दासबोध, मनाचे श्लोक अशा दर्जेदार ग्रंथांचे रचियेते समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या जीवन काळात एकून १०२९ गावांना भेटी देवून ११०० मठ स्थापन केले होते. त्यापैकी फार थोडे मठ सध्या अस्तित्वात आहेत. स्वामींनी अगणित शिष्यांना दीक्षा दिली. त्यांपैकी कल्याणस्वामी हे समर्थांचे पट्टशिष्य व लेखनिक होते. ते सावली सारखे समर्थांसोबत असत. त्यांनी समर्थांचे समग्र साहित्य लिहून काढले होते. कल्याणस्वामींचे समाधी मंदिर डोमगाव येथे सीना नदीच्या किनाऱ्यावर आहे. आजही या ठिकाणी कल्याणस्वामींचे अस्तीत्व आहे व येथे नतमस्तक झाल्याने मनाला शांतता लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे समाधी मंदिर सुमारे २५० वर्षे प्राचीन आहे. सन १७१४ साली कल्याणस्वामींचे परांडा येथे देहावसन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार डोमगाव येथे सीना नदीच्या तीरावर झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ५९ वर्षांनी या ठिकाणी समाधी मंदिर बांधले गेले. कल्याणस्वामी यांचे मुळ नाव अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी होते. त्यांचा जन्म बाभुळगाव येथे सन १६३६ साली झाला. सन १६४८ ते १६७८ पर्यंत ते समर्थांच्या सोबत राहिले. ‘स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहीतसे.’ असे कल्याणस्वामींचे गुरूबंधू अनंत कवी यांनी लिहून ठेवले आहे. सन १६७८ साली समर्थांच्या आज्ञेने कल्याणस्वामी डोमगाव येथे आले व आयुष्याच्या अखेरपर्यंत ते येथेच राहीले. येथे त्यांनी अनेक शिष्य केले. त्यांनी सीना नदीचे नाव श्रमपरिहारिणी ठेवून नदीची आरती लिहिली होती.
सीना कोळेगाव जलप्रकल्प म्हणजेच कल्याण सागर जलाशयाच्या परीसरात हे समाधी मंदिर आहे. या पाण्यातील बंधाऱ्यावरील रस्ता मंदिरापर्यंत येतो. चारही बाजूंनी जलाशयाचे वेढलेले हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. मंदिराचा परीसर पेव्हर ब्लॉक आच्छादित आहे. येथे उद्यान, मंगल कार्यालय, देवस्थान कार्यालय आदी वास्तू नव्याने उभारण्यात आलेल्या आहेत.
मंदिरास सुमारे पंधरा फूट उंच भक्कम दगडी तटबंदी आहे. त्यात भव्य प्रवेशद्वार आहे.
प्रवेशद्वारास दोन्ही बाजूला चौकोनी स्तंभ व नक्षीदार लाकडी झडपा आहेत. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पुढे श्री कल्याणस्वामी समाधी मंदिराचा लाकडी दुमजली सभामंडप आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपात दोन्ही बाजूला प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांवर वरच्या मजल्याच्या सज्जाचे कठडे आहेत. सभामंडपाचे वितान नक्षीदार आहे. सभामंडपात कल्याणस्वामींच्या आयुष्यातील ठळक घटना दाखवणारी माहितीचित्रे लावलेली आहेत.
पुढे दगडी बांधणीचे अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारास तीन महिरपी कमानींनी जोडलेले चार नक्षीदार स्तंभ आहेत. येथील भिंतींवर चक्रनक्षी व पशू शिल्पे आहेत. मध्यभागी कल्याणस्वामींचे चित्र आहे. भिंतींच्या सज्जाला खालील बाजूस पाषाणी झुंबर आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या अंतराळात डाव्या व उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावर दरवाजे आहेत. अंतराळातील देवकोष्टकात कल्याणस्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोध ग्रंथाची प्रत आहे. अंतराळातील पाषाणी स्तंभांवर विविध नक्षी आहेत. पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर स्तंभनक्षी व पानाफुलांची नक्षी आणि ललाटबिंबावर मारूतीची मूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी कल्याणस्वामी यांची वालुकामय पाषाणाची समाधी आहे. समाधीवर पादुका व शिवपिंडी आहेत आणि त्यावर भगवद्गीतेचे श्लोक कोरलेले आहेत.
गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावरील मखरात श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारूती यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या छतावर भूमीज शैलीतील चार थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात उभ्या रचनेची मंदिर शिल्पे आहेत. शिखरात शीर्षभागी स्तूपी, त्यावर चांदीचा कळस व ध्वजपताका आहे.
कल्याणस्वामी समाधी मंदिरांच्या अगदी समोर, लाकडी सभामंडपाच्या दुसऱ्या बाजूला मुद्गलस्वामींचे समाधी मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वेलबुट्टी नक्षी व दोन्ही बाजूला चक्रनक्षी आहेत. ललाटबिंबावर मारूतीची मूर्ती आहे. मंदिरात मुद्गलस्वामी यांचे समाधीस्थान व मागील भिंतीलगत दास हनुमानाची हात जोडलेली मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर भूमीज शैलीतील चार थरांचे शिखर आहे. या शिखरातही शीर्षभागी स्तूपी व त्यावर चांदीचा कळस आहे. लाकडी सभामंडपाच्या दोन्ही बाजूला ओवऱ्या आहेत. येथील सर्व स्तंभ एकमेकांना चंद्रकोर कमानीने जोडलेले आहेत. प्रत्येक चार स्तंभांमधील वितान अष्टकोनी व नक्षीदार आहे. डाव्या बाजूच्या ओवाऱ्यांतील भिंतीवर रामदास स्वामींनी विविध ठिकाणी स्थापना केलेल्या अकरा मारुतींची शिल्पे आहेत. याशिवाय मंदिरात चार शिलालेख आहेत.
मंदिरात तीन मुख्य वार्षिक उत्सव साजरे होतात. चैत्र पाडवा ते राम नवमी हा वार्षिक उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. दासनवमी (माघ वद्य नवमी) तीन दिवस साजरी केली जाते. आषाढ शुद्ध त्रयोदशी ही कल्याणस्वामींची पुण्यतिथी येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या उत्सवांच्या वेळी मंदिरात राम कथा, भजन, कीर्तन, प्रवचन व दासबोधाचे पारायण केले जाते. विस्तीर्ण जलाशयाच्या किनाऱ्यावर असलेल्या या देवस्थानाचे सौदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येथे पर्यटकही येतात.