केपादेवी मंदिर

उभादांडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग


वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा या विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या गावात महिषासुरमर्दिनी देवीचे रूप असलेल्या केपादेवीचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की सुमारे ३५० वर्षांपूर्वी सावंतवाडी संस्थानाने हे मंदिर बांधून दिले होते. या मंदिरासाठी गावातील आजूबाजूची जमीन संस्थानातर्फे देण्यात आली होती. तसेच गिरप घराण्याकडे मंदिराची सेवा करण्याचे काम सोपवले होते. केपादेवीचे हे स्थान जागृत असून देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे

देवीचे मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात, लोकवस्तीने वेढलेले आहे. फेब्रुवारी २००८ रोजी येथे बंधाऱ्याचे काम सुरू असताना एक अपघात झाला. डंपरचे ब्रेक निकामी होऊन त्याची जोरदार धडक प्राचीन मंदिराच्या पुढच्या भागास लागली. त्यामुळे सभामंडपाचा मोठा भाग कोसळला. त्यावेळीही देवाची मर्जीअसे मानून सारे ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी नवीन वास्तू बांधण्याचे ठरवले. ग्रामस्थांच्या एकीतून येथे आताचे प्रशस्त देवी मंदिर उभे राहिले. या मंदिराच्या समोरच्या बाजूस एका ओट्यावर तुळशी वृंदावन आणि सहा स्तरीय दीपस्तंभ आहे. या स्तंभावर सर्व बाजूंनी छोट्या देवळ्या कोरलेल्या आहेत शीर्षस्थानी घटपल्लवाकार आहे. सणासुदीच्या दिवशी दीपस्तंभ प्रज्वलित केला जातो. मंदिर आणि दीपस्तंभाचा ओटा यामध्ये बरेच मोकळे मैदान आहे. तेथून ग्रामस्थांची जाये सुरू असते

मंदिराची रचना ही आधुनिक कोकणी शैलीची आहे. मुखमंडप, त्यास जोडूनच अर्धखुला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे त्याचे स्वरूप आहे. छतास सर्व बाजूंनी समोरून दिलेल्या पन्हळीसारख्या आकारामुळे आणि छतावरील बैठ्या कळसांमुळे मंदिरास वैशिष्ट्यपूर्ण रूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या बाजूला एक छोटी देवळी आहे. हे चाळ्याचे मंदिर असून कोणत्याही प्रकारे वाईट शक्तींचा शिरकाव मंदिरात होऊ नये यासाठी त्याचे प्रयोजन आहे. या देवाकडे कौल लावला जातो. त्याला केळी आणि नारळाचा नवस केला जातो

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चार पायऱ्या चढल्यावर मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपाच्या वरच्या बाजूला अर्धगोलाकार कमान आहे. त्यावर दोन्ही बाजूंस मोर आणि मध्यभागी व्यालशिल्प आहेत. मुखमंडपास जोडून मंदिराचा प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडप अर्धखुल्या पद्धतीचा आहे. त्यास बाहेरील भिंतीच्या ठिकाणी चौकोनी खांब आहेत. ते एका आडव्या तुळईने जोडलेले आहेत. खालच्या बाजूस सलग कक्षासन आहे. आतल्या बाजूस काही अंतरावर मोठे नक्षीदार रंगकाम केलेले स्तंभ आहेत. हे स्तंभ उंच चौकोनी चौथऱ्यावर उभारण्यात आले आहेत त्यांच्या वरच्या बाजूस घटपल्लव आहेत. या स्तंभांच्या शीर्षस्थानी तिन्ही बाजूंना सुंदर नक्षीदार कपोत आहेत. कोकणी शैलीच्या उतरत्या छतावर आतील बाजूने फुले आणि तारकाकृती नक्षीकाम केलेले आहे. सभामंडप हवेशीर असून प्रकाशमय आहे

समोरील अंतराळात जाण्यासाठी सात पायऱ्या आहेत. त्यांच्या उजव्या बाजूस सभामंडपाच्या जमिनीवर नीति देवतेची छोटी अर्धगोलाकार देवळी आहे. अंतराळाचे प्रवेशद्वार लाकडी आहे त्यावर अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे. हे प्रवेशद्वार द्विशाखीय आहे. त्याच्या बाजूस नक्षीदार महिरप आहे. अंतराळाच्या भिंतीवर दोन्ही बाजूंना देव्हाऱ्याचा आकार दिलेल्या खिडक्या आहेत. अंतराळात मधोमध गर्भगृह असून त्याच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. नक्षीदार भक्कम दोन स्तंभ असलेल्या चौथऱ्यावर गर्भगृह आहे. गर्भगृहाचे लाकडी द्वार द्विशाखीय आहे त्यावरही कोरीवकाम केलेले आहे. चौकटीच्या वरच्या बाजूस ललाटबिंबस्थानी शंकराचे उठाव शिल्प आहे त्याच्या दोन्ही बाजूस गज प्रतिमा आहेत. त्याच्याही वरच्या बाजूस मधोमध महिषासुराचे मुख कोरलेले आहे

आत एका उंच वज्रपीठावर, चांदीच्या प्रभावळीमध्ये, केपादेवीची काळ्या पाषाणातील त्रिकोणाकृती मूर्ती आहे. ही मूर्ती शस्त्रधारी आहे. ती चतुर्भुज असून एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात त्रिशूल तर चौथ्या हातात महिषासुराचे शिर आहे. रेड्याच्या पोटात असलेल्या महिषासुराला बाहेर काढण्यासाठी रेड्याचे शिर कापून मग महिषासुराचा शिरच्छेद देवीने केला आहे; रेड्याचे कापलेले शिर बाजूला पडलेले आहे, अशी ही मूर्ती आहे. मात्र देवीचा चेहरा शांत, सौम्य आहे. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला पूर्वस, गिरवस आणि ब्राम्हणाच्या दोन मूर्ती, तर डाव्या बाजूस जळबांदेश्वर, हेळेकर आणि इतर दोन देवांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहावर जुन्या पद्धतीचे पाच स्तरीय शिखर आहे. त्याच्या खालच्या स्तरावर सर्व बाजूंनी देवळ्या आहेत. शिखरास घुमटाकार आमलक आहे त्यावर उंच कळस आहे

या मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातील एक आख्यायिका अशी की पंधराव्यासोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये हिंदूंचा आत्यंतिक छळ चालवला होता. त्यावेळी अनेक हिंदूंनी तेथून पलायन केले. देवीदेवतांच्या मूर्ती घेऊन स्थलांतर केले. गोव्यातील केप या गावातील देवीही अशाच प्रकारे स्थलांतरित करून येथे आणली तिची सर्व जबाबदारी गिरप घराण्यातील एका सत्पुरुषाकडे सोपविण्यात आली. त्या केप या गावाच्या नावावरूनच देवीचे नाव केपादेवी असे पडले. देवीच्या नावाबद्दल आणखी एक आख्यायिका अशी सांगितली जाते की गिरप घराण्यातील एका सत्पुरुषाच्या स्वप्नात एकदा देवी आली. तिने सांगितले की मी केगद्याच्या म्हणजे केवड्याच्या बनात आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी स्वप्नात दिसलेल्या ठिकाणी शोध घेतला असता त्यांना देवीची मूर्ती सापडली. त्यांनी ती गावात आणून तिची स्थापना केली पूजा सुरू केली. ही मूर्ती केगद्याच्या बनात सापडली म्हणून तिचे नाव केगदा देवी असे पडले त्याचा अपभ्रंश केपादेवी असा झाला, असे सांगतात. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, मालवणी भाषेत कृपाचे किरपा होते. ही देवी किरपा करणारी असून त्यावरून किरपा देवी त्याचा अपभ्रंश होऊन देवीचे नाव केपादेवी असे पडले

ही देवी गिरप घराण्याची कुलदेवता असली तरी सर्वजण तिच्यापुढे नतमस्तक होतात. कुर्लेवाडी, डिचोलकरवाडी, बेहरेवाडी, चमणकरवाडी, करंगुटकरवाडी, कांबळीवाडी आणि तुळसकरवाडी या सात वाड्या देवीचे मानकरी आहेत. देवीच्या प्रत्येक उत्सवाला सातही मानकऱ्यांना उपस्थित राहावे लागते. गिरप हे देवीचे पुजारी आहेत. देवीची सेवा तेच करतात

गुढीपाडवा, नवरात्रोत्सव, दसरा कालाष्टमी हे सण मंदिरात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. मार्गशीर्ष शुद्ध दशमीला देवीची जत्रा भरते. या दिवशी मंदिरात दिवसभर अनेक कार्यक्रम होत असतात. सकाळी देवीची ओटी भरली जाते. तिला साडी नेसवून दागिने घालून सजविले जाते. दुपारी समाराधना (महाप्रसाद) केला जातो. संध्याकाळी देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. देवीची विधीवत पूजा करून विविध विधी केले जातात. रात्रीच्या वेळी दशावताराचा प्रयोग असतो. वैशाख कृष्ण पंचमीला मंदिराचा वर्धापन दिन असतो. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम असतात. खासकरून महिला भाविकांची या देवीवर श्रद्धा आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामापूर्वी वा निर्णय घेण्यापूर्वी अनेक भाविक देवीला कौल लावतात. मंदिर संस्थानातर्फे येथे नेत्र, आरोग्य रक्तदान शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात

उपयुक्त माहिती

  • वेंगुर्ला येथून किमी अंतरावर
  • वेंगुर्ला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home