कनकेश्वर महादेव मंदिर

आमलाड शिवार, ता. तळोदा, जि. नंदुरबार

तळोदा हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे गाव आज तालुक्याचे ठिकाण आहे. सन १६६२ साली जहागिरदार भोजराज बारगळ यांनी या गावात सहा एकर क्षेत्रावर बांधलेली गढी आजही शाबूत आहे. संस्थानिक राणा मानसिंग यांनी भोजराज बारगळ यांना तळोदा गाव इनाम दिले होते. सन १९५२ पर्यंत या गावाचा कारभार बारगळ घराण्याकडे होता. अशा या इतिहास प्रसिद्ध गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आमलाड शिवारात कनकेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे

पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात कनकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतले महादेवाबरोबर द्वंद्वयुद्ध खेळण्याची इच्छा प्रकट केली. भोळ्या महादेवाने त्याची ही विनंती मान्य केली; परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर कनकासुराला नमवणे महादेवाला शक्य होत नव्हते आणि महादेवावर मात करणे कनकासुराला जमत नव्हते. शेवटी महादेवाने आपले नाव धारण करून पृथ्वीवर वास्तव्य करावे, ही इच्छा कनकासुराने व्यक्त केली. त्यावर महादेवाने त्याला पालथे पडून राहण्यास सांगितले. त्याने ते मान्य केल्यावर महादेवाने त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्यात कनकासुर राक्षस भस्म झाला. कनकासुराला दिलेल्या शब्दानुसार महादेवांनी त्याचे नाव धारण करून वास्तव्य केले. म्हणून महादेवाचे एक नाव कनकेश्वर असे पडले.

हे मंदिर सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज येथील ग्रामस्थांकडून वर्तविला जातो. असे सांगितले जाते की महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी मदत केली होती. तसेच या मंदिराच्या प्रांगणात असलेली विहीरही त्यांनी बांधून दिली होती. शहरापासून मंदिराच्या प्रांगणापर्यंत पक्का रस्ता आहे. मंदिरासमोर असलेल्या वाहनतळाला लागून मंदिराची आवारभिंत आहे. फरसबंदी असलेल्या प्रांगणात भाविकांसाठी आसनव्यवस्था आहे

सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर प्रांगणात भाविकांच्या सोयीसाठी मंडप उभारलेला आहे. या मंडपात एका चौथऱ्यावर शिवपिंडी आहे. सभामंडपास चार स्तंभांवर तीन कमानी असलेले प्रवेशद्वार आहे. सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना चंद्रकोर कमानीने जोडलेले आहेत प्रत्येक चार स्तंभांच्यामध्ये घुमट आहे. सभामंडपात मध्यभागी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे

पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर पितळी पत्र्याचे आच्छादन आहे. सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या गर्भगृहात मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवरील शाळुंका पितळी पत्र्याने मढविलेली आहे त्यावर कमलदल नक्षी आहे. शाळुंकेवरील पाषाणी शिवलिंगावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले पितळी अभिषेकपात्र आहे. बाजूला त्रिशूल डमरू आहे. मागील भिंतीतील देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे

गर्भगृहाच्या छतावर कमळ फुलांची नक्षी असलेले घुमटाकार शिखर त्यावरील स्तुपिकेवर कळस ध्वजपताका आहे. मंदिराच्या प्रांगणात विश्वकर्मा मंदिर आहे. अर्धखुला सभामंडप गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिरात वज्रपिठावर भगवान विश्वकर्मा यांची चतुर्भुज संगमरवरी मूर्ती आहे. देवाच्या तीन हातात विविध अवजारे चौथ्या हातात कमंडलू आहे. डोक्यावर मुकुट अंगावर उंची वस्त्रे अलंकार आहेत. मंदिराच्या छतावर असलेल्या चौकोनी शिखरावर आमलक कळस आहे. या मंदिराच्या बाजूला पिंपळाच्या झाडाखाली दत्तात्रेयांचे लहान मंदिर आहे. त्यात दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर पादुका दोन्ही बाजूच्या भिंतीत दीपकोष्टके आहेत.

या मंदिराच्या बाजूला संतोषी माता सद्गुरू गजानन महाराज यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. पुढे मारूतीचे पश्चिममुखी मंदिर आहे. देवाची शेंदूरचर्चित रेखीव मूर्ती उभ्या पाषाणात कोरलेली आहे. जवळच अंबिका देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोर यज्ञकुंड गर्भगृहात देवीची व्याघ्रारूढ अष्टभुजा मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात काही प्राचीन नंदी शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रांगणात पायऱ्या असलेली गोड्या पाण्याची प्राचीन विहीर धर्मशाळा आहे

महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. महाशिवरात्री श्रावणातील सर्व सोमवारी शिवपिंडीवर लघुरूद्र महाअभिषेकाने दिवसाची सुरूवात होते. मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रसंगी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. त्यामुळे परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. निसर्गाच्या सानिध्यात वृक्षवल्लीने नटलेल्या या परिसरात पर्यटकांची संख्याही मोठी असते.

उपयुक्त माहिती

  • तळोदा येथून किमी, तर धुळेपासून १२० किमी अंतरावर
  • धुळे जिल्ह्यातील अनेक शहरांतून तळोदासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : राजाराम पाटील, अध्यक्ष, मो. ८६६८९५९५१५, गोविंद पाटील, उपाध्यक्ष, मो. ९६३७६९३२३२
Back To Home