‘दक्षिण काशी’ म्हणून धार्मिक मान्यता असलेल्या करवीर अर्थात कोल्हापूर शहरापासून जवळच बालिंगे या गावामध्ये कात्यायनी देवीचे प्राचीन स्थान आहे. ही देवी बालिंगेची ग्रामदेवता आहे. ती कोल्हापूरच्या महालक्ष्मी-अंबाबाईची सहाय्यक मानली जाते. त्याच प्रमाणे ती भैरवाची साह्यकर्तीही मानली जाते. ‘विद्यार्णवतंत्र’ या प्राचीन तंत्रग्रंथानुसार ही देवी शंकराप्रमाणेच त्रिनेत्रधारी आहे. मराठी ‘देवी सप्तशती’मध्येही ‘हे तव सौम्य वदन। शोभने त्रिलोचन।’ असे म्हटलेले आहे. भक्तांची अशी श्रद्धा आहे की कात्यायनी देवी अरिष्टहारिणी आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे. त्यामुळे तिच्या दर्शनासाठी नेहमी येथे रीघ असते.
‘देवीकोशा’नुसार उडियान, कामागिरी, कामाख्या व जालंदर या पहिल्या शक्तिपीठांपैकी उडियान या ठिकाणी कात्यायनी देवीचे स्थान होते. मात्र यावनी सत्तेच्या काळात हे पीठ नष्टप्राय झाले. कात्यायनी देवीविषयी विविध पौराणिक ग्रंथांमध्ये आख्यायिका आहेत. तिच्या नावाविषयी असे सांगितले जाते की कत या ऋषींचा पुत्र कात्य. कात्य याच्या घराण्यात कात्यायन या थोर ऋषींचा जन्म झाला. ते देवी भगवतीचे भक्त होते. देवीने आपल्या घरी कन्यारूपात जन्म घ्यावा अशी त्यांची मनीषा होती. त्यांची कठोर तपस्या आणि इच्छा यांचा मान राखत भगवतीने त्यांच्या घरात जन्म घेतला. अश्विन कृष्ण चतुर्दशी हा तो दिवस होता. देवीच्या नऊ रूपांपैकी हे सहावे रूप मानले जाते. ऋषी कात्यायनीची मुलगी म्हणून ती देवी कात्यायनी म्हणून ओळखली जाऊ लागली.
तिच्या उत्पत्तीविषयीही विविध आख्यायिका सांगण्यात येतात. एका कथेनुसार, महिषासुर दैत्याच्या निर्मूलनासाठी कार्तिकस्वामींनी आपल्या तेजाने एक स्त्री निर्माण केली. कार्तिकस्वामींनी तिला उत्पन्न केले म्हणून तिचे नाव कात्यायनी असे पडले. आणखी एक कथा अशी सांगण्यात येते की महिषासुराचा विनाश करण्यासाठी ब्रह्मा-विष्णू-शंकर यांनी आपापल्या तेजाचे एकत्रिकरण करून या देवीची निर्मिती केली. याच देवीची कात्यायन ऋषींनी कठोर उपासना केली होती. महिषासुराचा वध करण्यासाठी अशाप्रकारे देवीचा अवतार प्रकट होणे हे शुभ घडले. विजयादशमीच्या दिवशी कात्यायनीने महिषासुराचा अंत केला, म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असे नामाभिधान प्राप्त झाले.
`विद्यार्णव तंत्र’ या ग्रंथात, त्रिनेत्र, चतुर्भज, शंख-चक्र-खड्ग, त्रिशूल धारण करणारी, सिंहवाहिनी असे देवीचे रूप सांगितले आहे. बालिंगे या गावात याच कात्यायनी देवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की कोल्हासुराने करवीर क्षेत्राच्या पूर्वेस रक्तलोल, पश्चिमेस रक्ताक्ष, उत्तरेस रक्तभोज आणि दक्षिणेस रक्तबीज या राक्षसांची नियुक्ती केली होती. यातील रक्तबीजाचा नाश करण्यासाठी महालक्ष्मीने भैरवाला योजिले होते. भैरवाने आपल्या मदतीसाठी कात्यायनी देवीस पाचारण केले. तिने रक्तबीज राक्षसाचा वध केला. त्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या देवगणांना देवीने अमृतकुंडातील पाण्याने जिवंत केले. हे कुंड आजही मंदिरासमोर आहे.
बालिंगे गावातल्या कात्यायनी मंदिरासभोवतालचा परिसर हा अतिरम्य आणि जुन्या वृक्षराजीत वसलेला आहे. मंदिर परिसराला साधी वेस आहे. प्रांगणात सर्वत्र दगडी फरसबंदी आहे. समोरच काळ्या पाषाणात बांधलेला दीपस्तंभ आहे. त्याच्या समोरच दगडात बांधलेले, पायऱ्या असलेले चौकोनाकार जलकुंड आहे. त्यास अमृतकुंड असे म्हणतात. या कुंडाच्या भिंतीतील एका छोट्या देवळीत शंकराची पिंडी आहे. त्याचप्रमाणे पायऱ्यांलगत गोमुख आहे व त्याच्यावरच्या बाजूस एकच फणा; परंतु दोन शेपट्या असलेल्या नागाची प्रतिमा कोरलेली आहे. तेथून या कुंडात सतत पाणी पडत असते. या कुंडात अनेक कासवे आहेत. कुंडालगत एक जुने तुळशी वृंदावन आहे.
मंदिर दगडी बांधणीचे आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपावर उतरत्या छपराचे छत आहे. गर्भगृहावर पिरॅमिडच्या आकाराचे छोटे शिखर आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यालगत छोट्या पितळी चौथऱ्यावर देवीचे पितळेचे पाऊल बसवलेले आहे. असे सांगण्यात येते की या पितळी पावलाची स्थापना छत्रपती राजाराम महाराजांनी केली. या चौथऱ्याखाली सुमारे एक-दीड फुटांवर एक स्वयंभू ‘पाऊल’ आहे.
सभामंडपात प्राचीन व साधेसे कोरीवकाम असलेले पाषाण स्तंभ आहेत. या सभामंडपात उजव्या बाजूस भैरवाचे स्थान आहे. याच भैरवाच्या साह्यासाठी देवी येथे आली होती. देवीच्या दर्शनापूर्वी या भैरवाचे दर्शन घेण्याची येथे प्रथा आहे.
मंदिराचे गर्भगृह लहान आहे. दगडी प्रवेशद्वाराच्या चौकटीवर कोरीव नक्षीकाम केलेला सोनेरी पत्रा चढवण्यात आला आहे. गर्भगृहात मध्यभागी मोठा देव्हारा आहे. त्यातील अधिष्ठानावर कात्यायनी देवीची तांदळा स्वरूपाची मूर्ती आहे. त्यावर डोळे आणि गंधाचा भाग वरून लावलेला दिसतो. येथेच मागच्या बाजूला उत्सवमूर्ती आहे.
कात्ययनी मंदिराच्या मागेही एक कुंड आहे. त्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की परशुरामाने आपल्या पापाचे क्षालन करण्यासाठी अमृतकुंडात स्नान करून कात्यायनी देवीची व श्री भैरवाची पूजा केली. तेव्हा देवीने त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या नावाचे तीर्थ तयार करावे. त्यानुसार परशुरामांनी मंदिराच्या मागे एक कुंड बांधले. ते परशुराम कुंड म्हणून आज ओळखले जाते. दगडांत बांधलेले हे तीर्थ चौकोनी आकाराचे असून त्याच्यामागे रेणुका मातेचे छोटे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात काही झाडांना पार बांधून भाविकांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथे ओवऱ्याही आहेत.
मंगळवार हा कात्यायनीचा वार. त्या दिवशी मंदिरात मोठी गर्दी असते. देवीला रोज दही-भाताचा नैवेद्य दाखविला जातो. देवीजवळ तुपाचा नंदादीप सतत तेवत असतो. नवरात्रात नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारे देवीची सुंदर आरास केली जाते. नवरात्रीत व कार्तिक अमावस्येला देवीची ओटी भरली जाते. या ओटीत साडी-चोळी, गजरा, नारळ, नथ, जोडवी असे साहित्य असते. दर पौर्णिमेस तीर्थप्रसाद तर अमावस्येस होम-हवनाचे कार्य़क्रम या मंदिरात होत असतात. कार्तिक अमावस्येस भंडारा, होमहवन व महाप्रसाद असतो.