या सात पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.
पायऱ्या संपताच मंदिराच्या दुमजली वास्तूवरील शिखर नजरेस पडते. पहिल्या मजल्यावर हे मंदिर आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. इ.स. १८६४ पासून येथे शंकराची स्वयंभू पिंडी आहे. गावातील पाच एकर जागा खंडोबाच्या नावावर आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात भर टाकून ग्रामस्थ येथील उत्सव साजरे करतात. पूर्वी हे मंदिर कौलारू होते. या मंदिराचे कालौघात अनेक जीर्णोद्धार झाले. अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धारानंतर १३ मे २०१३ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करवीर पीठाचे शंकराचार्य श्री स्वामी विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते मंदिरात नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा कळसारोहण सोहळा झाला. जुन्या मूर्ती मंदिराच्या तळमजल्यावर ठेवण्यात आल्या आहेत.
सभामंडपाच्या भिंतींना लोखंडी जाळ्या आहेत. येथून हिरवाईने नटलेल्या परिसराचे विहंगम दर्शन होते. सभामंडपात नंदीची मूर्ती व त्यापुढे कासव आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कलाकुसर आहे. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग व त्यामागील चौथऱ्यावर (डावीकडून) खंडोबा, म्हाळसा, बाणाई, अन्नपूर्णा आणि योगिनी देवीच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर कार्यक्रमांसाठी मोठा सभामंडप आहे. मंदिराच्या भिंतीवर अनेक भाविक नाणी चिटकवून मनोकामना व्यक्त करतात.
येथे माघ पौर्णिमेला मोठी यात्रा असते. या यात्रेसाठी तालुक्यातील हजारो भाविक ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर करत येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. येथे नवस करणाऱ्या व्यक्तींच्या हातात ‘कोड्याबेड्या’ (हातात लाकडी दंड व पायात लोखंडी कडा) घालण्यात येतात. गावातील प्राथमिक शाळेजवळ या कोड्यांची प्रथम विधिवत पूजा करण्यात येते. नंतर नवस बोललेल्या व्यक्तीच्या हाता-पायांमध्ये ‘कोड्याबेड्या’ टाकण्यात येतात. संबंधित भाविकाने चांगल्या भावनेने नवस केला असल्यास सुमारे ५० पावले चालत गेल्यावर पायातील बेड्या आपोआप तुटतात, असे बोलले जाते. बेड्या न तुटल्यास नवस करणाऱ्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाल्याचे समजण्यात येते आणि त्या व्यक्तीला शिक्षा म्हणून शेवटपर्यंत त्याच स्थितीत मंदिरापर्यंत यावे लागते.
येथे चंपाषष्ठीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी ही चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. त्यानिमित्त मंदिर परिसरात तीन दिवस उत्सव होतो. चंपाषष्ठीच्या दिवशी मंदिरात प्रथम आरती होते. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात खंडोबाची पालखी गावात फिरते. ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. पालखी मंदिरात परत आल्यावर पुन्हा आरती होते. रात्री खंडेरायाचा गोंधळ व जागर केला जातो.