खांबलिंगेश्वर / म्हसोबा मंदिर

म्हसा, ता. मुरबाड, जि. ठाणे

मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील खांबलिंगेश्वर म्हसोबा हे राज्यातील जागृत मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर मानले जाते. खांबातून प्रकट झालेला देव म्हणून या देवस्थानाला खांबलिंगेश्वर शंकराच्या महेश्वर या नावावरून म्हसोबा हे नाव पडले. ज्या खांबातून देव प्रकट झाला, त्या खांबाला भक्तिभावाने नवस केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सुमारे २५० वर्षांची परंपरा असलेली, येथे भरणारी १५ दिवसांची यात्रा ही मुंबई, ठाणे, रायगड पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

म्हसा हे मुरबाड तालुक्यातील प्राचीन इतिहास असलेले गाव आहे. येथील म्हसोबाच्या (शंकर) मंदिरावरून या गावाला म्हसा हे नाव पडले. १९८७ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. देवस्थानाच्या परिसरात येताच मंदिराचा चार स्तर असलेला कळस लक्ष वेधून घेतो. वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेल्या या शिखरावर अनेक देवदेवता साधूसंतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचे बांधकाम तीन ते साडेतीन फूट उंचीच्या जोत्यावर केलेले आहे. दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपाच्या वरील भागात गणेशाची मोठी मूर्ती आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एका उंच चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर उजवीकडे गणपती डावीकडे संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत.

गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर आकर्षक नक्षीकाम असून येथे दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहेत. गर्भगृहात एक शिवलिंग त्या बाजूला लहान लहान सात शेंदूरचर्चित दगड आहेत. या दगडांना म्हसोबा, तर शिवलिंगाला खांबलिंगेश्वर असे म्हटले जाते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दक्षिणेस खांबलिंगेश्वर देवाचा पितळी मुलामा दिलेला उंच खांब आहे. हा खांब पवित्र जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या खांबावरून देवस्थानास खांबलिंगेश्वर असे नाव पडले. मंदिराला लागूनच देवस्थानाचे प्रशस्त भक्त निवास आहे.

पौष पौर्णिमेपासून पुढील १५ दिवस येथे यात्रा भरते. येथील नोंदीनुसार या १५ दिवसांत येथे साडेचार लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी मंदिराभोवती आकर्षक रोषणाई केली जाते. अनेक भाविक या यात्रेसाठी मुक्कामी येतात येथेच तंबू ठोकून राहतात. यात्रेदरम्यान पौष पौर्णिमेला नवस बोलले जातात. दुसऱ्या दिवशी पौष वद्य प्रतिपदेला मंदिराजवळील चौथऱ्यावर नवस फेडले जातात. नवस फेडण्यासाठी येणाऱ्या महिलांनी पिवळे वस्त्र, तर पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी नवस पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या कमरेवर लोखंडी गळ (दाभण) टोचले जातात. नवसाचा हेतू दुष्ट असल्यास त्या जागेतून रक्त येते. हेतू चांगला असल्यास रक्त येत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मानाच्या काठ्या हेही या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. म्हसा गावापासून १४ किमी अंतरावरील कोळी समाजाची वस्ती असलेल्या सिद्धगड गावात म्हसानजीकच्या आगरीबहुल कोरावळे गावात प्रत्येकी एक मानाची काठी, तसेच म्हसा गावातील पुजाऱ्याकडे तिसरी काठी असते. पौष पौर्णिमेला या तिन्ही काठ्यांना सजवण्यात येते. त्यानंतर त्या वाजतगाजत मंदिराजवळील चौथऱ्यावर आणल्या जातात. येथे पुजारी या काठ्यांची पूजा करतात. हा चौथरा शंकराची बहीण नागमाता देवीचा असल्याचे मानले जाते.

यात्रेदरम्यान पौष वद्य प्रतिपदेला येथे गुरांची विक्री सुरू होते. या दिवसालाबाजार फुटलाअसे म्हणतात. सुमारे ३५ एकर जागेवर बैल, तसेच अन्य जनावरे विक्रीसाठी उभी केली जातात. येथे प्रामुख्याने बैलांची खरेदीविक्री जास्त होते. एका बैलजोडीची किंमत एक लाखापासून ते चार लाखांपर्यंत असते. बैलांची जात, रंग आणि वयानुसार त्यांच्या किमती ठरतात. गुलाल उधळून बैलांचा व्यवहार होतो. यात्रेदरम्यान गुरांच्या विक्रीतून सुमारे दीड कोटी रुपयांची येथे उलाढाल होते. शेतीसाठी लागणारी अवजारेही येथे विक्रीस असतात.

ही यात्रा मेंढीच्या लोकरीपासून बनवलेल्या अस्सल घोंगड्या आणि कांबळे मिळण्याचे हक्काचे ठिकाण आहे. येथे ५०० ते २५०० रुपयांपर्यंत विणलेल्या आणि लाटीव अशा दोन प्रकारच्या घोंगड्या मिळतात. पारंपरिक मिठाईची विक्री होत असली तरी येथीलहातोलीप्रकारच्या मिठाईला अधिक मागणी असते. यात्रेदरम्यान येथे रंगणारे तमाशाचे फडही प्रसिद्ध आहेत. यात्रेसाठी राज्यातील विविध भागांबरोबरच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांसारख्या शेजारील राज्यांतील भाविकही मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यात्रा कालावधीत ठाणे, कल्याण, कर्जत मुरबाड येथून राज्य महामंडळातर्फे अतिरिक्त एसटी बस सोडल्या जातात.

उपयुक्त माहिती:

  • मुरबाडपासून १० किमी, तर ठाण्यापासून ७१ किमी अंतरावर
  • मुरबाड, कर्जत येथून म्हसासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : दशरथ पष्टे, अध्यक्ष, देवस्थान ट्रस्ट, मो. ९९२१५४०१९१
Back To Home