१५१० ते १९६१ असे सुमारे ४५० वर्षे गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकापासून गोव्यावर मौर्य शासकांचे राज्य होते. त्यानंतर शिलाहार, कदंब, चालुक्य, विजयनगरचे राजे आणि आदिलशहाचे देखील राज्य होते. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात गोव्याच्या भूमीत पोर्तुगीजांनी ठेवलेले पाऊल साडेचारशे वर्षे घट्ट रोवून ठेवले. या काळात येथील मूळ संस्कृती आणि मंदिरांना कायमच दहशतीचा सामना करावा लागला. अशाही परिस्थितीत काही मंदिरे टिकून राहिली. पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील कमलेश्वर मंदिर त्यापैकीच एक आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कमलेश्वर महारुद्र मंदिर रेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेवतीद्वीप येथील राणी कमलादेवी यांनी बांधले असल्याचे सांगितले जाते. याच कारणाने मंदिरास कमलेश्वर नावाने ओळखले जाते. या मंदिराबाबत अख्यायिका अशी की देव व दानवांच्या युद्धात देवांचा पराभव झाला तेव्हा विष्णूने या ठिकाणी शिवपिंडीची स्थापना केली. महादेवाकडून विजयाचा आशीर्वाद मिळावा म्हणून विष्णूने हजार कमळ फुले महादेवाच्या पिंडीवर अर्पण केली. परंतू विष्णूची परीक्षा घेण्यासाठी महादेवाने एक फुल लपवून ठेवले. एका फुलासाठी संकल्प मोडायला नको म्हणून विष्णूने आपले नेत्रकमल देवाला अर्पण केले. विष्णूच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने विष्णूला विजयाचा आशीर्वाद दिला. येथे झालेल्या सहस्र कमळ फुलांच्या संकल्पाने या मंदिरास कमलेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले.
गावाच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत हे मंदिर असून मंदिरास तटबंदी व तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे.
प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. मंदिराचे पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगण प्रशस्त आहे. प्रांगणात इतर देवी देवतांची मंदिरे आणि वास्तू आहेत. सर्व मंदिरांचे छत कौलारू आहे. प्रांगणात तीन टप्प्यांचा अष्टकोनी चौथरा आहे. त्यावर आठ थरांची अष्टकोनी दीपमाळा आहे. दीपमाळेच्या शीर्षभागी शिखर आहे. सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपात जमिनीवर मध्यभागी होमकुंड व बाह्यबाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात प्रत्येकी सहा स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्यबाजूचे स्तंभ कक्षासनात आहेत. आतील भागातील स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंड खाली चौकोनी व वर अष्टकोनी आहेत. लाकडी संरचनेवर असलेले येथील कौलारू छत वर व खाली अशा दोन भागांत विभागलेले आहे.
मुख्य सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा व दोन भागांत आहे. सुमारे वीस फूट लांबी रुंदीच्या पहिल्या भागात चारही बाजूंना चार फूट उंच कठडा आहे व त्यात कक्षासने आहेत.
याच भागात देवाची पालखी सजवणे व कौल लावण्याचे विधी केले जातात. पुढे मुख्य सभामंडपाचा दुसरा प्रशस्त भाग आहे. येथे डाव्या व उजव्या बाजूला भक्कम स्तंभांच्या दोन रांगा आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार तोरणांनी जोडलेले आहेत. या सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. पुढे लाकडी सुरक्षा कठडा आहे व त्यातून अंतराळ साकारले आहे. येथे लाकडी मेजावर पद्मपादुका आहेत. भाविकांना येथूनच महादेवाचे दर्शन घ्यावे लागते. अंतराळात वज्रपिठावर नंदीच्या काळ्या पाषाणातील दोन मूर्ती आहेत. अंतराळात उजव्या बाजूला जमिनीवर शिवपिंडी आहे. यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. त्यात डावीकडे गणपती व उजवीकडे पार्वतीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर व द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर कीर्तीमुख आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात जमिनीवर विशाल शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला चांदीचा पंचफणी नाग आहे. जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे.
शिवपिंडीच्या दोन्ही बाजूला पितळी लामण दिव्यांच्या माळा टांगलेल्या आहेत.
गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावर महादेवाची पितळी उत्सव मूर्ती आहे. पालखी सोहळ्यात ही मूर्ती पालखीत ठेवून ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराचे छत कौलारू असून गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. शिखराचा खालील पहिला थर अष्टकोनी व दुसरा गोल घुमटाकार आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे. प्रांगणात मंदिराच्या शेजारी श्रीविष्णू नारायण मंदिर आहे. यामध्ये प्राचीन विष्णू मूर्ती आहे. देवाच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहे. या मंदिराशेजारी कुवळेश्वरी देवीचे मंदिर आहे. येथील देवीची पूर्णाकृती मूर्ती अत्यंत देखणी आहे. मंदिरापासून काही अंतरावर भूमिका देवी मंदिर आहे. भूमिका देवी ही भूदेवता असून या मंदिरास भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत भव्य व सुंदर प्रवेशद्वार आहे. या मंदिराची रचना कमलेश्वर महारुद्र मंदिरासारखीच आहे.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. महाशिवरात्री, होळी, दसरा व श्रावणातील शेवटच्या सोमवारी देवाचा पालखी उत्सव साजरा केला जातो. यावेळी देवाची उत्सव मूर्ती पालखीत बसवून पालखी ग्रामप्रदक्षिणेला निघते. शारदीय नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, दसरा, दिवाळी आदी वर्षभरातील अनेक सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात.