नागपूर जिल्ह्यात रामटेक टेकडीवरील धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या सुपरिचित असलेल्या रामटेक देवस्थानापासून काही अंतरावर केवल नृसिंह देवस्थान आहे. महाराष्ट्रातील हे एक प्राचीन पण सुस्थितीत असलेले मंदिर समजले जाते. येथील शिलालेखावर या मंदिराच्या निर्मिती काळाबाबत उल्लेख असून तो इ. स. ४२० ते ४५० असा आहे. त्यामुळे या मंदिराला सुमारे दीड हजार वर्षांचा इतिहास आहे. मंदिराशेजारीच महाकवी कालिदास यांचे भव्य स्मारक असून याच स्थानावर कालिदास यांनी ‘मेघदूत’ या अभिजात काव्याची रचना केली.
भारताचे सुवर्णयुग म्हणून ज्यांची कारकीर्द ओळखली जाते, त्या गुप्त साम्राज्याचे व्याही असलेल्या वाकाटकांचे महाराष्ट्रातील कला, साहित्य व स्थापत्य या क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान होते. विदर्भ हा पूर्वमध्ययुगीन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि कलास्थापत्याच्या दृष्टीने कायमच केंद्रस्थानी राहिलेला भाग आहे. येथील रामटेक, मनसर आणि नगरधन हा त्रिकूट इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध आहे. रामटेक आणि त्याच्या प्राचीनत्वाबाबत अनेक ऐतिहासिक दाखले आहेत. देशात अनेक ठिकाणी रामगिरी नावाची स्थाने असली तरी महाकवी कालिदासाने ‘मेघदूता’त वर्णिलेले ‘रामगिरी’ म्हणजेच ‘रामटेक’ आहे, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.
वाकाटकांपासून ते मराठा कालखंडातील अनेक वास्तू येथे आजही सुस्थितीत आहेत. महाराष्ट्रात नृसिंहांची उपासना वाढण्यामागे वाकाटकांचा मोठा वाटा होता. रामटेक येथील उंच टेकडीवर कालिदास स्मारकाच्या शेजारी असलेल्या केवल नृसिंह मंदिराच्या बांधकामात लालसर रंगाच्या दगडांचा वापर केलेला आहे. मंदिराभोवती चारही बाजूंनी तटबंदी आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख व आयताकृती असून ते जमिनीपासून सुमारे तीन फूट उंच जोत्यावर आहे. मंदिराचे छत संपूर्णतः सपाट असून प्रवेशद्वाराच्या बाजूला गणशिल्पे अंकित आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपातील स्तंभांवर पद्मबंधयुक्त कमलाकृत अंकन असून ते अजिंठा येथील लेण्यांशी साधर्म्य दाखविते. त्यापुढे सभामंडपाच्या आकाराइतकेच गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी चार खांबांच्यामध्ये सुमारे ७ ते ८ फूट उंचीची नृसिंहाची मूर्ती आहे. नृसिंहाच्या उजव्या हातात चक्र असून लक्ष्मीशिवाय असणाऱ्या या नृसिंहाला ‘केवल नृसिंह’ म्हणून ओळखले जाते. नृसिंह म्हणजे विष्णूचा चौथा अवतार मानला जातो. त्यामध्येही प्रकार आहेत. त्यातील एक रौद्र नृसिंह व दुसरा केवल नृसिंह. केवल नृसिंह शांत स्वभावाचा असून त्याची पूजा केली जाते.
मुख्य मंदिरासमोर आणखी एक लहान मंदिर असून त्यातही नृसिंहाची मूर्ती आहे; परंतु या मूर्तीची हनुमान म्हणून पूजा केली जाते. तशीच मुख्य मंदिरातील केवल नृसिंहाच्या मूर्तीचीही १९८१ पर्यंत हनुमान म्हणून पूजा केली जात होती व वेळोवेळी त्यावर शेंदुराचे लेप लावले जात असत. पुरातत्त्व खात्याच्या संशोधनात ही मूर्ती हनुमानाची नाही, हे स्पष्ट झाल्यावर त्यावरील शेंदुराचे लेप काढण्यात आले आणि आज दिसते ती केवल नृसिंहाची मूर्ती प्रकाशझोतात आली. याच काळात पुरातत्त्व विभागाकडून मंदिराच्या दुरुस्तीचे कार्य सुरू असताना तेथे वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्त यांचा १५ ओळींचा ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आढळला. या लेखावरून मंदिराचा निर्मिती काळ इ. स. ४२० ते ४५० असल्याचे निश्चित झाले.
या मंदिरापासून काही अंतरावर रामटेक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आणखी एक नृसिंह मंदिर आहे. हे मंदिरही पश्चिमाभिमुख असून पहिल्या मंदिरासारखेच आहे. या मंदिरातही भव्य आकाराची केवल नृसिंह मूर्ती आहे. मूर्तीचा आकार पहिल्या मूर्तीइतकाच असला तरी मूर्तीमध्ये काहीसा फरक आहे. या मंदिराचे नाव आहे रुद्र नृसिंह मंदिर. पती रुद्रसेनाच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाकाटक साम्राज्ञी प्रभावती गुप्त हिने हे दुसरे मंदिर बांधून घेतले होते. वाकाटककालीन ‘केवल नृसिंह’ आणि ‘रुद्र नृसिंह’ ही मंदिरे महाराष्ट्रातील सुस्थितीत असलेली सर्वात पुरातन मंदिरे आहेत, असे सांगितले जाते.
या दोन मंदिरांशिवाय महाकवी कालिदास, महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी, म्हाइंभट्ट, रामचंद्रदेव यादव आणि रघुजी भोसले यांच्याही वास्तव्याच्या खुणा येथे आहेत. महाकवी कालिदास हे दुसरे चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राजदरबारात इ. स. ४०० च्या सुमारास राजकवी होते. ‘मेघदूत’ या प्रसिद्ध अभिजात काव्याची रचना कालिदासांनी या रामटेकच्या डोंगरावर केली. त्याच ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे कालिदासांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यात वैशिष्ट्यपूर्ण असे कोरीव नक्षीकाम आहे. या स्मारकाचे उद्घाटन १२ डिसेंबर १९७३ साली करण्यात आले. राज्यातील नामवंत चित्रकारांनी या स्मारकात कालिदासांच्या ‘मेघदूत’ व ‘रघुवंश’ या साहित्यकृतीतील तसेच मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कुमारसंभव तसेच शाकुंतल यांतील विविध प्रसंगांवर आधारित तैलचित्रे रेखाटली आहेत. ही दोन्ही मंदिरे व कालिदास स्मारक यांना राज्य सरकारकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.