कानिफनाथ गड

बोपगाव ता. पुरंदर, जि. पुणे

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बोपगाव जवळ वसलेले श्री क्षेत्र कानिफनाथ गड हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एका उंच टेकडीवर हे मंदिर आहे. हे स्थान नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी एक असलेल्या ‘कानिफनाथ’ यांची तपोभूमी मानले जाते. या गडाचा इतिहास सुमारे ८०० वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. येथील मंदिराची वास्तुरचना एका नैसर्गिक गुहेच्या स्वरूपात आहे. मंदिराच्या गर्भगृहाचा प्रवेशमार्ग अत्यंत अरुंद आहे. या लहान मार्गातून भाविकांना पोटावर सरपटत आत जावे लागते. येथे दरवर्षी रंगपंचमीला मोठी जत्रा भरते.

भारतात नाथ संप्रदायाचा उदय आठव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान झाला. या संप्रदायामध्ये चौऱ्याऐंशी सिद्ध मानले जातात. कानिफनाथ हे त्यांपैकी एक प्रमुख सिद्ध पुरुष होते. त्यांना प्रबुद्ध नारायणाचा अवतार मानले जाते. आध्यात्मिक साहित्यात त्यांचा उल्लेख ‘कण्हपा’, ‘कृष्णपा’, ‘कानिपा’ किंवा ‘कान्होबा महाराज’ अशा विविध नावांनी येतो. तिबेटी ग्रंथांमधील संदर्भांनुसार कानिफनाथ हे मूळचे कर्नाटक प्रांतातील असावेत, असा एक मतप्रवाह आहे. काही अभ्यासक त्यांचा संबंध पूर्व भारताशी विशेषतः बंगाल प्रांताशी जोडतात. बंगाली चर्यापदांमध्ये त्यांचा उल्लेख ‘कापालिक’ असा आढळतो. त्यांचा काळ साधारणपणे दहाव्या किंवा अकराव्या शतकातील असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. ‘लीळाचरित्र’ या महानुभाव पंथाच्या प्राचीन ग्रंथातही जालंधरनाथांचे शिष्य म्हणून कानिफनाथांचा उल्लेख येतो.

मालू नरहरी (धुंडीसूत मालू) या कवीच्या ‘श्री नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथामध्ये कानिफनाथांची जन्म आख्यायिका सांगितलेली आहे. ती अशी की सरस्वती ही ब्रह्मदेवाची कन्या. ती १२ वर्षांची झाली तेव्हा तिचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाच्या मनात कामवासना जागृत झाली. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या तेजाचा एक अंश पृथ्वीवर निजलेल्या एका हत्तीच्या कानात पडला. कालांतराने त्या कानातून एका बालकाचा जन्म झाला. तेच कानिफनाथ होत. हिमालयातील बद्रीनाथ येथे त्यांनी जालंधरनाथांसोबत १२ वर्षे वास्तव्य केले. तेथे त्यांनी कोट्यवधी श्लोक रचल्याचे नवनाथ भक्तिसारात म्हटले आहे. यानंतर कानिफनाथांनी देशभर भ्रमण केले. या भ्रमणकाळात त्यांना ७०० शिष्य लाभले. ते स्त्रीदेशात जाऊन मच्छिंद्रनाथांना भेटले. त्यांनी बंगाल व कटक प्रांतात वास्तव्य केल्याचे उल्लेख या ग्रंथात आढळतात. अशी मान्यता आहे की बोपगाव येथील याच गडावर कानिफनाथ व भगवान महादेव यांच्यात संवाद झाला होता. नाथ पंथात वेताळाला भूतांचा राजा मानले जाते. सर्व शक्ती नाथांच्या आधीन असतात, या श्रद्धेतून येथे वेताळाची मूर्ती स्थापित केलेली आहे.

कानिफनाथ गडावर पोहोचण्यासाठी पुणे शहरातून प्रामुख्याने दोन मार्ग उपलब्ध आहेत. पहिला मार्ग पुण्याच्या कोंढवा भागातून बोपदेव घाट मार्गे आहे. हा मार्ग डोंगराळ आहे व तो थेट गडाच्या पायथ्यापर्यंत येतो. दुसरा मार्ग हडपसर-सासवड रस्त्यावरून दिवे घाट ओलांडून सासवडच्या दिशेने येताना बोपगाव फाट्यावरून उजवीकडे वळतो. गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर भाविकांना साधारण १५० ते २०० पायऱ्यांचा मार्ग चढावा लागतो. पायऱ्यांची चढण मध्यम स्वरूपाची आहे. या संपूर्ण मार्गावर नैसर्गिक सावली व मोकळी हवा आहे. गडाचा परिसर अत्यंत स्वच्छ असून तो झाडांनी व्यापलेला आहे. गडावर प्रवेश करताच प्रथम एक मोठी कमान आहे. तिला ‘कानिफनाथांची कमान’ असे म्हटले जाते. या कमानीलगत भाविकांना विश्रांतीची सोय आहे. पायऱ्या चढून आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथून पुणे शहराचा काही भाग तसेच कात्रजच्या डोंगररांगांचे दृश्य दिसते.

कानिफनाथ मंदिर हे प्राचीन गुहा-रचना आणि आधुनिक बांधकाम यांचा संगम आहे. मंदिराच्या पाषाणी मुख्य प्रवेशद्वारावर हत्तींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. या प्रतिमा कानिफनाथांच्या जन्माच्या आख्यायिकेचे प्रतीक मानल्या जातात. मंदिराचा २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला. यामध्ये मोठा सभामंडप व प्रदक्षिणा मार्गाचे काम पूर्ण झाले. येथील सभामंडपात असलेल्या खांबांवर विविध पौराणिक कथांची शिल्पे कोरलेली आहेत. येथील जमिनीच्या पातळीपेक्षा खाली व नैसर्गिक गुहेच्या स्वरूपात असलेले गर्भगृह हे वैशिष्ट्य आहे. या गुहेत प्रवेश करण्यासाठी असलेली चौकट अतिशय लहान आहे. तिचे माप साधारणपणे सव्वा फूट बाय सव्वा फूट इतकेच आहे. या अरुंद मार्गातून भाविकांना पोटावर सरपटत आत शिरावे लागते. आतमध्ये एका वेळी साधारण १५ ते २० व्यक्ती उभ्या राहू शकतील इतकी जागा आहे. गर्भगृहात कानिफनाथांची समाधी आहे. या समाधीवर चांदीचे सुंदर कलाकुसर केलेले काम आहे. मंदिराच्या भिंतींवर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व नवनाथांच्या जीवनातील प्रसंगांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या एका कोपऱ्यात गुरु जालिंदरनाथांचे स्थान आणि दुसऱ्या बाजूला मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची स्थाने आहेत. मंदिराच्या शिखरावर विविध देवदेवतांची शिल्पे आहेत. शिखराच्या चारही बाजूंना लहान उपशिखरे व शिरोभागी पितळेचा कळस आहे.

कानिफनाथ गडावर वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. रंगपंचमीची जत्रा हा येथील सर्वात मोठा उत्सव होय. फाल्गुन वद्य पंचमीला गडावर ही भव्य यात्रा भरते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक सहभागी होतात. या दिवशी पहाटे कानिफनाथांच्या समाधीवर अभिषेक केला जातो. मंदिराच्या शिखरावर गुलाल व रंगांची उधळण केली जाते. बोपगावातून कानिफनाथांच्या पालखीचा सोहळा निघतो. हा सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गडावर आणला जातो. यात्रेच्या वेळी परिसरातील गावांमधून अनेक मानाच्या ‘शिखरकाठ्या’ गडावर येतात. यात्रेनिमित्त गडाच्या पायथ्याशी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. प्रत्येक पौर्णिमेला येथे पालखी सोहळा होतो. यात भाविक नाथांच्या नामाचा गजर करत सहभागी होतात. दर गुरुवारी दुपारी आरतीनंतर मंदिरात महाप्रसादाचे वाटप केले जाते. याचा लाभ शेकडो भाविक घेतात. या व्यतिरिक्त रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, दत्तजयंती व महाशिवरात्री यांसारखे सणही येथे शास्त्रोक्त पद्धतीने साजरे होतात. दररोज पहाटे पाच वाजता काकड आरती आणि रात्री शेजारती होते. येथील दर्शनासाठी विशिष्ट नियम आहेत. पुरुषांना मुख्य गर्भगृहात जाताना अंगावरील वस्त्रे काढून प्रवेश करावा लागतो. महिलांना मात्र बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. भाविकांना पहाटे पाच ते रात्री नऊ पर्यंत गर्भगृहात जाऊन कानिफनाथांच्या समाधीचे दर्शन घेता येते. रविवारी व गुरुवारी हीच वेळ पहाटे पाच ते रात्री साडेदहा पर्यंत असते.

उपयुक्त माहिती

  • स्वारगेट येथून २४ किमी अंतरावर
  • कात्रज येथून २० किमी अंतरावर
  • स्वारगेट, कात्रज, हडपसर येथून पीएमपीएमएल बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२६ २११५१
Back To Home