काशीकलेश्वर मंदिर

कलमठ, कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग


व्युत्पत्तीशास्त्रानुसार कणकवली या शहराचे नाव कनकवल्ली या शब्दापासून तयार झाले आहे. कनकवल्ली म्हणजे सुवर्णभूमी. याच सुवर्णभूमीच्या परिसरात, जानवली नदीच्या तीरावर वसलेले कलमठ हे निसर्गसंपन्न गाव आहे. अखंड मौनधारी दिगंबर परमहंस भालचंद्र महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या गावात काशीकलेश्वराचे भव्य मंदिर आहे. सोनेरी कळस आणि बाकी सर्व शुभ्र असलेले हे मंदिर पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कलमठचे ग्रामदैवत असलेले काशीकलेश्वर हे जागृत देवस्थान आहे हा देव संकटसमयी भक्तांच्या हाकेला धावून येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे

देशात अनेक ठिकाणी महादेवाची कलेश्वर, कालेश्वर, कुलेश्वर अशा विविध नावांनी मंदिरे आहेत. कलमठ येथील हे मंदिर काशीकलेश्वर या नावाने ख्यातकीर्त आहे. या स्थानाचा इतिहास अज्ञात असला तरी या मंदिराच्या नावावरून त्याचा काशी म्हणजेच वाराणशीच्या महादेवाशी संबंध असल्याचे स्पष्ट होते, असे अभ्यासकांचे मत आहे. काशीमध्येही कालेश्वर मंदिर आहे. त्याबाबतची धार्मिक श्रद्धा अशी की काशीमधील कालेश्वर लिंग हे उज्जैनमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वराचे प्रतीक आहे. कलमठमधील मंदिर मात्र काशीकलेश्वराच्या नावाने ओळखले जाते. हे एक प्राचीन आणि जागृत स्थान असून २०२३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार नुतनीकरण करून आताचे भव्य मंदिर उभारण्यात आले. त्या वर्षी माघ कृष्ण तृतीया ते पंचमी असे तीन दिवस मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा चालला होता

कोकणातील अन्य अनेक मंदिरे विविध रंगांनी रंगवल्याचे दिसते. काशीकलेश्वराचे मंदिर मात्र पांढऱ्याशुभ्र रंगातील आहे. हिमालयातील बर्फाच्छादित कैलास शिखर हे भगवान शंकरांचे निवासस्थान मानले जाते. त्या बर्फाच्छादित पर्वताची आठवण या मंदिरातून व्हावी, या भावनेतून मंदिराच्या बाह्यभागास असा रंग देण्यात आला आहे. मंदिरासमोर एका चबुतऱ्यावर दोन छोटे दीपस्तंभ आहेत. मंदिरास गजपृष्ठाकार छत असलेला आणि कमानदार खांबांचा मुखमंडप आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार लाकडी त्रिशाखीय आहे त्यावर वेलबुट्टीचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे

या मंदिराच्या सभामंडपाचा आकार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्राचीन मंदिरांतील स्तंभांसारखे दिसणारे गोलाकार स्तंभ, त्यांवरच्या बाजूस कमलशीर्ष, घटपल्लव यांसारखे आकार आहेत. वर खांबाच्या आकारापेक्षा मोठा चौकोनी फरशीसारखा सपाट कमी उंचीचा भाग म्हणजेच पलगई आहे. त्यावर वैशिष्ट्यपूर्ण तरंगहस्त आहेत. या तरंगहस्तांवर वेटोळे घालून बसलेल्या फणा उभारलेल्या नागाची सोनेरी रंगातील लहान शिल्पे आहेत. या खांबांच्या वर कमान असून त्यावर गोलाकार छत आहे. यामुळे सभामंडपाच्या मध्ये गोल घुमटाकार तयार झाला आहे. या सभामंडपात उजव्या बाजूस खांबालगत रवळनाथ, निशाणदार, पावणाई देवी, भूमिचा निर्वशी देव वशीक यांच्या मूर्ती आहेत.

सभामंडपातून दोन पायऱ्या चढून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. यातील वरच्या पायरीवर खांबालगत एका बाजूस नितकरी या देवाची बसलेल्या अवस्थेतील शिरोहीन मूर्ती आहे. ही मूर्ती फक्त मानेपर्यंत आहे, त्यावर शिर नाही. तळकोकणातील देवदेवस्कीमध्ये नितकरी ही देवता जे नीतीप्रमाणे आहे त्याचा न्याय करते ती गावरहाटीच्या न्यायव्यवस्थेतील न्यायाधीश मानली जाते. याच पायरीवर उजव्या बाजूस निशाणाची धातूची काठी आहे. अंतराळात मध्यभागी एका चौथऱ्यावर महादेवाचे वाहन असलेल्या नंदीची सुबक पाषाण मूर्ती आहे. मस्तकावरील छोटी शिंगे, छोटे वशिंड, गळ्यातील घंटा आणि पाठीवर बसण्यासाठी घातलेले जीन यामुळे ही मूर्ती लक्षणीय झाली आहे. या नंदीच्या डावीकडे एका लाकडी स्टँडवर पाच तरंगकाठ्या आहेत. अंतराळाच्या मध्यभागी गर्भगृह असून बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दर्शनीभिंतीलगत डावीकडे जैन, पंचाक्षरी गारुडी, गुरु गणपती यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत, तर उजवीकडे विष्णूची रेखीव मूर्ती आहे

गर्भगृहात मध्यभागी अखंड काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे. या शिवलिंगाची शाळुंका गोलाकार आहे. पाणी जाण्यासाठीचा पन्हळीसारखा भाग काहीसा आखूड पुढे उतरता आहे. वाराणशीतील कालेश्वर लिंगाशी कलमठमधील शिवलिंगाचे बरेच साम्य आढळून येते. या शिवलिंगाच्या बाजूला सुंदर डमरू तर मागील भिंतीकडे पार्वतीची मूर्ती देव कुळाचार आहेत

मंदिराच्या बाहेर हाती खड्ग त्रिशूल धारण केलेली नवलाई देवी, खड्गत्रिशुलधारी विटलाई देवी यांच्या मूर्ती, चौकोनी शाळुंका त्यावर गोल पाषाण असलेला वशीक कुळाचार, तसेच एका चौथऱ्यावर चाळ्याचे आठ गोल दगड मांडलेले आहेत.मंदिरात महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुद्वादशी, मंदिराचा वर्धापन दिन, दसरा श्रावणी सोमवारी उत्सव साजरे होतात. या दिवशी आलेल्या भाविकांना मंदिर संस्थानातर्फे महाप्रसाद देण्यात येतो

उपयुक्त माहिती

  • कणकवली बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी सिंधुदुर्गमधील अनेक शहरांतून कणकवलीसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : श्रीपाद परब, मो. ९४२०३०९०२०, प्रथमेश मठकर, मो. ९४२३३२९३२६
Back To Home