मुंबईच्या विकासात भूमिपुत्रांबरोबरच अनेक समाजांनी मोलाची भर घातलेली आहे. तेलुगू भाषिक आर्य वैश्य (कोमटी) हा समाज त्यांपैकी एक आहे. व्यापार आणि व्यवसायात अग्रेसर असलेल्या या समाजाची कुलदेवता असलेल्या कन्यका परमेश्वरी देवीचे मंदिर माटुंगा येथे स्थित आहे. वासवी कन्यका परमेश्वरी म्हणूनही ओळखली जाणारी ही देवी पार्वती मातेचे कुमारी व कन्यका रूप आहे. ती अहिंसेची पुरस्कर्ती व युद्धविरोधी देवता आहे. आर्य वैश्य समाजाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या प्रतिष्ठापना दिनानिमित्त तसेच वासवी जयंतीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
दाक्षिणात्यांच्या बहुसंख्येमुळे, तसेच खास दाक्षिणात्य स्थापत्य शैलीतील विविध मंदिरे आणि खाद्यसंस्कृती यांच्या अमीट छापामुळे माटुंगा परिसरास ‘मिनी मद्रास’ म्हणून संबोधले जात असे. माटुंग्याचा इतिहास व त्याची नामोत्पत्ती अशी सांगितली जाते की देवगिरीच्या रामदेवराव यादवाचा चौथा पुत्र असलेला राजा बिंबदेव ऊर्फ भीमदेव यादव याने इ.स. १२९५ मध्ये माहीम म्हणजेच महिकावती येथे आपली राजधानी स्थापन केली. माटुंग्याच्या परिसरात या राजाची मोठी गजशाळा होती. संस्कृतमध्ये हत्तीला मातंग असेही म्हटले जाते.
यावरून या भागास मातंगालय असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा मातंगा, मातुंगा असा अपभ्रंश होत माटुंगा हे नाव पडले असावे. काहींच्या मते, बिंब राजाच्या काळात येथे हत्तींच्या देखभालीसाठी मातंग समाजाची वस्ती होती, त्यामुळे या भागास माटुंगा हे नाव पडले असावे. पौराणिक आख्यायिकेनुसार या परिसरात मतंग ऋषींचे निवासस्थान होते आणि त्यावरून माटुंगा हे नाव आले.
मुंबईची सात बेटे पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे आल्यानंतर मुंबईच्या विकासास प्रारंभ झाला. येथील खाड्या बुजवण्यात आल्या आणि त्यातून निर्माण झालेल्या जागेत नवनव्या वसाहती वसवण्यात आल्या. १८५३ मध्ये येथे रेल्वे सुरू झाल्यानंतर आणि १८९७ मधील ग्रंथिक सन्निपाताच्या म्हणजेच प्लेगच्या महासाथीनंतर मुंबईच्या विकासास गती आली. यामध्ये येथील कोळी व भंडारी या आद्यनिवासींप्रमाणेच पारशी, गुजराती, मारवाडी, तामिळ, तसेच आंध्र प्रदेशातून आलेला तेलुगू भाषिक कोमटी समाज यांचाही वाटा आहे. एवढेच नव्हे, तर स्वातंत्र्य चळवळीबरोबरच महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीमध्येही तेलुगु भाषिकांचे लक्षणीय योगदान होते.
महात्मा फुले यांच्या आवाहनावरून स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी मुंबईतील कामाठीपुऱ्यात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली होती. ‘कास्ट्स अँड ट्राइब्स ऑफ सदर्न इंडिया, खंड ३’ नुसार कोमटी हे लोक मूळचे गोदावरी नदीकाठचे आहेत. गोदावरीस संस्कृतमध्ये गोमती असेही एक नाव आहे. यावरून या लोकांना गोमती असे म्हटले जाऊ लागले आणि तेलुगूमध्ये त्याचा अपभ्रंश कोमटी असा झाला. काहींच्या मते कोमटी हा शब्द गोमती या शब्दापासून आला व त्याचा संबंध गायीशी आहे. पुढे मद्रास प्रेसिडेन्सीच्या काळात झालेल्या शिरगणतीमध्ये या समुदायातील लोकांनी आपली नोंद आर्य वैश्य म्हणून करून घेतली. वासवी कन्यका परमेश्वरी ही या समाजाची कुलदेवी मानली जाते. या देवीचे मूळ मंदिर आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पेनुगोंडा येथे आहे. सात मजली गोपुरम आणि दाक्षिणात्य वास्तुकलेने नटलेले हे मंदिर वैश्यांची काशी मानले जाते. याच देवीची प्रतिमा माटुंगा येथील मंदिरात प्रतिष्ठापित आहे.
‘वासवी पुराणा’त या देवीची आख्यायिका सांगितली आहे. ती अशी की दहाव्या-अकराव्या शतकात कोमटी राजा कुसुम श्रेष्ठी हा पेनुगोंडा म्हणजेच ज्येष्ठशैलम येथून राज्य करत होता.
तो वेंगिदेशाचे राजे विष्णुवर्धन महाराज यांचा अंकित होता. कुसुमांबा हे त्यांच्या पत्नीचे नाव होते. हे दांपत्य शिवभक्त होते. लग्नानंतर अनेक वर्षे उलटली तरी या दांपत्याला पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्याच्या फलस्वरूपा कुसुमांबाने वैशाख महिन्यामध्ये दशमीच्या दिवशी, शुक्रवारी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यातील मुलाचे नाव विरुपाक्ष आणि मुलीचे नाव वासवी ठेवण्यात आले. पुढे कुलगुरू भास्कराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विरुपाक्षाने वेद, तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्धकला, धनुर्विद्या आणि राज्यकारभारासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी शिकल्या. वासवीने सर्व ललित कला आत्मसात केल्या आणि तत्त्वज्ञानाच्या विषयात प्रवीणता मिळवून ती एक बुद्धिमान स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
एकदा सम्राट विष्णुवर्धन पेनुगोंडा येथे आला असता, त्याने वासवीला पाहिले. तिच्या सौंदर्याने घायाळ होऊन तिच्याशी विवाह करण्याचा निर्धार त्याने केला. हा कोमटी राजा कुसुम श्रेष्ठी यांच्यासाठी मोठा धक्का होता. वयातील अंतर, जातीचा फरक आणि सम्राट आधीच विवाहित असणे या सर्व गोष्टींमुळे तो चिंतेत पडला. त्यांनी विष्णुवर्धनाच्या प्रस्तावाबाबत आपल्या मंत्र्यांशी चर्चा केली. अखेर वासवीच्या मतास महत्त्व देण्याचे एकमताने त्यांनी ठरवले. त्यावर वासवीने आपणास आयुष्यभर कुमारिका राहायचे आहे, असे सांगितले. यानंतर कुसुम श्रेष्ठींनी सम्राट विष्णुवर्धनाला नकार कळवला. परिणामी, सम्राट अत्यंत संतापला आणि त्याने वासवीला हस्तगत करण्यासाठी आपले सैन्य पाठवले.
या कठीण प्रसंगी, कुसुम श्रेष्ठींनी १८ शहरांच्या प्रमुखांची आणि ७१४ गोत्रांच्या लोकांची एक मोठी परिषद बोलावली. परिषदेत १०२ गोत्रप्रमुखांनी, शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी आपण चांगल्या कार्यासाठी लढू या, असा निर्णय दिला. तर ६१२ गोत्रांच्या लोकांनी, वैवाहिक संबंध अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतील, असे मत मांडले. मात्र या बहुसंख्यांचे मत डावलून अखेर कुलगुरू भास्कराचार्य आणि कुसुम श्रेष्ठी यांनी आपल्या सन्मानासाठी लढण्याचे ठरवले.
त्यावेळी वासवी देवी म्हणाली की ‘एका मुलीसाठी रक्तपात का व्हावा? आपल्या स्वार्थासाठी सैनिकांच्या प्राणांचे बलिदान देणे योग्य नाही. युद्धाचा विचार सोडून देणे चांगले. त्याऐवजी आपण एका नवीन मार्गाने बंड करूया. आपण अहिंसा आणि आत्मबलिदानाने युद्ध रोखू शकतो. केवळ दृढ इच्छाशक्ती आणि नैतिक सामर्थ्य असलेले लोकच अशा आत्मबलिदानात सहभागी होऊ शकतात.’ वासवी देवीच्या सूचनेनुसार, गोदावरीच्या काठी, ब्रह्मकुंड या पवित्र स्थळी राजसेवकांनी १०३ अग्निकुंडे तयार केली. मग वासवीने १०२ गोत्रांच्या जोडप्यांना विचारले, ‘तुम्ही माझ्यासोबत या पवित्र अग्नीत उडी घ्याल का?’ वासवी ही ईश्वराचा अवतार असल्याच्या श्रद्धेतून प्रत्येकाने होकार दिला.
त्यावेळी वासवीने आपले तेज प्रकट केले व ती म्हणाली, ‘मी आदिपराशक्तीचा अवतार आहे. स्त्रीची प्रतिष्ठा आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी, विष्णुवर्धनाचा नाश करण्यासाठी आणि जगाला वैश्यांचे मोठेपण दाखवण्यासाठी मी या कलियुगात आले आहे. ज्याप्रमाणे सती देवीने अपमान सहन न झाल्यामुळे पवित्र अग्नीत प्रवेश केला होता, त्याचप्रमाणे मी सुद्धा पवित्र अग्नीत उडी घेऊन परलोकात प्रवेश करत आहे. कुसुम श्रेष्ठी मागील जन्मात ‘समाधी’ नावाचे महान संत होते, त्यांच्या इच्छेनुसार त्यांना १०२ गोत्रांच्या लोकांसह मोक्ष प्राप्त होईल. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना ‘आत्मबलिदान’ करण्यास सांगितले.’ हे शब्द मुखातून बाहेर येताच देवी अंतर्धान पावली. त्यानंतर इतरांनी पवित्र अग्नीत प्रवेश केला. विष्णुवर्धनाला हे समजल्यानंतर तो धक्का सहन करू शकला नाही. त्याचे हृदय छिन्नविच्छिन्न झाले. रक्ताच्या उलट्या करत खाली पडून त्याचा मृत्यू झाला. यानंतर वासवीचा बंधू विरुपाक्ष याने काशी, गया आणि इतर अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. या तीर्थयात्रेच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांनी पेनुगोंडा येथे प्रत्येक गोत्रासाठी १०१ लिंगांची स्थापना केली. त्यानंतर विष्णुवर्धनाचा पुत्र राजा राजनरेन्द्र याने आदराचे प्रतीक म्हणून तेथे वासवीची मूर्ती बसवली. त्या दिवसापासून सर्व वैश्य समाज तिची पूजा करत आहे.
माटुंगा परिसरात राहणाऱ्या वैश्य समाजातील धुरिणांनी सन १९६४ मध्ये सर्वप्रथम येथे आपल्या या कुलदेवतेचे छोटेसे मंदिर स्थापन केले. त्यावेळी या मंदिरात केवळ वासवी कन्यका परमेश्वरी देवीचे एक छायाचित्र लावून तिची पूजा करण्यात येत असे. पुढे सन २००० मध्ये ‘द बॉम्बे आर्य वैश्य संगम’ या संस्थेच्या पुढाकाराने येथे कन्यका परमेश्वरी देवीचे मोठे मंदिर उभारून त्यात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. माटुंग्यातील शंकर मठासमोर काही अंतरावर कन्यका परमेश्वरी देवी मंदिराची आठ मजली वास्तू स्थित आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यांच्या बाह्यभिंतींवर दोन्ही बाजूंनी देवीची विविध रूपे, तसेच कार्तिकस्वामींची प्रतिमा शिल्पांकित केलेली आहे. सर्वांत खालच्या मजल्यावर देवीचे मंदिर आहे.
मंदिराच्या समोर मोकळे प्रांगण आहे. येथून चार पायऱ्या चढून मंदिराच्या अधिष्ठानावर प्रवेश होतो. या संगमरवरी ओट्यावर उजव्या बाजूस अखंड हवनकुंड आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपास आडवे रुंद प्रवेशद्वार आहे. सभामंडपच्या चार कोपऱ्यांमध्ये चार देवळ्या आहेत आणि मध्यभागी गर्भगृह आहे. दाक्षिणात्य शैलीतील या चार देवळ्यांमध्ये अष्टलक्ष्मी व दुर्गा, विनायक, नागेश्वर म्हणजेच महादेवाची शिवपिंड आणि अंजनेय म्हणजेच हनुमान यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. अष्टलक्ष्मींमध्ये गजलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, महालक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी म्हणजेच विजयालक्ष्मी आणि ऐश्वर्यलक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृह दाक्षिणात्य शैलीतील आहे. त्यास चार पायऱ्यांचा सोपान आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस काळ्या पाषाणातील वैदेहीची, तर उजवीकडे वराही देवीची मूर्ती विराजमान आहे. आत संगमरवरी वेदीवर वासवी कन्यका परमेश्वरी देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती प्रतिष्ठापित आहे. वस्त्र, अलंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेल्या या देवीच्या मागे चांदीचे मखर आहे. त्यावर मकरतोरण आहे आणि वर मध्यभागी कीर्तिमुख कोरलेले आहे. येथे डावीकडे देवीची पितळी मूर्ती विराजमान आहे. कन्यका परमेश्वरी देवी चतुर्भुज आहे. तिच्या वरच्या हातात कमलपुष्प व त्यावर शुक, तसेच पाश आहे. खालचा उजवा हात अभयमुद्रेत, तर डावा हात वरदमुद्रेत आहे. गर्भगृहाच्या मागील बाह्यभिंतीवर देवी वैष्णवीची मूर्ती आहे. गर्भगृहावर शिखर आहे.
या मंदिरात रोज सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. मंदिरात नवरात्रीचा उत्सव अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला वेगवेगळ्या रूपांत सजवले जाते. भाविक हा उत्सव आणि देवीचे सुंदर रूप पाहण्यासाठी या काळात आवर्जून भेट देतात. याशिवाय वासवी कन्यका परमेश्वरी देवीचा जन्मदिवस म्हणून ‘वासवी जयंती’चा उत्सव या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या प्रमुख उत्सवांच्या वेळी भाविकांसाठी खास महाप्रसादाचे आयोजन केले जाते.