महाराष्ट्राच्या संस्कृतीत खंडोबा या देवतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील घराघरात होणाऱ्या प्रत्येक शुभकार्याचे पहिले आमंत्रण खंडोबाला दिले जाते. आपल्या शुभकार्यासाठी देवाने उपस्थित राहावे, या विनंतीखातर प्रत्येक घरातून देवाच्या मंदिरात भंडारा उधळण्याची प्रथा आहे. खंडोबाची एकूण बारा मुख्य स्थाने मानली जातात. त्यांत नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील खंडोबा मंदिराचा समावेश आहे. मालेगावच्या खंडोबाची पंधरा दिवस चालणारी वार्षिक यात्रा आणि यात भरणारा गुरे, गाढव, घोडे इत्यादी प्राण्यांचा बाजार विशेष प्रसिद्ध आहे.
या मंदिराचे हेमाडपंती शैलीतील दगडी बांधकाम हे बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी एक व्यापारी कर्नाटकातून धान्याची पोती घेऊन या मार्गाने जात होता. त्यावेळी बैलांना आराम मिळावा म्हणून रात्रीच्या मुक्कामी त्याने आपला माल बैलगाडीतून खाली उतरवला. पहाटे माल पुन्हा बैलगाडीत चढवत असताना धान्याचे एक पोते खूप जड झाले आणि काही केल्या हलेना. व्यापाऱ्याने ते पोते उघडून पाहिले, तर त्यातील धान्यासोबत खंडोबा व म्हाळसा देवीच्या तांदळा स्वरूपातील मूर्ती निघाल्या. हा दैवी संकेत मानून व्यापाऱ्याने याच ठिकाणी या मूर्तींची स्थापना केली व येथे मंदिर बांधले. तो दिवस मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीचा होता. म्हणूनच आजही या ठिकाणी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीपासून पंधरा दिवसांची जत्रा भरते.
नांदेड महामार्गावरील मालेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची भव्य दुमजली स्वागतकमान आहे. कमानीच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे. मंदिरासमोर प्रशस्त मैदान आहे, जेथे येथील प्रसिद्ध यात्रा भरते. मंदिरास भक्कम आवारभिंत आहे. त्यात पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेला महाद्वारे आहेत. पूर्व दिशेच्या मुख्य महाद्वारात चार गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. त्यावरील सज्जावर मधोमध आडव्या बांधणीचे शिखर व त्याच्या चारही कोनांवर उभी शिखरे आहेत. उत्तर महाद्वार दुमजली आहे व त्याच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. महाद्वाराच्या छतावर आडव्या बांधणीचे शिखर आहे. या शिखरावर रांगेत पाच कळस आहेत. येथून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो.
मंदिराच्या अलीकडील काळात बांधलेल्या दुमजली सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर प्राचीन बांधणीची दगडी गोलाकार दीपमाळ आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपात येण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा खेळती राहण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात प्रत्येकी सहा चौकोनी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. हे स्तंभ सभामंडपाच्या भिंतीत सामावलेले आहेत. स
भामंडपात एका चौथऱ्यावर काही प्राचीन पाषाण मूर्ती आहेत. यातील दोन चेहरे असलेले शिल्प मणी व मल्ल या असुरांचे असल्याचे सांगितले जाते. पुढे प्राचीन हेमाडपंती शैलीचे दगडी बांधकाम असलेले मंदिराचे अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळाच्या द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल शिल्पे व वर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. उत्तरांगावर मध्यभागी सूर्य व दोन्ही बाजूस पद्मपुष्प नक्षी आहे. अंतराळात दोन्ही बाजूस देवकोष्ठके आहेत. उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात नंदी व मारुतीची मूर्ती आणि डावीकडे विठ्ठल–रखुमाईच्या मूर्ती आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारात नक्षीदार स्तंभशाखाही आहेत. अंतराळापेक्षा गर्भगृह उंचावर आहे. गर्भगृहात वज्रपीठावर संगमरवरी मेघडंबरी आहे. त्यातील पितळी मखरात खंडोबा–म्हाळसा यांचे दोन मुखवटे आहेत. आणखी दोन मुखवटे त्यापुढे ठेवलेले आहेत. पितळी मखरातील मुखवट्यांखाली खंडोबा व म्हाळसा यांचे स्वयंभू तांदळे आहेत. वज्रपीठाच्या उजव्या बाजूला स्वयंभू शिवलिंग आहे.
अंतराळाच्या छतावर उभ्या धारेची नक्षी असलेले घुमटाकार शिखर आहे. त्यावरील आमलकावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर अष्टकोनी शिखर आहे. त्यातील आठ देवकोष्ठकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरावर शीर्षभागी आमलक आणि त्यावर कळस आहे. मंदिराच्या मागील बाजूस पिंडीवरील शाळुंकेवर बानाईची प्राचीन मूर्ती प्रतिष्ठापित आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की, मालेगावपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बनवस गावी तलावाच्या काठी बानाईचे मंदिर आहे. बानाई खंडोबावर रुसून येथे येऊन राहिली होती. या मंदिराच्या शेजारी शिवपिंडी असलेले दुसरे मंदिर आहे. बानाईला न्यायला आलेले खंडोबा बानाई परत न गेल्याने पिंडीरूपात येथेच राहिले, असे सांगितले जाते.
मंदिरात मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीपासून देवाचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव सुरू होतो. त्यावेळी देवाची पालखी मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणा घालण्यात येते. गावाला तीन प्रदक्षिणा घालून पालखी पुन्हा मंदिरात येते. यावेळी ढोल–ताशांचा गजर आणि खोबरे–भंडाऱ्याची उधळण होऊन संपूर्ण परिसर हळदीच्या सोनेरी रंगाने न्हाऊन निघतो. १५ दिवस चालणाऱ्या या जत्रेदरम्यान परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजून बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. गृहोपयोगी वस्तू, कपडे, कृषी अवजारे, खेळणी याचबरोबर विविध जातीचे देशी–विदेशी कुत्रे, जातिवंत घोडे, गुरे यात्रेत विक्रीसाठी येतात. यात्रेतील खरेदी–विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते. यात्रेसाठी व देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून हजारो भाविक येथे येतात. याव्यतिरिक्त मंदिरात चंपाषष्ठी, पौर्णिमा, अमावस्या, रविवार आदी दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते.