कपिलेश्वर मंदिर

केळवद, ता. सावनेर, जि. नागपूर

कपिल मुनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिष्य रामस्वामी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले केळवद येथील कपिलेश्वर हे तीर्थक्षेत्र हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे सांगितले जाते की कपिल मुनींनी येथील शिवपिंडीची स्थापना केली होती, त्यामुळे हे स्थान कपिलेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिरासमोरील कुंडासमोर (कपिल कुंड) महादेवांची ध्यानस्थ अवस्थेत बसलेली २१ फूट उंचीची मूर्ती आहे. ही भव्य सुबक मूर्ती येथील आकर्षण आहे.

मंदिराबाबत आख्यायिका अशी की कपिलेश्वर मंदिरासमोर सध्या असलेल्या कुंडाच्या खालच्या बाजूस एक कपार (गुहा) होती. तेथे कपिल मुनी ध्यानधारणा करत असत. त्यांच्यासोबत कपिला नावाची गायही होती. दररोज सकाळी ही गाय कपारीतून बाहेर निघून पोहत कुंडाबाहेर येत असे इतर गायींच्या कळपासोबत शेतांत चरायला जात असे.सायंकाळ झाली की पुन्हा ती कुंडात उतरून तेथील कपारीत परतत असे. एकदा गुराख्याला संशय आल्याने त्याने गायीचा पाठलाग केला. कुंडातील पाण्यात गायीला उतरताना पाहिल्यावर त्याने तिची शेपटी पकडली गायीसोबत तो त्या कपारीत गेला. गुराख्याला पाहून कपिल ऋषींनी त्याला येथे येण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की ही गाय माझ्या शेतात येऊन पीक खाते, त्यामुळे माझे खूप नुकसान होत आहे.

कपिल मुनींनी गुराख्याचे बोलणे ऐकून घेतल्यावर बाजूला असलेले कोळसे एका मुठीत पकडून ते गुराख्याला दिले. यातून तुझे झालेले नुकसान भरून निघेल, असे सांगून त्याला बाहेर जायला सांगितले. कपारीतून बाहेर आल्यावर त्या गुराख्याला आपल्या घोंगडीत ऋषींनी दिलेले कोळसे दिसले. आपली फसवणूक झाली आहे, अशी समजूत करून त्याने ते कोळसे फेकून दिले. घरी आल्यावर त्यातील एक कोळसा घोंगडीला चिकटून होता, मात्र तो सोन्याचा झाला होता. हे पाहिल्यावर त्याला कपिल मुनींची महती समजली केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. कपिल मुनींच्या रूपाने दैवी पुरुष येथे राहत आहेत, ही वार्ता गावोगावी पसरली तेव्हापासून हे स्थान भाविकांचे श्रद्धास्थान बनले. उन्हाळ्याच्या दिवसांत या कुंडातील पाणी कमी झाल्यावर ही कपार पाहता येते

केळवद गावाच्या पश्चिमेकडील टेकडीवरील कपिलेश्वराचे हे स्थान प्राचीन काळापासून ऋषीमुनींची तपोभूमी असल्याची मान्यता आहेमंदिराच्या कमानीवजा मुख्य प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश होतो. ओढ्यावरील छोट्या लोखंडी पुलावरून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. पुलावरून जाताना उजव्या हाताला एक कुंड आहे. त्यात एका मोठ्या गोमुखातून पाण्याची धार सतत पडत असते. पूल पार केल्यानंतर काहीशा उंचावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी २१ पायऱ्या आहेत. सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर संगमरवरी नंदी असून गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंडी आहे. मंदिराची बांधणी साधी असली तरी येथील परिसर निसर्गसंपन्न आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा यज्ञसमारंभ करण्यात येतो. श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.

मंदिराचे प्रांगण प्रशस्त असून तेथे हनुमान मंदिर, पाचमुखी नागदेवता, विठ्ठलरुख्मिणी, भारती महाराज समाधी, दत्त मंदिर दुर्गादेवी अशी मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला रामबाबा समाधी तुकडोजी महाराजांचे स्थान आहे. त्या शेजारीच भाविकांना राहण्यासाठी काही खोल्या बांधण्यात आल्या आहेत.

कपिलेश्वर मंदिरापासून काही अंतरावर बनादेवीचे सती मंदिर आहे. लग्नाच्या दिवशी वरातीचा घोडा उधळल्याने नवरदेव जखमी झाला बोहल्यावर चढण्याआधी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बनादेवी सती गेली; परंतु तिच्या तेजामुळे सौभाग्याचा हिरवा चुडा घातलेला हात अग्नीत जळू शकला नाही, तो तसाच राहिला. आजही मंदिरात बनादेवीची मूर्ती नसून तिचा हात आहे त्या हाताचीच पूजा केली जाते.

महाराष्ट्र सरकारने कपिलेश्वर देवस्थानाला पर्यटनाच्यादर्जात स्थान दिल्यामुळे सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या निधीतून येथे भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मंदिराव्यतिरिक्त केळवद हे कृषिप्रधान गाव असून कापसाच्या उत्पादनात अग्रेसर आहे. हे गाव येथे तयार होणाऱ्या जरीकाठी साड्यांसाठीही विदर्भात प्रसिद्ध आहे.

उपयुक्त माहिती:

  • सावनेरपासून १० किमी अंतरावर
  • नागपूरहून कोराडी सावनेरमार्गे ४७ किमी
  • नागपूरहून कळमेश्वर सावनेरमार्गे ५२ किमी
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home