खंडोबा मंदिर

नळदुर्ग, ता. तुळजापुर, जि. धाराशिव

महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून खंडोबा देवाची ओळख आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. काहींच्या मते खंडोबा ही रक्षक देवता आहे. मार्तंड, भैरव, मल्हारी आदी नावानेही तो ओळखला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांत खंडोबाचे अनेक भक्त आहेत. महाराष्ट्रातील आठ प्रमुख खंडोबा मंदिरांत जेजुरी व पाली नंतर नळदुर्ग येथील मंदिराचा समावेश होतो. खंडोबा व बाणाईच्या विवाहाचे स्थान म्हणून या मंदिरास विशेष महत्त्व आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. नळ राजाची राणी दमयंती हिच्या विनंतीवरून खंडोबा येथे आला होता. देवाचे बाणाईसोबत येथेच लग्न झाले होते. हा देवाचा विवाह मंडप असल्याची अख्यायिका सांगितली जाते. येथून जवळच असलेल्या अणदूर येथील ग्रामस्थ व नळदुर्ग येथील ग्रामस्थ यांच्यात देवाच्या मूर्तीवरून वाद झाल्याने मूर्ती या मंदिरांत पावणे दोन महिने व अणदूर येथील मंदिरात सव्वा दहा महिने ठेवण्याचा करार प्राचीन काळी झाला होता. तो अजूनही पाळला जातो.
हे मंदिर प्राचीन असले तरी मूळ मंदिर येथून पाचशे मीटर अंतरावर बोरी नदीच्या काठावर आहे. मुघल राजवटीत त्या मंदिराचे पावित्र्य नष्ट झाल्याने हे नवे मंदिर बांधून तेथील पिंडी व देवाच्या मूर्ती येथे स्थलांतरीत कऱण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या परीसरात आठ ते दहा वेगवेगळ्या कालखंडातील प्राचीन दीपमाळा आहेत. चौथऱ्यावर उभ्या असलेल्या दगडी बांधणीच्या काही दीपमाळांमध्ये दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत.
मंदिराचे प्रांगण उंच चौथऱ्यावर आहे. पाच पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजवीकडे दोन दीपमाळा आहेत. या दीपमाळांच्या मधोमध तुलसी वृंदावन आहे. याच बाजूला प्राचीन दुमजली नगारखाना व त्याच्या तळमजल्यावर मंदिराचे साठवण भांडार आहे. नित्य आरती व उत्सव प्रसंगी नागारा वाजवला जातो. नगारखान्याच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. नगारखान्याच्या दुसऱ्या बाजूला मंडप आहे व येथे गोंधळ आणि इतर विधी केले जातात. या मंडपाच्या बाजूला असलेल्या कक्षांचा भाविकांसाठी निवारा कक्ष म्हणून वापर केला जातो. प्रांगणात मध्यभागी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती व त्यासमोर शिवपिंडी आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. येथील अंतराळ व गर्भगृह उंच अधिष्ठानावर आहे. सभामंडपाच्या समोरील प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. अर्धंखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपातील सोळा नक्षीदार स्तंभांपैकी बारा स्तंभ कक्षासनांत व चार स्तंभ अंतराळाच्या भिंतींत आहेत. सभामंडपाचे वितान द्वादशकोनी घुमटाकार आहे व त्यात मध्यभागी कमळाची प्रतिकृती आहे. अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी, ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व तोरणात झुंबरलता आहे. मंडारकावर मध्यभागी नक्षीपट असलेली चौकशिला, त्याच्या दोन्ही बाजूला कीर्तीमुख व दोन्ही द्वारशाखांच्या खालील बाजूस कमळनक्षी आहे. बंदिस्त अंतराळात हवा येण्यासाठी वातायने आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींवर दीपकोष्टके आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. तोरणात झुंबरलता व त्यावरील सज्जावर तीन घुमटाकार शिखर शिल्पे आहेत. मंडारकावर चौकशिला व दोन्ही बाजूला कीर्तीमुख आहेत.
येथील गर्भगृह बंदिस्त स्वरूपाचे आहे व अंतराळाप्रमाणे हवा खेळती राहण्यासाठी यातही वातायने आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर खंडोबा देवाचे प्रतीक म्हणून कायम स्वरुपी विशाल शाळूंका असलेली पिंडी असते. पावणे दोन महिने देव या मंदिरात असतात तेव्हा या शिवपिंडीच्या मागे मध्यभागी खंडोबा, डाव्या बाजूला म्हाळसा देवी व देवाच्या उजवीकडे बाणाई यांच्या मूर्ती स्थापित असतात. या तिन्ही मूर्तींच्या मागे देवाची मल्हारी मार्तंड मूर्ती स्थापित असते.
मंदिरास बाह्य बाजूने अधिष्ठानावरून प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर काही प्राचीन पाषाण मूर्ती आहेत. मंदिराच्या छताला सज्जा व त्यावर झुंबर नक्षी आहेत. छतावर चहूबाजूने सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर भूमिज शैलीतील चार थरांच्या चौकोनी शिखरावरील देवकोष्टकांत महादेव, विष्णू, खंडोबा अशा विविध देव देवतांच्या मूर्ती आहेत. शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. शिखराच्या चारही कोनांवर चार लघूशिखरे आहेत.
पौष पौर्णिमा ते पौष अमावस्या असे पंधरा दिवस येथे वार्षिक जत्रोत्सव साजरा होतो. पौष पौर्णिमा हा देवाचा विवाह दिन असल्याने या दिवशी देवाचा नवरदेव रूपातील शृंगार करून लग्नाचे सगळे विधी पार पाडले जातात. यावेळी देवाचे बाणाईशी लग्न लागते. या लग्नाला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांतून हजारो भाविक वऱ्हाडी म्हणून हजेरी लावतात. चंपाषष्ठी, अमावस्या, रविवार, सोमवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • तुळजापूर येथून ३६ किमी, तर धाराशीव येथून ६४ किमी अंतरावर
  • तुळजापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home