खंडोबा देवस्थान

निमगाव, ता. खेड, जि. पुणे

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर वसलेले श्री खंडोबा देवस्थान बहुजन समाजाचे महत्त्वाचे श्रद्धाकेंद्र आहे. महाराष्ट्र शासनाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेले हे क्षेत्र ‘प्रति-जेजुरी’ म्हणून ओळखले जाते. राज्यातील हे एकमेव असे मंदिर आहे, जेथे खंडोबाच्या परंपरेतील ‘मुरळी’ ही प्रथा पूर्णपणे निषिद्ध मानली जाते आणि केवळ वाघ्या हेच देवाची सेवा करतात. या मंदिराचे एक मोठे खगोलशास्त्रीय वैशिष्ट्य म्हणजे १३ ते १७ मार्च या काळात मावळत्या सूर्याची किरणे थेट खंडोबाच्या मूर्तीपर्यंत पोहोचतात. हे दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक निमगावला भेट देतात.

निमगाव खंडोबा मंदिराचा सर्वात जुना ऐतिहासिक उल्लेख मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, शके १३४७ म्हणजेच २६ नोव्हेंबर १४२४ रोजीचा आढळतो. याच दिवशी खंडोबाचे या ठिकाणी प्रगटीकरण झाल्याचे मानले जाते. मध्ययुगीन काळात या क्षेत्राला ‘नाग्ना’ या नावाने ओळखले जात असे. नंतरच्या काळात मराठा साम्राज्यात या मंदिराचा विस्तार झाला. इसवी सन १७०२ मध्ये औरंगजेब बादशहाच्या सैनिकांनी या मंदिरावर आक्रमण केले आणि त्यामध्ये मंदिराचा मूळ मंडप, नंदी आणि कळसाचे मोठे नुकसान झाले. मात्र, गर्भगृहातील मुख्य लिंगाला कोणताही धक्का लागला नाही. पेशवे काळात या मंदिराला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त झाली. पेशव्यांचे अत्यंत विश्वासू दिवाण राहिलेले गंगाधर यशवंत चंद्रचूड यांच्या घराण्याने इसवी सन १७३८ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. यानंतर इसवी सन १७६९ मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी मंदिराभोवती अभेद्य अशा दगडी कोटाचे आणि २४ फूट उंच तटबंदीचे काम पूर्ण केले. या मंदिराचा समावेश महाराष्ट्रातील खंडोबाच्या अकरा मुख्य ठिकाणांमध्ये होतो. आधुनिक काळात ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्र शासनाने मंदिर परिसरातील सुमारे २४ एकर जमीन देवस्थानच्या विकासासाठी वर्ग केली आहे. या ऐतिहासिक क्षेत्राचे जतन करण्यासाठी सरकारतर्फे हे मोठे पाऊल उचलले गेले आहे.

निमगाव येथील खंडोबाच्या प्रगटीकरणाची कथा अशी की एकदा भगवान खंडोबा शांततेच्या शोधात जेजुरी गडावरून निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे प्रधान हेगडी हे सुद्धा होते. निमगावच्या या परिसरातील नैसर्गिक शांतता आणि भीमा नदीचे सौंदर्य पाहून खंडोबाने येथे वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. खंडोबाच्या या वास्तव्यादरम्यान त्यांना आपली पत्नी बाणाईची आठवण झाली आणि त्यांनी तिला आणण्यासाठी प्रधान हेगडी यांना फर्मान सोडले. मात्र हेगडी प्रधानाने बाणाईला आणण्याऐवजी एका मुरळीला बाणाईचे रूप देऊन खंडोबासमोर सादर केले. आपली ही फसवणूक झाल्याचे देवाच्या त्वरित लक्षात आले. या फसवणुकीमुळे खंडोबा अत्यंत कोपित झाले आणि त्यांनी त्या मुरळीला ‘तू पुन्हा येथे यायचे नाहीस’ असा शाप देऊन तिचे पाषाणात रूपांतर केले. आजही मंदिराच्या पायऱ्यांमधील ही आडवी शिळा मुरळीची शिळा म्हणून ओळखली जाते. याच पौराणिक संदर्भामुळे निमगावच्या मंदिरात मुरळी परंपरा पाळली जात नाही. येथे वाघ्या-मुरळीची जोडी नसून केवळ पुरुष भक्त म्हणजेच वाघ्या हेच खंडोबाची भक्ती करतात. खंडोबाचे स्थान क्रमाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रगट झाले असल्याचे मानले जाते. त्यात धामणटेक, कडेपठार आणि निमगाव येथील सध्याचे स्थान यांचा समावेश होतो. वाघ्या परंपरेबाबत असे सांगितले जाते की अपत्यप्राप्तीसाठी किंवा मुलाच्या आरोग्यासाठी नवस बोलल्यानंतर जन्मलेला मुलगा देवाला अर्पण केला जातो. तोच मुलगा पुढे वाघ्या बनून खंडोबाची सेवा करतो आणि जागरण-गोंधळातून लोकसंस्कृतीचे जतन करतो.

पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरूनगरपासून काही अंतरावर असलेल्या निमगाव या गावाच्या उत्तरेला एका छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या उंच तटबंदीमुळे ते एखाद्या किल्ल्यासारखे भासते. या मंदिराला पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशा तीन दिशांनी प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराला ‘दावडी दरवाजा’ या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या देवकोष्टकांमध्ये गणपती आणि हनुमान यांच्या मूर्ती स्थापित आहेत. मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी ओवऱ्यांची रचना आहे. या मंदिराची स्थापत्य शैली ही पेशवेकालीन वास्तुशास्त्राचा एक सुंदर आविष्कार समजला जातो. याचे बांधकाम प्रामुख्याने काळ्या पाषाणात केलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेला नगारखाना आणि त्याखालील कोरीव काम हे मराठा स्थापत्यशैलीतील आहे.

मुख्य मंदिरासमोर तीन उंच दगडी दीपमाळा आहेत. त्यापैकी उत्तरेकडील दीपमाळेवर शिलालेख कोरलेले आहेत. दीपमाळेच्या समोरच काळ्या पाषाणातील नंदीचा मंडप आहे. या मंडपाच्या डाव्या बाजूला दोन उंच दगडांवर १८९१ हा अंक कोरलेल्या पोर्तुगीज बनावटीच्या दोन मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. मंदिराचा सभामंडप अष्टकोनी आणि घुमटाकार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मध्यभागी कोणताही खांब नाही. हा संपूर्ण घुमट आठ कमानींवर आधारलेला आहे. सभामंडपाच्या पुढे गर्भगृह आहे. येथे खंडोबाचे स्वयंभू पंचलिंग एका मोठ्या योनीपात्रात आहे. मुख्य लिंगासोबतच येथे बाणाई, म्हाळसा, भैरव आणि जोगेश्वरी यांच्या धातूच्या सुंदर उत्सव मूर्ती आहेत. मागील भिंतीत खंडोबा-म्हाळसा यांच्या पाषाण मूर्ती आहेत. मंदिराचे शिखर हे उंच आणि कोरीव आहे. त्यावर विविध देवदेवतांची शिल्पे आणि नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात एकूण चार गुप्त भुयारे असल्याचे सांगितले जाते आणि त्यातील एक भुयार पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांच्या वाड्यात जात असल्याची जुनी लोककथा येथे प्रचलित आहे.

निमगाव खंडोबा मंदिरात वर्षभर विविध सण, उत्सव आणि जत्रा मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला देवाचा प्रगटीकरण दिन साजरा होतो आणि त्यानंतर येणाऱ्या चंपाषष्ठीला खंडोबाचे नवरात्र पूर्ण होऊन देवाला हळद लावण्याचा सोहळा पार पडतो. या काळात सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन आणि अन्नदानाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात.

माघ पौर्णिमेला खंडोबाचा विवाह सोहळा आयोजित केला जातो. येथील आकडेवारीनुसार त्यावेळी सुमारे दीड ते दोन लाख भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी देवाची वरात काढली जाते. दसऱ्याच्या दिवशी शिलंगणाचा उत्सव साजरा करण्याची जुनी पद्धत येथे आजही कायम आहे.

या दिवशी खंडोबाच्या हातातील एक तलवार शिलंगणासाठी बाहेर काढली जाते आणि सीमोल्लंघन केले जाते. या सर्व उत्सवांमध्ये ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने आणि भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण परिसर पिवळाधमक होऊन जातो.

उपयुक्त माहिती

  • राजगुरूनगरपासून ८ किमी अंतरावर
  • पुणे शहरापासून ४५ किमी अंतरावर
  • राजगुरूनगरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क : बाबासाहेब भगत, पुजारी, मो. ९९२२०५८२७९
Back To Home