कपिलेश्वर महादेव मंदिर  

चांदोद, ता. डभोई, जि. वडोदरा

नर्मदा, ओरसंग आणि गुप्त सरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेले चांदोद (पूर्वीचे चांदीपूर) हे ‘दक्षिण प्रयाग’ म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी प्राचीन कपिलेश्वर महादेव मंदिर स्थित आहे. स्थानिक श्रद्धेनुसार, या मंदिराची स्थापना कपिल ऋषींनी केली होती. नर्मदा नदीत पवित्र स्नान करून कपिलेश्वर मंदिरात जागृत शिवलिंगाची पूजा केल्यास गोदानाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नर्मदा परिक्रमेत या प्राचीन मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व असून, येथे हजारो भाविक धार्मिक विधी आणि अभिषेकासाठी येतात.

या मंदिराशी संबंधित एका पौराणिक कथेनुसार, राजा सगर यांनी एकदा अश्वमेध यज्ञ केला होता. देवांचा राजा इंद्र याने यज्ञाचा घोडा चोरून कपिल ऋषींच्या आश्रमात लपवून ठेवला. राजा सगर यांची साठ हजार मुले घोड्याचा शोध घेत आश्रमात पोहोचली आणि कपिल ऋषींनीच घोडा चोरला असावा असा समज करून, त्यांनी ऋषींच्या तपश्चर्येत व्यत्यय आणून त्यांचा अपमान केला. क्रोधीत होऊन कपिल ऋषींनी त्यांना आपल्या शापाने भस्म केले. पुढे, आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊन, प्रायश्चित्त करण्यासाठी ते रेवा (नर्मदा) नदीच्या काठी आले. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली, जे पुढे कपिलेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.

नर्मदा पुराणाच्या ८८ व्या अध्यायात कपिलेश्वर तीर्थाचे महत्त्व सांगितले आहे, ज्यानुसार हे तीर्थ सर्व पापांचा नाश करते. जो मनुष्य क्रोध जिंकून येथे महादेवाची पूजा करतो, तो यमलोकात जात नाही किंवा त्याला ‘असिपत्रवन’ नरकाचा त्रास भोगावा लागत नाही. पौराणिक कथांनुसार, असिपत्रवन हा एक प्रकारचा नरक आहे. तिथे हजारो योजनांपर्यंत जमीन तप्त असते आणि झाडांची पाने तलवारीसारखी तीक्ष्ण असतात. भगवान दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाणारे वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांनी तिलकवाड्यातील चातुर्मासाच्या मुक्कामादरम्यान या मंदिराला भेट दिली होती, असे मानले जाते.

चांदोद गाव त्रिवेणी संगमावर वसलेले आहे. या त्रिवेणी संगमावर मृत्यूनंतर केले जाणारे धार्मिक विधी विशेष महत्त्वाचे मानले जात असल्याने, वर्षभर या घाटावर विविध विधी केले जातात. या नदीकाठावरील एकूण सहा घाटांपैकी ‘मल्हारराव घाट’ प्रसिद्ध आहे. या घाटाचे नाव मराठा योद्धा आणि साध्वी अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हा घाट सुमारे ६० फूट रुंद असून त्याला ६४ पायऱ्या आहेत. या घाटाच्या बांधकामाबद्दलही एक दंतकथा आहे. प्राचीन काळी, राजाचा एक विश्वासू मंत्री राजकोषातून धन चोरून पळून गेला होता. राजाच्या सैनिकांनी त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. काही दिवसांनंतर, चोरलेले धन एका तुळशी वृंदावनाखाली सापडले. हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते. त्यामुळे, राजाने तुळशी वृंदावनाखाली सापडलेले हे धन एका सत्कर्मासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून हा घाट बांधला. भक्कम बांधणीचा हा घाट नेहमीच भाविकांच्या गर्दीने गजबजलेला असतो.

नर्मदा घाटांपासून थोड्या अंतरावर, एका अरुंद गावच्या रस्त्याला लागून कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला एक प्राचीन मनोरा (मिनार) आहे. हे मंदिर एका उंच चौथऱ्यावर बांधलेले असून त्यात सभामंडप, तीन बाजूंनी उघडा मुखमंडप, अंतराळ आणि गर्भगृह यांचा समावेश आहे. मुखमंडप आणि सभामंडप या दोन्हीवर घुमटाकार शिखरे आहेत. गर्भगृह वगळता, मंदिराला इतरत्र भिंती नसल्यामुळे हे एक खुले मंदिर आहे.

मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडपाच्या डाव्या बाजूला हनुमानाचे छोटे मंदिर आहे. पाच पायऱ्या चढून गेल्यावर मुखमंडपात प्रवेश होतो. सभामंडप खुला असून तिथे संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे आणि त्याच्या समोर कासवाची मूर्ती ठेवलेली आहे. अंतराळात नागदेवता आणि गणेशाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात एका उंच शाळुंकेवर मोठा लंबवर्तुळाकार शिवलिंग असून त्यावर नागाचा फणा आहे. वरच्या भागातील जलपात्रातून (गलंतिका) पिंडीवर सतत अभिषेक होतो. गर्भगृहाच्या मागील भिंतीवर देवी पार्वतीचे मंदिर आहे.

भाविक सकाळी ७:०० ते रात्री ८:०० या वेळेत मंदिराचे दर्शन घेऊ शकतात. महाशिवरात्रीसह अनेक सण येथे मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात. नर्मदा परिक्रमा करणारे प्रवासी आणि नर्मदा घाटांना भेट देणारे भाविक या मंदिराचे दर्शन आवर्जून घेतात. या मंदिराच्या शेजारी हटकेश्वर महादेवाचे एक लहान आणि प्राचीन मंदिर आहे.

मुख्य वैशिष्ट्ये 

  • डभोईपासून २२ किमी अंतरावर स्थित
  • वडोदरा जिल्ह्यातील अनेक शहरांतून डभोईसाठी एसटी बस सेवा उपलब्ध
  • खाजगी वाहनाने थेट मंदिरापर्यंत पोहोचता येते
  • जवळच राहण्याची आणि भोजनाची अनेक सोयी उपलब्ध
  • संपर्क: मोहनभाई, मोबाईल: ९५३७६९५४३३  
Back To Home