सातारा जिल्ह्यातील वाई या शहराला धार्मिक, ऐतिहासिक व भौगोलिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. कृष्णा नदीच्या तीरावर असलेले हे गाव वेदविद्या व संस्कृत भाषेच्या अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणूनही प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या वाई शहराचे श्रद्धास्थान असणाऱ्या महागणपती मंदिरापासून जवळ असलेले येथील काशी विश्वेश्वर मंदिर त्यावरील शेकडो वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांमुळे ‘शिल्पमंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. पेशवेकाळात उभारण्यात आलेल्या या मंदिरातील शिल्पे निरखून पाहिली की मराठाकालीन वास्तुशैलीच्या श्रीमंतीची जाणीव होते.
वाईमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लहान–मोठी अशी शंभरहून अधिक मंदिरे होती. यापैकी बहुसंख्य मंदिरे ही छत्रपती शाहू महाराज (१७०७–१७४९) यांच्या व त्यानंतरच्या पेशवे काळात रास्ते घराण्याच्या कारकिर्दीत बांधली गेली होती. या सर्व मराठाकालीन मंदिरांमध्ये येथील उत्कृष्ट वास्तुशैलीचा नमुना असलेले काशी विश्वेश्वर मंदिर आहे. सुमारे चार फूट उंच चौथऱ्यावर पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी १७५७ मध्ये बांधले. यासाठी त्यांना सुमारे दीड लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे. त्यांनी या मंदिराला आपला मुलगा काशिनाथ याच्या स्मरणार्थ काशी विश्वेश्वर हे नाव दिले होते.
या मंदिराभोवती १५ फूट उंचीची व सुमारे चार फूट रुंदीची दगडी तटबंदी आहे. या तटबंदीवरून मंदिराच्या शिखरावर असलेली शिल्पे न्याहाळता येतात. मंदिराची रचना नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. याशिवाय नंदी मंडपाच्या मागे १६ कोरीव दगडी खांबांवर प्रशस्त खुलामंडप (सर्व बाजूंनी खुला असलेला सभामंडप) आहे. या खुल्या मंडपाच्या पूर्वेकडील तटबंदीमध्ये महाद्वार असून त्यावर नगारखाना आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूला उंच व घडीव दीपमाळा आहेत. या दीपमाळांचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या वरच्या बाजूला कमळाकृती शिल्प असून त्यातील कुंभामध्ये टेंभा लावण्याची व्यवस्था आहे.
मंदिराच्या समोर तीन फूट उंचीच्या चौथऱ्यावर असलेल्या नंदी मंडपात काळ्या वालुकाश्मात घडविलेली चमकदार व वैशिष्ट्यपूर्ण अशी चार फूट लांबीची व तीन फूट उंचीची नंदीची मूर्ती आहे. नंदीच्या गळ्यात माळा, साखळ्या, पाठीवर झूल व त्याला घंटा लटकलेल्या आहेत, असे शिल्पांकन आहे. सभामंडपात विशेष कलाकुसर नसली तरी अंतराळाच्या डाव्या व उजव्या कोनाड्यात गणपती व मारुती यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाचे छत घुमटाकार असून मध्यभागी कमळाकृती कोरलेली आहे. अंतराळातील गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखेवर कोरीव नक्षीकाम आहे. त्यात कुंभ, फुले, माकडे असे शिल्पांकन आहे. दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आहेत. या प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस दोन कीर्तिमुखे, तर ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी अखंड काळ्या पाषाणात कोरलेली मोठी शिवपिंडी आहे. शिवपिंडीच्या समोरील बाजूस पार्वती मातेची मूर्ती आहे. या गर्भगृहाची छताकडील बाजू उघडलेल्या छत्रीप्रमाणे घुमटाकृती भासते. प्रकाश येण्यासाठी गर्भगृहात वरील बाजूस उत्तर व दक्षिणेकडे जाळीदार गवाक्षे आहेत.
काशी विश्वेश्वराचे शिखर हे वैशिष्ट्यपूर्ण असून यावर मराठाकालीन वास्तुकलेची छाप दिसते. हे शिखर विटा व चुना यांचा वापर करून बांधले आहे. या शिखरामध्ये सुमारे ११० देवड्या असून त्यातील विविध मूर्ती व शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. यामध्ये सर्वात वरच्या स्तरात दशावतारांच्या मूर्ती आहेत. त्याखाली काही ऋषी आणि सरदारांची शिल्पे आहेत. अन्य शिल्पांमध्ये देवी–देवता, नृत्यांगना व मैथुन शिल्पे आहेत. नंदी मंडपासमोरील प्रवेशद्वारावरील शिखराच्या खालच्या स्तरात असलेल्या कोनाड्यांत महिषासुरमर्दिनी, गणपती व सरस्वती या मूर्ती आहेत. शिखराच्या दक्षिणेकडील खालच्या स्तरात दोन वीणाधारी तरुणींची शिल्पे आहेत. याशिवाय येथील अन्य देवड्यांमध्ये राधा–कृष्ण, श्रीराम–सीता, हनुमानाची उड्डाण करण्याच्या आविर्भावातील मूर्ती, शाही थाटात सुखासनात मांडी घालून विराजमान असलेले सरदार, माता–बालक, नृत्यांगना, प्रणयात मश्गूल असलेले सरदाराचे दाम्पत्य व अनेक सरदारांची विविध पगडी परिधान केलेली शिल्पे आहेत.
वाईमध्ये महागणपतीच्या दर्शनासाठी येणारे शेकडो भाविक, पर्यटक व अभ्यासक जवळच असणाऱ्या या काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी व येथील शिल्पवैभव पाहण्यासाठी आवर्जून येतात. या मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीतून गाळ काढताना फेब्रुवारी २०२२ मध्ये १७व्या शतकातील कट्यार व खंजिरे असा शस्त्रसाठा सापडला होता. सध्या ही सर्व हत्यारे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहेत.