खाजणादेवी मंदिर

पाल, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग


वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड नदीकिनारी, नारळीपोफळींच्या घनगर्द झाडीत एका छोट्या टेकडीवर खाजणादेवी मंदिर वसलेले आहे. आजूबाजूला भातशेती आणि त्या सपाट जमिनीत उगवून आल्यासारखी अशी ही गोलाकार टेकडी आहे. या टेकडीचे त्यावरील मंदिराचे विहंगम म्हणजे आकाशातून दर्शन घेतल्यास ते दृश्य एखाद्या शिवलिंगासारखे दिसते. येथील मंदिर हे खाजणादेवीचे जागृत ठाणे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारी ३६० चाळ्यांची अधिष्ठात्री असलेली ही देवी पालची ग्रामदेवता येथील अनेक घराण्यांची कुलदेवता आहे.

पूर्वी परकीय आक्रमकांपासून देवदेवतांचे रक्षण करण्यासाठी मूर्ती सुरक्षित ठिकाणी लपविल्या जात. देवीची ही मूर्ती अशाच पद्धतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने खाजणात लपविली गेली असावी त्यामुळेच देवीस खाजणादेवी असे नाव पडले असावे, असे सांगितले जाते. याबाबत आख्यायिका अशी की एकदा एक कोळी नेहमीप्रमाणे मच्छीमारी करीत होता. त्याच्या जाळ्यात भरपूर मासे आणि काहीतरी जड वस्तू लागली. ती देवीची मूर्ती होती. देवीचे दर्शन घेऊन त्याने ती मूर्ती एका बाजूला ठेवली. रात्री देवीने त्या कोळ्याला स्वप्नात दृष्टांत दिला. माझ्या अस्तित्वाबद्दल तू इतर कोणाला कळवू नको, ठराविक काळाने तू मला ठेवलेल्या जागेपासून मी उंच उंच जात राहीन, पण ही गोष्ट इतर कोणालाही कळता कामा नये, याची दक्षता घे. तू दुसऱ्या कोणालाही हे सांगितलेस तर मी आहे त्याच उंचीवर प्रकट होईन, असे देवीने त्याला स्वप्नात सांगितले. पण एवढी मोठी गोष्ट कोळ्याच्या पोटात राहिली नाही. आपल्या बायकोला सांगितल्याशिवाय त्याला राहवले नाही. त्याने तिला देवीच्या दृष्टांताबद्दल सांगितले. त्याबरोबर देवी ज्या उंचीवर होती, तेथेच थांबली.

खाजणादेवी मंदिराच्या टेकडीच्या पायथ्याशी डांबरी रस्त्यालगत मंदिराचे मोठे प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही स्तंभांच्या पायथ्याशी बसलेल्या सिंहमूर्ती आहेत. वर छताच्या मधोमध एका छोट्या देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती आहे. नक्षीदार आकारांनी हे प्रवेशद्वार सजलेले आहे. प्रवेशद्वारातून वर टेकडीवर जाण्यासाठी अनेक बांधीव पायऱ्या आहेत. भाविकांना ऊनपावसाचा त्रास होऊ नये म्हणून या पायऱ्यांवर पत्र्याचे छत बांधण्यात आलेले आहे. पायऱ्या संपून वर येताच उजव्या बाजूला एका मोठ्या चौथऱ्यावर सप्तस्तरीय दीपमाळ आणि त्याच्या बाजूस तुळशी वृंदावन आहे. दीपमाळ वृंदावन या दोन्हींच्या रचनेत घटपल्लवाकाराचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलेला आहे.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार महिरपी कमानदार आहे. त्याच्या बाजूच्या दोन्ही स्तंभांलगत दोन पायांवर उभ्या असलेल्या उंच सिंहमूर्ती आहेत. या मुख्य प्रवेशद्वारासमोरच सभामंडपाचे अर्धगोल कमानीच्या आकाराचे द्वार आहे. या द्वारावरही सुंदर नक्षीकाम केलेले आहे. येथील ललाटबिंबावर यक्षशिल्प आहे. त्यातून तीन पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या प्रकाराच्या या सभामंडपात मधोमध काही अंतरांवर चार गोल स्तंभ आहेत. त्यांवर समतल छत आहे. तीन बाजूंस हे छत उतरते आहे. छताची भिंत आतून गोलाकार नक्षीने सजवलेली आहे. सभामंडपातील स्तंभ छोट्या चौकोनी चौथऱ्यांवर उभारलेले आहेत. या चौथऱ्यांवरील मोरांची उठावशिल्पे लक्षवेधक आहेत. गोलाकार स्तंभांना वरच्या बाजूस घटपल्लवाचा आकार देण्यात आलेला आहे. स्तंभ छतास जेथे चिकटतात तेथे नक्षीदार कपोत आहेत. सभामंडपात बाहेरच्या बाजूने तीन पायऱ्यांची कक्षासने आहेत. त्यात मध्ये महिरपी कमानीने जोडलेले खांब आहेत. भरपूर प्रकाश खेळती हवा अशी योजना येथे करण्यात आली आहे.

सभामंडपातून चार पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या प्रवेशद्वारावर अर्धगोलाकारात सुंदर नक्षी कोरलेली आहे. त्यावर ललाटबिंबस्थानी यक्षमूर्ती आहे. द्वारशाखेवर वरील अर्धगोलाकार सुरू होतो त्या ठिकाणी दोन्ही बाजूंस सिंहशिल्पे आहेत. अंतराळाच्या भिंतीवर बसविण्यात आलेल्या स्त्री द्वारपालांच्या मूर्ती हे येथील एक वैशिष्ट्य आहे. या मूर्तींच्या हातात गदा आणि शस्त्रे आहेत. अंतराळात वार्षिक जत्रोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तेथे मोठे झुंबर लावण्यात आले आहे. अंतराळात मधोमध देवीचे गर्भगृह त्या भोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाचा दरवाजाही कोरीव कामाने सजलेला आहे. त्याच्या ललाटबिंबावर यक्षमूर्ती त्याच्याही वर भिंतीवर मधोमध गोल गवाक्षात देवीची चतुर्भुज मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीच्या कडेच्या दोन्ही खांबांच्या शीर्षस्थानी सिंहमूर्ती बसविलेल्या आहेत.

गर्भगृहात छोट्या चौथऱ्यावरील दगडी चौरंगावर देवीची काळ्या पाषाणातील उभी उग्रमुख मूर्ती आहे. देवीच्या हातात त्रिशूल आहे, ती रेड्याचा वध करताना दिसत आहे. तिला वरून फिकट हिरव्या रंगाचे डोळे लावण्यात आले आहेत. मूर्तीच्या बाजूला काळ्या पाषाणातील कमान आहे, जिच्यावर फुलापानांची नक्षी कोरण्यात आलेली आहे. देवीच्या मूर्तीच्या बाजूला काही प्राचीन देवदेवतांची स्थाने आहेत. काळ्या पाषाणात घडविलेल्या या मूर्तीचींही यथासांग पूजा करण्यात येते. गर्भगृह अंतराळाच्या भिंतींस बाहेरील बाजूने गोल कमान असलेल्या मोठ्या खिडक्या आहेत. गर्भगृहावर पिरॅमिडच्या आकाराचे शिखर, त्यावर आमलक आणि टोकदार कळस आहे. शिखरही कोरीव नक्षीकामांनी सजलेले आहे.

या मंदिरात बाहेरच्या बाजूस चौथऱ्यावर दोन लिंगशिल्पे आहेत. त्यातील एक उभे चौकोनाकार दुसरे दंडगोलाकार आहे. त्यांच्या जवळच अश्वारूढ भैरोबाच्या तीन मूर्ती तसेच ढालतलवारधारी देवतेची एक मूर्ती आहे. या ठिकाणी दगडी शाळुंखेवर कोरलेल्या पादुका आहेत. त्यालगत वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ आहे. उभ्या चौकोनी वर किंचित गोलाकार दिलेल्या या वीरगळात खालच्या बाजूस शयनावस्थेतील वीराची प्रतिमा कोरलेली आहे. मधोमध म्हशीची मोठी प्रतिमा आहे, तर वरच्या बाजूला एका कोपऱ्यात सूर्य दुसऱ्या कोपऱ्यात चंद्रप्रतिमा आहे. अशा प्रकारचा वीरगळ अन्यत्र सहसा पाहावयास मिळत नाही.

खाजणादेवीस पूर्वीच्या काळी रेड्याचा बळी दिला जात असे. पुढे कालौघात ती प्रथा बंद झाली. वैशाख कृष्ण त्रयोदशीला या देवीची मोठी जत्रा असते. रेड्याची जत्रा म्हणून ती प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे भाविकांची गर्दी असते. वेगवेगळ्या दुकानांनी त्यावेळी हा भाग गजबजून जातो. मंदिर उंचावर असल्याने तेथून खालची खाचरे, आजूबाजूचे डोंगर सुरेख दिसतात. यामुळे येथे भाविकांबरोबरच पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात.

उपयुक्त माहिती

  • वेंगुर्ल्यापासून किमी अंतरावर
  • वेंगुर्ला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या टेकडीच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • संपर्क : ७७६८८०६७९०, ९८२१६३७९५८
Back To Home