महाबळेश्वर आणि पाचगणीमधील अनेक ठिकाणे निसर्गसौंदर्यांनी नटलेली असल्याने देशभरातील पर्यटकांना बाराही महिने ती भुरळ घालतात. येथे पर्यटकांना खुणावणारे अनेक पॉईंटस (स्थळे) असले तरी त्याचबरोबरच या भागाला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वही आहे. पाचगणी शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र राजपुरी येथील लेण्यांमध्ये असलेले कार्तिक स्वामी मंदिर हे महाबळेश्वर तालुक्यातील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक समजले जाते. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला राज्य सरकारकडून ‘क’ वर्ग तीर्थस्थानाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
वाई–पाचगणी मार्गावर पाचगणीच्या अलीकडे डाव्या हाताला दांडेघर नावाचे गाव आहे. येथून सुमारे सात किमी अंतरावर श्री क्षेत्र राजपुरी आहे. हे गाव जावळी, वाई आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांच्या सीमेवर वसले आहे. या गावाला छोटे पाचगणी (Mini Panchgani) असेही म्हणतात, कारण येथे पाचगणीतील प्रसिद्ध टेबल लॅण्डसारखे (डोंगराच्या पृष्ठभागावरील पठार / सपाट जागा) येथेही एक पठार आहे. हे पठार म्हणजे पाचगणीच्या टेबल लॅण्डची प्रतिकृतीच आहे. पाचगणीच्या तुलनेत ते काहीसे लहान असले तरी येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या गावातही हजारो पर्यटक येत असतात. येथे असणारी लेणी व त्यामधील कार्तिक स्वामींचे मंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते.
साधारणतः लेणी पाहण्यासाठी डोंगरावर चढाई करून जावे लागते; परंतु राजपुरी येथे मात्र कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी गावापासून सुमारे ७५ पायऱ्या उतरून दरीत असलेल्या लेण्यांपर्यंत जावे लागते. असे सांगितले जाते की राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी १९४३ साली येथील दलित समाजाच्या मदतीने हा पायरी मार्ग बांधला होता. या दरम्यान गाडगेबाबांचे येथे १५ दिवस वास्तव्य होते. पायरी मार्गाने खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूला लेणी, तर डाव्या बाजूला खोल दरी दिसते. लेण्यांच्या डाव्या बाजूला मोठ्या कातळाजवळ एका साधूची संगमरवरातील समाधी आहे. या समाधीच्या मागच्या बाजूने पावसाळ्यात कोसळणारा धबधबा या परिसराचे सौंदर्य वाढवितो. येथील निसर्गाची विविध रूपे मन प्रसन्न करतात.
येथील लेण्यांमध्ये असणाऱ्या पहिल्या गुहेत एक विहार असून त्यामध्ये रेणुकादेवीची मूर्ती आहे. या विहाराच्या समोरील बाजूस मल्लिकार्जुन, दत्तकुंड व विष्णूकुंड असे तीन पाण्याचे कुंड आहेत. यातील एका कुंडामध्ये गोमुखातून पाणी येत असते. या गुहेच्या बाजूलाच असणाऱ्या दोन गुहा आतून एकमेकांना जोडलेल्या आहेत. त्यामध्ये विष्णूमूर्ती आहे. असे सांगितले जाते की या विष्णू गुहेत गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होते. त्यांनी अनेक दिवस येथे तपसाधना केली होती. त्याच्या बाजूच्या गुहेमध्ये काही वीरगळ, सतीशिळा, देवी–देवतांच्या मूर्ती आहेत. अशाच प्रकारच्या काही वीरगळी लेण्यांच्या बाहेरील बाजूस असलेल्या वडाच्या झाडाजवळही पाहायला मिळतात. चौथी गुहा आकाराने लहान आहे. त्यात शिवलिंग, गणेश व भवानी मातेची मूर्ती आहे. या गुहेसमोर कोरीव नंदी असून नंदीच्या अंगावरील आभूषणे व त्याचा डौलदारपणा वैशिष्ट्यपूर्ण भासतो. सर्वात शेवटच्या गुहेमध्ये असलेल्या विहारात कार्तिक स्वामींची अडीच फूट उंचीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती सुंदर आहे. या मूर्तीमध्ये कार्तिक स्वामी मोरावर आरूढ दाखविले आहेत. या पाचही गुहा कार्तिक स्वामी नावाने ओळखल्या जातात. अभ्यासकांच्या मते, या लेण्या दहाव्या ते अकराव्या शतकात कोरल्या गेल्या आहेत.
असे सांगितले जाते की या लेण्यांसमोर असलेल्या तीन कुंडांतील पाण्यात गंगा अवतरली असून त्याचे महत्त्व प्रयाग येथील पवित्र संगमावरील पाण्याइतके आहे. या कुंडात स्नान केल्यास अनेक जन्मांची पापे नष्ट होऊन शरीरावरील रोगराई नाहीशी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या कुंडांमध्ये स्नान करण्याचीही एक पद्धत आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी या तीन कुंडांतील प्रत्येक कुंडातून एक बादली पाणी घेऊन स्नान करावे व त्यानंतर औदुंबरास पाच प्रदक्षिणा करून कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे. हाच प्रकार सोमवारी व गुरुवारी म्हणजेच आठवड्यातील तीन दिवस करावा, असे सांगितले जाते. याप्रमाणे अनेक भाविक सोमवार, गुरुवार व शनिवारी येथील कुंडातील पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी येत असतात.
या मंदिरात महिलांना प्रवेश नाही. केवळ कृतिका नक्षत्र आणि त्रिपुरारी पौर्णिमा एका दिवशी येतात, त्या मुहूर्तावर महिलांना येथे कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. असा मुहूर्त तीन वर्षांतून एकदा येतो. यावेळी या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी हजारो महिला आणि भाविक येथे येतात. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच भाविकांना या लेण्यांच्या परिसरात जाण्यास परवानगी आहे.