रायगड जिल्ह्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी मापगाव येथील कनकेश्वर देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कनकेश्वर हे आंग्रे घराण्याचे कुलदैवत होय. ऐतिहासिक माहितीनुसार, आठव्या शतकात राष्ट्रकुट सम्राटांनी हे मंदिर बांधले. श्रीबाग (अलिबाग) ते चंपावती (चौल) हे पूर्ण रेवतीक्षेत्र ताब्यात आल्यावर त्यांनी या परिसरात जी दहा मंदिरे बांधली, त्यापैकी हे एक महत्त्वाचे मंदिर होय. या मंदिराचा जीर्णोद्धार तेराव्या शतकात झाल्याची नोंद आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला येथे मोठी यात्रा असते.
या मंदिराबाबत पौराणिक कथा अशी की प्राचीन काळात कनकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतले व महादेवाबरोबर द्वंद्वयुद्ध खेळण्याची इच्छा प्रकट केली. भोळ्या महादेवाने त्याची ही विनंती मान्य केली; परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर कनकासुराला नमवणे महादेवाला शक्य होत नव्हते आणि महादेवावर मात करणे कनकासुराला जमत नव्हते. शेवटी महादेवाने इथे कायमचे वास्तव्य करावे, ही इच्छा कनकासुराने व्यक्त केली. त्यावर महादेवाने त्याला इथेच पालथे पडून राहण्यास सांगितले. त्याने ते मान्य केल्यावर महादेवाने त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्यात कनकासुर राक्षस भस्म झाला. कनकासुराला दिलेल्या शब्दानुसार महादेवांनी येथेच वास्तव्य केले. म्हणून या देवस्थानाचे नाव कनकेश्वर असे पडले.
भाविकांसोबतच पर्यटकांमध्येही या मंदिराचे आकर्षण आहे. अलिबागपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मापगाव येथून या मंदिरात येण्यासाठी सुमारे ७५० पायऱ्या आहेत. समुद्रसपाटीपासून १२०० फूट उंचीवर असलेला हा परिसर अष्टागरातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. (मुंबई जसे सात बेटांचे महानगर आहे, तसे अलिबाग हे अष्टागर आहे. अलिबाग तालुक्यातील सुमारे ३५ किमीची किनारपट्टी तसेच सासवणे, किहिम, थळ, अलिबाग, साखर, आक्षी, नागाव आणि चौल ही गावे यात मोडतात.) कनकेश्वर मंदिराकडे येण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक मापगावहून पायरी मार्ग, दुसरा झिराडहून डोंगरवाटेने व कार्लेखिंड–रेवस रस्त्यावरील नारंगी गावातूनही डोंगरवाटेनेही या मंदिरात येता येते. या तीनपैकी मापगावातून येणारा पायऱ्यांचा रस्ता जास्त सोयीचा आहे. सरदार राघोजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवादास यांनी स्वखर्चाने १७६४ मध्ये हा मार्ग बांधल्याची नोंद आहे.
पायरी मार्गाने मंदिराकडे येत असताना कनकेश्वर डोंगरावरून समुद्राचे दर्शन होते. समुद्राच्या मध्यभागी असलेले खांदेरी व उंदेरी हे दोन किल्लेही नजरेस पडतात. ७५० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रशस्त आवारात प्रवेश होतो. निसर्गसमृद्ध परिसरात असलेल्या या मंदिरासमोर मोठी पुष्करणी आहे. सुबक बांधणीची, बारमाही भरपूर पाणी असणारी, टप्प्याटप्प्याने उतरत जाणारी अष्टकोनी पुष्करणी अन्यत्र फारच क्वचित पाहायला मिळते. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर शेषाने फण्यावर तोलून धरलेल्या पृथ्वीचे शिल्प आहे. समोर दीपस्तंभ आहे. मंदिराचा पाया चांदणीकृती अनेक टोके असलेला आहे. बाह्य भिंत घडीदार, कोनाचे आकार देऊन बनलेली आहे व जमिनीपासून बांधकामातील उभ्या कोनरेषा थेट शिखरापर्यंत जातात. जमिनीपासून १० पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन रक्षक व सिंहाचे शिल्पे आहेत.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मूळ गर्भगृहापुढे सभामंडप नव्याने बांधल्याचे जाणवते. सभामंडपात अंतराळाजवळ नंदीची मोठी मूर्ती आहे व तिला चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. येथील अंतराळ काहीसे लहान आहे. त्याच्या छतावर कमळपुष्प व दोन नर्तिका कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर कोरीवकामाने नटलेल्या द्वारपट्टीका आहेत. त्यामध्ये वेगवेगळी वाद्ये वाजवणारे वादक, माळा घातलेले यक्ष–गंधर्व यांच्या कोरीव मूर्ती आहेत. या द्वारपट्टीच्या खालच्या भागात अधर्चद्रंशिला (म्हणजे उंबरठ्यासमोरील अधर्चंद्रासारखी पायरी) आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे.
अंतराळातून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. येथील गर्भगृहातील कनकेश्वराचे लिंग पाताळलिंग स्वरूपाचे (जमिनीपासून खाली असलेले) आहे. कनकेश्वराची पिंडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूळ पिंडीवर संपूर्णतः चांदीचे कवच आहे. त्यावर चांदीचा मुखवटा आणि फणा काढलेला नाग आहे. या पिंडीच्या खाली एक खळगा आहे, त्यात पाच उंचवटे आहेत. त्यांनाच ‘पंचलिंगे’ म्हणतात. हा खळगा कायम पाण्याने भरलेला असतो. कनकेश्वराच्या पिंडीवरील अभिषेकजल सिंहमुखातून बाहेर पडते. मंदिराच्या कळसावर तांडवनृत्य करणारा शंकर, शिव–पार्वती, नटराज, भैरवी, कृष्ण, ब्रह्मसावित्री, विष्णू, गणपती आदी मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या बाह्यभिंतींवरही देवी, हत्तीयुद्ध, वानरांची माळ अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. येथील मूर्तिकाम एवढे अप्रतिम आहे की तेथे कळसावर चढणाऱ्या व्यक्तीच्या पाषाणशिल्पाच्या पायात एक वाळा आहे. दगडातच कोरलेला हा वाळा सुटा फिरू शकतो. यातून शिल्पकाराचे कौशल्य प्रकट होते.
या मंदिर परिसरात लक्ष्मीनारायण मंदिर, कालभैरव मंदिर, विष्णुकुंड, रामेश्वर, भीमकुंड, मनाबाईची मठी, पात्रूबाई, मिरचीबुवांची समाधी, रामसिद्धी विनायक मंदिर, लंबोदरानंद समाधी, नेटक्या धर्मशाळा, पालेश्वर, व्याघेश्वर, गायमुख अशी काही स्थाने आहेत. श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला येथे मोठे उत्सव असतात. या मंदिरात सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत भाविकांना कनकेश्वराचे दर्शन घेता येते.