महाराष्ट्रासह देशातील अनेक प्रांत व विविध जातींमधील भाविकांचे खंडोबा हे श्रद्धास्थान आहे. नागपूर जिल्ह्यातील खंडोबाचे एकमेव प्रसिद्ध मंदिर हे नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात वसले असून ४०० वर्षे पुरातन असलेले हे देवस्थान भाविकांचे विशेष श्रद्धास्थान आहे. पौष पौर्णिमेला येथे होणारा खंडोबाचा विवाह सोहळा हा येथील प्रमुख उत्सव असून त्यात हजारो भाविक सहभागी होतात. हे देवस्थान जागृत व येथील खंडोबा नवसाला पावतो, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे.
नागपूर येथे सुभाष मार्गावर कॉटन मार्केटसमोर असलेले खंडोबाचे मंदिर हे नागपूरचे रघुजीराजे भोसले यांच्या कार्यकाळात बांधल्याची नोंद आहे. खंडोबा हा क्षत्रिय बाण्याचा देव मानला जातो. त्याच्या भक्तांमध्ये अनेक जातींमधील लोक असले तरी मराठा, धनगर व रामोशी या जातींतील भक्त येथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. बाणाईला एका धनगराने वाढविली म्हणून धनगर समाजाचे हे आराध्य दैवत मानले जाते. मल्हारी मार्तंड अशीही खंडोबाची ओळख आहे. खंडोबा हा महादेवाचा अवतार असून मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध करण्यासाठी महादेवांनी खंडोबा अवतार घेतला, अशी आख्यायिका आहे.
खंडोबाचे मंदिर पूर्वाभिमुख असून पूर्व आणि उत्तर दिशेकडून मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी कमानी आहेत. पूर्वेकडील बाजूस २ दीपमाळा आहेत. मंदिराच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहात खंडोबाची पुरातन मूर्ती आणि दोन्ही बाजूला खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्ती आहेत. खंडोबाची मूर्ती चतुर्भुज असून हातात खडग, त्रिशूळ, डमरू व पानपात्र आहे. या मूर्तींसमोर शिवपिंडी आहे. याशिवाय मूर्तीजवळ नंदी, घोडा व कुत्रा यांची शिल्पे आहेत. खंडोबांची पहिली पत्नी म्हाळसा व दुसरी पत्नी बाणाई असून मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ बाणाईचे स्वतंत्र मंदिर आहे.
या मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व पौष पौर्णिमेला खंडोबा विवाह सोहळा हे दोन प्रमुख सोहळे साजरे केले जातात. त्यापैकी येथे साजरा होणारा खंडोबाचा विवाह सोहळा हा नागपूरमधील मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. त्यावेळी विदर्भासह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. सुमारे ३०० वर्षांहून अधिक काळापासून ही प्रथा सुरू असून यावेळी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. विवाह सोहळ्यानिमित्त निघणाऱ्या पालखीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार… सदानंदाचा येळकोट…’ या गजरात भाविकांकडून भंडारा व खोबऱ्याची उधळण केली जाते. या उत्सव काळात मंदिर परिसरात शेकडो पूजा–साहित्य व प्रसादाची दुकाने सुरू असतात.
नवसपूर्तीनिमित्त या वेळी भाविकांकडून खंडोबाला वांग्याचे भरीत आणि रोडगा यांचा नैवेद्य दाखविला जातो. याशिवाय हळदीचा भंडारा व सुक्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून खोबरे व हळद प्रसाद म्हणून वाटली जाते. खंडोबा देवस्थानात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी (चंपाषष्ठी) असे ६ दिवस उत्सव होतो. पौष पौर्णिमेला खंडोबाचा म्हाळसा हिच्याशी आणि श्रावण पौर्णिमेला बाणाईशी विवाह झाला. या सर्व दिवशी येथे उत्सव साजरे होतात. रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी येथे विशेष पूजा असते. त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.
राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्राच्या ‘क’ दर्जाच्या यादीत या देवस्थानाचा समावेश झाला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून एक लाखांहून अधिक व चार लाखांपर्यंत भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त होतो. )