कपिलेश्वर मंदिर

खारेपाटण, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

कपिलेश्वर हे भगवान शंकराचे एक नाव आहे. स्वायंभुव मन्वंतरातील विष्णूचा पाचवा अवतार आणि भगवद्‌गीतेतसिद्धानां कपिलो मुनिःम्हणजे सर्व सिद्धांत कपिलमुनी तो मीच असे कृष्णाने ज्यांच्याबद्दल म्हटले आहे, त्या कपिलमुनी यांनी प्रथम स्थापन केलेल्या शिवलिंगास कपिलेश्वर असे म्हणतात. कपिलमुनी हे सांख्यशास्त्र दर्शनाचे प्रवर्तक आहेत. त्यांनीच प्रथम ध्यान आणि तप या मार्गाचा उपदेश केला. त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वराची मंदिरे देशात अनेक ठिकाणी आहेत. त्यातीलच एक मंदिर इतिहासप्रसिद्ध खारेपाटण नगरीत आहे

ऐतिहासिक नोंदीनुसार खारेपाटणचे प्राचीन नाव बलिपत्तन असे होते. आठव्या शतकात दक्षिण कोकणच्या शिलाहार वंशाचा राजा धम्मियर याने त्याची स्थापना केली होती. ते त्याच्या राजधानीचे शहर, तसेच मोठी व्यापारी पेठ होती. कपिलेश्वर मंदिराच्या इतिहासाबद्दल ठोस माहिती उपलब्ध नसली तरी या मंदिरातील प्राचीन सूर्यदेवाच्या मूर्तीवरून हे मंदिरही शिलाहार काळातील असावे, असा इतिहासकारांचा कयास आहे. दक्षिण कोकणच्या शिलाहार राजांनी धर्म, विद्या कला यांना आश्रय दिला होता. त्यांनी अनेक मंदिरे बांधली होती. त्यांच्या काळातील सूर्यदेवाची ही अप्रतिम कोरीवकाम असलेली मूर्ती हा कोकणातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा समजला जातो. खारेपाटणमधील कपिलेश्वर मंदिर या सूर्यमूर्तीमुळेही ओळखले जाते.

मुंबईगोवा महामार्गावर खारेपाटण येथून उजवीकडे वळल्यावर महामार्गापासून साधारणतः ५०० मीटर अंतरावर हे कपिलेश्वर मंदिर आहे. येथील रस्त्याच्या कडेला एका उंच चौथऱ्यावर दीपस्तंभ त्या लगत तुळशी वृंदावन आहे. दीपस्तंभ मंदिराची वास्तू यांच्यामधून डांबरी रस्ता जातो. कोकणातील अन्य मंदिरांप्रमाणेच हे मंदिर कौलारू असून ते पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या मुखमंडपात अखंड पाषाणातून कोरलेला भला मोठा नंदी आहे. त्यावरील कोरीव काम अपूर्ण राहिल्याचे दिसत असले, तरी त्याच्या गळ्यातील तसेच वशिंडामागे पाठीवर कोरलेल्या घुंगरमाळा लक्षणीय आहेत.

येथील दर्शनमंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा आहे. त्यात दक्षिण आणि उत्तरेकडील भागात भाविकांना बसण्यासाठी दगडी कक्षासने आहेत. दर्शनमंडपासून तीन फूट उंचीवर मुख्य मंदिर आहे. येथून चार पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या लाकडी प्रवेशद्वारावरील द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर लाकडात कोरलेली गणेशमूर्ती आहे. हा सभामंडप बंदिस्त असला तरी त्याच्या डाव्या उजव्या बाजूला भाविकांना बसण्यासाठी दगडी कक्षासने आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोरही नंदीची लहानशी मूर्ती आहे.

सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह आहे. कोकणी मंदिरांप्रमाणे या मंदिराचे गर्भगृहही कौलारू मंदिराच्या आतच आहे. एकावर एक लहान लहान होत जाणाऱ्या चौकोनांपासून तयार करण्यात आलेले शिखर हे या गर्भगृहाचे वैशिष्ट्य आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण अशी सूर्यनारायणाची मूर्ती आहे. डावीकडे लहान दगडी गणेशमूर्ती त्याशेजारी सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या आकाराची विष्णूची अर्धवट घडवलेली मूर्ती आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी काळ्या पाषाणातील अखंड शिवपिंडी आहे. या पिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंडीचा वर्तुळाकार संपून पुढचा पाणी जाण्याचा पाटासारखा भाग सुरू होतो, तेथेच दोन्ही बाजूंस पुढे आलेला त्रिकोणी आकार आहे. अशाच प्रकारची पिंडी मराठवाड्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील मध्ययुगीन रावणेश्वर महादेव मंदिरात आहे

खारेपाटण येथील मंदिरातील सूर्यनारायणाची मूर्ती कोकणात एके काळी सूर्योपासना मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती, याची साक्ष देते. भारतात प्राचीन काळापासून सूर्योपासना रूढ आहे. सूर्योपासनेसंबंधीचा विश्वामित्र ऋषींचा गायत्री मंत्र प्रसिद्ध आहे. माघ शुद्ध सप्तमीस रथसप्तमी साजरी केली जाते, तेही सौरव्रत आहे. मन्वंतराच्या प्रारंभी या तिथीला सूर्याला रथप्राप्ती झाल्यामुळे तिला रथसप्तमी म्हणतात, अशी समजूत आहे. या वेळी घरासमोरील अंगणात गोवऱ्यांचा विस्तव करून त्यावर मातीच्या बोळक्यात दूध उतू घालवून सूर्यदेवास नैवेद्य दाखविला जातो. कोकणात मुरूड कुर्धे येथे सूर्यमंदिरे आहेत. पोंक्षेआंबव येथेही सूर्यमंदिर आहे. आरवली येथे आदित्य नारायण, कशेळी येथे कनकादित्य, माखजन येथे आदित्य नारायण, परूळे येथे आदिनारायण, त्याचप्रमाणे कयघळे, नेवरे, आजगाव, सातर्डे येथे आदित्यनाथ यांची पूजा होते. खारेपाटणच्या कपिलेश्वर मंदिरात असलेली सूर्यमूर्तीही आदित्यनाथाची समजली जाते. सुमारे साडेतीन फूट उंचीची ही सूर्यमूर्ती अन्य छोट्या परिवारमूर्तींसह एकसंध काळ्या पाषाणात कोरलेली आहे. या मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे. प्रभावळीत मकरतोरण आणि त्यात पानाफुलांचे नक्षीकाम केलेले आहे

समचरण उभ्या असलेल्या सूर्यदेवाच्या चेहऱ्यावर शांत भाव असून दोन्ही हातांत कमलपुष्पे आहेत. डोक्यावर आभूषणांनी नटलेला किरिटमुकुट आहे. मूर्तीचा गळा त्रिवलयांकित आहे. गळ्यात एकावली फलकहार असे दागिने आहेत. कानात कुंडले, छातीला उरूबंद, कमरेस वस्त्र त्यावर मेखला आहेत. पायात पादागंद आहे. अशा प्रकारे कोरीव दागिन्यांनी मढविलेल्या या मूर्तीच्या पायाशी सूर्यदेवाच्या संज्ञा आणि राज्ञी या पत्नी आहेत. त्यांच्या हातातही कमळपुष्पे आहेत. त्यांच्या शेजारी सूर्यदेवाचे दंड आणि पिंगल हे सेवक आहेत. दंडाच्या हातात लांब दंड आणि पिंगलाच्या हातांत दौत आणि टाक आहेत. सूर्यदेवाची मूर्ती समचरण म्हणजेच समभंग प्रकारची आहे, तर अन्य मूर्ती पाय वाकवलेल्या द्विभंग स्वरूपातील आहेत. या आदित्यनाथ वा सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी येथे भाविकांप्रमाणेच इतिहासप्रेमी पर्यटकही येत असतात. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कोणार्क हे जगप्रसिद्ध सूर्यमंदिर असून पश्चिम किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणावर सूर्यपूजा होत होती हेच यातून दिसते

उपयुक्त माहिती

  • कणकवलीपासून ३६ किमी, तर राजापूरपासून २० किमी अंतरावर
  • सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक शहरांमधून खारेपाटणसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे

 

Back To Home